ही संरचना अशा गुंतवणूकदारांसाठी बनवण्यात आली आहे, ज्यांना डेरिव्हेटिव्ह, शॉर्ट पोझिशन्स आणि केंद्रित गुंतवणुकीसारख्या (कॉन्सन्ट्रेटेड बेट्स) प्रगत परंतु जोखमीच्या तंत्रांनी गुंतवणूक व्यवस्थापित करावी असे वाटते, पण पीएमएस किंवा एआयएफची गुंतागुंत नको आहे. एसआयएफ नेमके कुणाला साजेसे आहे हे समजून घेण्यासाठी, किमान गुंतवणूक विचारात घ्या. म्युच्युअल फंड १०० रुपयांपेक्षा कमी रकमेपासून सुरू करता येतो. पीएमएससाठी किमान ५० लाख लागतात. एआयएफमध्ये किमान १ कोटींची गुंतवणूक आवश्यक असते. एसआयएफसाठी प्रतिपॅन, प्रतिएएमसी किमान गुंतवणुकीची मर्यादा १० लाख रुपये आहे. एकंदरीत, जोखीम घेऊन नफा कमविणे हा गुंतवणुकीचा स्पष्ट हेतू असलेल्या अनुभवी किरकोळ आणि एचएनआय गुंतवणूकदारांसाठी हे साधन आहे.
संरचनात्मकदृष्ट्या, एसआयएफ म्युच्युअल फंडांच्या नियामक चौकटीत काम करतात. ते म्युच्युअल फंडांप्रमाणेच पारदर्शकता आणि सर्व मानके पाळतात. योजनेनुसार तरलता दररोज किंवा नियतकालिक असू शकते. जर इक्विटी गुंतवणूक ६५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर इक्विटी म्युच्युअल फंडाप्रमाणे कर आकारला जातो. मात्र, या चौकटीत राहूनही एसआयएफला धोरणात्मक लवचीकता दिली आहे – ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह्जद्वारे २५ टक्क्यांपर्यंत ‘अनहेज्ड शॉर्ट एक्स्पोजर’ घेण्याची मुभा आहे.
एसआयएफ राबवू शकत असलेली धोरणे (स्ट्रॅटेजीज)
पारंपरिक म्युच्युअल फंड रचनेत जी धोरणे राबवणे अशक्य किंवा अवघड असते, ती एसआयएफमध्ये राबवली जाऊ शकतात:
- लाँग-शॉर्ट इक्विटी: व्यवस्थापकाला भाव वर जाण्याची अपेक्षा असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ‘लाँग’ पोझिशन घेऊ शकतात आणि ज्यांचे भाव पडतील असे वाटते त्यात (डेरिव्हेटिव्ह्सद्वारे) ‘शॉर्ट’ पोझिशन घेऊ शकतात. यामुळे रेंज-बाउंड किंवा घसरणाऱ्या बाजारपेठांमध्येही परतावा मिळवण्याची संधी मिळते.
- इन्व्हर्स / टॅक्टिकल डेट: सामान्य डेट फंडांच्या तुलनेत, एसआयएफ अधिक आक्रमक निर्णय घेऊ शकतात किंवा उच्च परतावा देणाऱ्या परंतु जोखीम जास्त असलेल्या क्रेडिट साधनांमध्ये (डबल ए पेक्षा कमी पत असलेले रोखे) गुंतवणूक करू शकतात. त्यांना ‘यिल्डकर्व्ह’नुसार सक्रियपणे व्यवस्थापन करण्याचीही अनुमती आहे.
- उद्योग क्षेत्र-केंद्रित / थिमॅटिक दृष्टिकोन: नियमित म्युच्युअल फंडांवर गुंतवणुकीच्या मर्यादा असतात. एसआयएफ केवळ १५-२० शेअरचा समावेश असलेला आक्रमक ‘हाय-कन्व्हिक्शन’ पोर्टफोलिओ चालवू शकतात, ज्यामुळे अधिक नफा (अल्फा) मिळवण्याची क्षमता वाढते (मात्र जोखीमही वाढते).
- डेरिव्हेटिव्ह्ज ओव्हरलेसह हायब्रिड / मल्टी-ॲसेट: या रणनीती फ्यूचर्स आणि ऑप्शन्स वापरून पोर्टफोलिओ ‘हेज’ करू शकतात आणि पारंपरिक मर्यादेपेक्षा खूप जास्त (बहुतेकदा २० टक्क्यांपर्यंत) रीट्स आणि इनव्हिट्स किंवा कमॉडिटीजचा अंतर्भाव करून पोर्टफोलिओ बांधू शकतात.
- डेरिव्हेटिव्ह्जसह सेक्टर रोटेशन: थीमॅटिक म्युच्युअल फंडांची गुंतवणूक एका थीममध्येच असते. एसआयएफ मात्र विविध क्षेत्रांमध्ये वेगाने फिरू शकतो आणि नफा वाढवण्यासाठी किंवा एखादे उद्योग क्षेत्र हेज करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह वापरू शकतो.
- क्वांटिटेटिव्ह / फॅक्टर-आधारित स्ट्रॅटेजी: यामध्ये मानवी निर्णयाऐवजी नियमांवर आधारित मॉडेल्सचा वापर करून शेअर निवडले जातात (उदा. मूल्य, गती, गुणवत्ता किंवा कमी अस्थिरता). यांचे उद्दिष्ट कालांतराने ‘स्ट्रक्चरल रिटर्न प्रीमियम’ मिळवणे आहे.
हा चांगला पर्याय का आहे?
- कमी गुंतवणुकीत प्रगत गुंतवणूक तंत्रे: सक्रिय फंडांच्या मर्यादित परताव्यांवर नाराज असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, एसआयएफ म्युच्युअल फंडाच्या सुरक्षिततेसह प्रगत धोरणे उपलब्ध करून देते.
- दोन्ही बाजूंनी फायदा घेण्याची क्षमता: ‘लाँग-शॉर्ट’ रचनेमुळे बाजार पडत असतानाही परतावा मिळवणे किंवा तोटा मर्यादित ठेवणे शक्य होते.
- कर कार्यक्षमता: एसआयएफची रचना म्युच्युअल फंडासारखी असल्याने, त्यावरील कर आकारणीदेखील इक्विटी किंवा डेट फंडांप्रमाणेच असते. हे पीएमएस संरचनांपेक्षा अधिक कार्यक्षम असू शकते कारण तिथे प्रत्येक व्यवहार गुंतवणूकदारासाठी करपात्र असतो.
सावधानता कशाबाबत बाळगावी?
- गुंतागुंतीची जोखीम: ही उत्पादने ‘डोळे मिटून गुंतवणूक करा’ अशी साधी नाहीत. व्यवस्थापक एखादा शेअर शॉर्ट का करत आहे किंवा कालावधीवर आक्रमकपणे गुंतवणूक का करत आहे, हे समजून घेण्यासाठी उच्च आर्थिक साक्षरतेची गरज असते.
- रोकड असुलभता: काही विशिष्ट धोरणांमध्ये (विशेषतः क्रेडिट किंवा स्मॉल-कॅप) पैसे काढण्यावर बंधने असू शकतात.
- केंद्रित जोखीम: एसआयएफ एकाच कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकतात (पारंपरिक म्युच्युअल फंडांमध्ये १० टक्क्यांच्या तुलनेत). व्यवस्थापकाचा एखादा चुकीचा निर्णय कामगिरीवर मोठा परिणाम करू शकतो.
- मर्यादित इतिहास: भारतात एसआयएफ नवीन आहेत, त्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन कामगिरीची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही.
कोणी कोणती रणनीती वापरावी?
अस्थिरता नकोशी असलेला HNI → लाँग–शॉर्ट इक्विटी
ज्यांना इक्विटीमधील वाढीचा लाभ घ्यायचा आहे, परंतु मोठ्या घसरणीवर नियंत्रण हवे आहे त्यांच्यासाठी योग्य.
नियमित उत्पन्नाच्या शोधातला गुंतवणूकदार → इन्व्हर्स / टॅक्टिकल डेट
पारंपरिक स्थिर उत्पन्न साधनांमधील ६–७ टक्के परताव्याने समाधानी नसलेले, पण नियंत्रित क्रेडिट जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी विशेष.
बाजारचक्र समजून गुंतवणूक करणारा → उद्योग क्षेत्र-केंद्रित / थिमॅटिक दृष्टिकोन
बाजारचक्रांची जाण असलेल्या आणि स्थिर वाटपापेक्षा सक्रिय पोझिशनिंगला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांनी विचार करावा.
सर्वकाळ योग्य पर्याय शोधणारा → डेरिव्हेटिव्ह्ज ओव्हरलेसह हायब्रिड / मल्टी-ॲसेट
काळानुसार मालमत्ता वर्ग बदलण्याचा निर्णय अनुभवी व्यवस्थापकावर सोपवू इच्छिणारे गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य.
प्रक्रियेवर भिस्त ठेवणारा गुंतवणूकदार → क्वांटिटेटिव्ह / फॅक्टर-आधारित स्ट्रॅटेजी
‘स्टार’ फंड मॅनेजर किंवा व्यक्तिनिष्ठ निर्णयांपेक्षा नियमाधारित, पुनरावृत्तीयोग्य प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय योग्य ठरतो. एखादा फॅक्टर काही काळ न चालल्याने कामगिरी कमी होऊ शकते.
थोडक्यात सांगायचे तर…
एसआयएफ हे आपल्या नेहमीच्या वैविध्यपूर्ण इक्विटी किंवा डेट फंडांना पर्याय नाहीत, तर ते पोर्टफोलिओची कामगिरी सुधारण्यासाठीची अतिरिक्त (जास्तीची) साधने आहेत. ज्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठी १०–२० टक्के वाटा विचारपूर्वक निवडलेल्या एसआयएफमध्ये गुंतवणे फायदेशीर ठरू शकते.
पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे: या फंडाची कामगिरी काही काळ चांगली झाली नाही तरीही त्यातली गुंतवणूक टिकवून ठेवण्याइतपत तुम्हाला त्यांची धोरणे समजली आहेत का?
उत्तर ‘हो’ असेल, तर एसआयएफ तुमच्यासाठी एक शक्तिशाली साधन ठरू शकते. नसल्यास, ही गुंतागुंत तुमच्यासाठी खर्चीक ठरू शकते.
