-सुधाकर कुलकर्णी
सध्याच्या तंत्रज्ञान युगात ‘फिनटेक’ कंपन्यांचा सहभाग एकूणच आर्थिक सेवा व सुविधा पुरविण्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि भविष्यात तो झपाट्याने वाढणार आहे हे ध्यानात घेता ‘पी २ पी लेंडिंग’ किंवा तत्सम आर्थिक व्यवहार हा आपल्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख अंग बनू शकते. जास्त परतावा व तुलनेने कमी जोखीम असलेल्या, तरी बहुतांशांना अपरिचित अशा या कायदेसंमत गुंतवणूक पर्यायाची दखल म्हणूनच अनिवार्य ठरते.
बँक, पोस्ट, पीपीएफ यासारख्या पारंपरिक सुरक्षित पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर, ‘थोडी जोखीम घेऊन पाहू काय हरकत आहे’ म्हणत काही गुंतवणूकदार अन्य काही पर्याय शोधत असतात. अशा वेळी शेअर्स/म्युचुअल फंड हे बहुश्रुत पर्याय असतातच, तथापि ज्यांना नियमित उत्पन्न पाहिजे त्यांना आणखी वेगळ्या वाटा चोखाळाव्याशा वाटतात. जास्त परतावा देणारा व तुलनेने कमी जोखीम असलेला असाच एक पर्याय जो आजही सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फारसा माहीत नाही. त्याचा या निमित्ताने वेध घेऊया.
आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात विविध ‘फिनटेक’ कंपन्या उदयास आल्या असून पीअर टू पीअर (पी २ पी) लेंडिंग या नवीन गुंतवणूक पर्यायाचे दालन त्यायोगेच खुले झाले आहे. सर्वसामान्यांना हा पर्याय खुला करणाऱ्या सुमारे २५ फिनटेक कंपन्या गेल्या पाच-सात वर्षांपासून भारतात कार्यरत आहेत. यांची कार्यपद्धती कशी आहे व यात सामान्य गुंतवणूकदार कशी गुंतवणूक करू शकतो याची या लेखातून आपण माहिती घेऊ.
मुळात, पी २ पी लेंडिंग हा क्लाऊड फंडिंगचा प्रकार असून यात ज्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी खर्च वजा वरकड (सरप्लस) रक्कम आहे व जास्त परतावा मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे असा गुंतवणूकदार वळतो. असे गुंतवणूकदार आणि ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते अशी व्यक्ती यांचा मेळ साधणारे व्यासपीठ म्हणजे पी २ पी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या फिनटेक कंपन्या होय.
गुंतवणूकदार आपली रक्कम पी २ पी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या एस्क्रो अकाऊंट (ठरावीक उद्दिष्टासाठी सुरू केलेल्या बँक खात्यावर) जमा करतो व ज्याला कर्ज हवे असते अशी व्यक्ती आपली कर्ज मागणी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने करीत असते. या दोन्हीही व्यक्ती एकमेकास ओळखत असतीलच असे नाही. किंबहुना बहुतांश एकमेकास ओळखत नसतात. जसे ओला/उबर मार्फत प्रवासासाठी गाडी बुक करताना आपण मोबाइलवरील संबंधित ॲपवर गाडीसाठी नोंदणी करतो तसाच हा प्रकार आहे. आपल्याला कोठे जायचे आहे याची नोंद केल्यानंतर ओला/उबर ॲप, आपल्याला कोणत्या प्रकारची गाडी हवी आहे त्यानुसार किती भाडे असेल हे सुचवत असते, आपण आपली गरज व परवडणारे भाडे यांचा विचार करून आपल्या सोयीनुसार गाडी निवडतो. आपण निवडलेल्या पर्यायानुसार जवळपास असणाऱ्या गाड्यांपैकी एक ड्रायव्हर आपल्याला ॲपवर होकार कळवितो व त्याच वेळी त्याला यायला किती वेळ लागेल याचा अंदाज दर्शविला जातो. त्या सोबतच ड्रायव्हरने आतापर्यंत किती ट्रिप केल्या आहेत व ग्राहकांनी त्याला कसे रेटिंग दिले आहे हेही त्या ॲपवर दर्शविले जाते. मिळालेली माहिती समाधानकारक वाटली तरच आपण आपले बुकिंग कन्फर्म करत असतो.
या ठिकाणी ज्याची स्वत:ची गाडी आहे अशी व्यक्ती ओला/उबर सोबत आपली गाडी रजिस्टर करतात. तद्वतच कर्ज मागणी करणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती व क्रेडिट स्कोर यासारखी आवश्यक ती माहिती प्लॅटफॉर्ममार्फत मिळविली जाते व ज्या व्यक्तीने एस्क्रो अकाऊंटवर रक्कम जमा केली आहे अशा व्यक्तीस ई-मेल, एसएमएस मार्फत ती दिली जाते व सोबतच मिळू शकणारे व्याज व जोखीम याबाबत माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे निर्णय घेऊन कर्जदाराने मागणी केलेल्या कर्जात सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत आपला निर्णय गुंतवणूकदाराने पी२पी प्लॅटफॉर्मवर कळवायचा असतो. अशा रीतीने ज्याच्याकडे सरप्लस रक्कम आहे असा गुंतवणूकदार थेट गरजूस कर्ज देतो व या दोघांना जोडण्याचे काम पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्म करत असतो.
सुनियंत्रित प्रक्रिया
पी२पी लेंडिंग ही तशी नवीन संकल्पना आहे आणि पूर्णपणे सुनियंत्रित आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्यानुसारच व्यवहार करणे बंधनकारक आहे.
- १) पी२पी व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीस ‘एनबीएफसी-पी२पी’ अशी नोंदणी करणे आवश्यक आहे.
- २) अशा कंपनीची नेट वर्थ किमान २ कोटी रुपये असणे आवश्यक आहे.
- ३) पी२पी व्यवसायासाठी आवश्यक असणारे सर्व टेक्निकल (तांत्रिक ), प्रोफेशनल (व्यावसायिक) व मॅनेजरियल (व्यवस्थापकीय ) कौशल्य कंपनीकडे असणे आवश्यक आहे.
- ४) पी२पी कंपनीने केवळ मध्यस्थ म्हणून काम करणे अपेक्षित आहे. कंपनी स्वत: कर्ज देणार नाही किंवा ठेव स्वीकारू शकणार नाही.
- ५) कर्ज देणारी व्यक्ती (गुंतवणूकदार) उपलब्ध सर्व प्लॅटफॉर्म मिळून जास्तीत जास्त १० लाख रुपये देऊ शकेल. जर ‘सीए’कडून नेट वर्थ बाबत प्रमाणपत्र मिळविले असेल तर उपलब्ध सर्व प्लॅटफॉर्म मिळून जास्तीत जास्त ५० लाख रुपये देऊ शकेल.
- ६) कर्ज घेणारी व्यक्ती सर्व प्लॅटफॉर्म मिळून जास्तीत जास्त १० लाख रुपये कर्ज घेऊ शकेल.
- ७) कर्ज देणारा एका व्यक्तीस त्याच्या कर्ज मागणीच्या २० टक्क्यांपर्यंत परंतु जास्तीत जास्त ५०,००० रुपये एवढेच कर्ज देऊ शकेल. मात्र १,००० रुपये इतके कमीत कमी कर्जसुद्धा देता येईल.
- ८) कर्ज परतफेडीची मुदत किमान सहा महिने व कमाल ३६ महिने (३ वर्षे) इतकी असेल.
- ९) कर्जावरील व्याजदर कर्ज मागणी करणाऱ्याच्या पतगुणवत्तेनुसार (क्रेडिट वर्दीनेस) सुमारे ९ टक्के ते १८ टक्क्यांच्या दरम्यान असेल. कर्ज देणाऱ्या व्यक्तीस तो ज्या प्रमाणात जोखीम घेईल त्या प्रमाणात परतावा मिळेल.
हे लक्षात घ्यावे?
पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवताना खालील बाबी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे
- १) पी२पी लेंडिंग हे एक विनातारण (अनसिक्युअर्ड लोन) असून यात जोखीम असल्यामुळेच जास्त रिटर्न मिळत असतो. कर्जदाराचे त्याच्या रिस्क प्रोफाइलनुसार वर्गीकरण केले जाते. त्यामुळे आपण आपल्याला योग्य वाटेल त्याच रिस्क प्रोफाइलच्या कर्ज मागणीचा विचार करू शकतो.
- २) आपण एका अनोळखी व्यक्तीस कर्ज देणार असतो.
- ३) सुरुवातीस मोठी रक्कम न गुंतवता लहान रक्कम गुंतवून, अनुभव घेऊन पुढील गुंतवणूक करावी.
- ४) गुंतवणुकीतून मिळणारा रिटर्न हा निश्चित नाही, तो कर्जदाराच्या प्रोफाइलनुसार कमी-अधिक असू शकतो.
- ५) पी२पी च्या अन्य उपलब्ध प्लॅटफॉर्मचा तुलनात्मक अभ्यास करून एकाच प्लॅटफॉर्मवर आपली रक्कम न गुंतविता किमान तीन-चार प्लॅटफॉर्मवर गुंतवावी यामुळे गुंतवणुकीतील जोखीम कमी होऊ शकते.
- ६) गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित प्लॅटफॉर्मचे कर्ज थकीत/अनियमित किती प्रमाणात आहे हे पाहावे.
पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्म: स्वरूप व कार्यपद्धती
- १) पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मने केवळ मध्यस्थ म्हणून काम करावयाचे आहे जेणेकरून ज्याच्याकडे शिल्लक आहे व ती त्याला गुंतवायची आहे आणि ज्याला कर्जाऊ रक्कम हवी आहे अशांना एकमेकांशी जोडले जाते.
- २) पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्म स्वत: ठेवी स्वीकारू शकत नाही.
- ३) पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्म स्वत: कर्ज देऊ शकत नाही. तसेच आधीच्या कर्जाची रक्कम वाढवू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारची हमी देऊ शकत नाही.
- ४) कर्ज देणारा व घेणारा या दोघांनीही आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली असल्याची खातरजमा पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मने करून घेण्याची गरज आहे.
- ५) पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मने आपल्याकडील सर्व व्यवहारांचा डेटा तसेच कर्ज देणारे व घेणारे यांचा डेटा सुरक्षित व भारतातच ठेवणे बंधनकारक आहे.
- ६) दिले जाणारे कर्ज हे विनातारणी कर्ज असून यातील जोखमीची पूर्ण जाणीव कर्ज देणाऱ्याला करून देणे ही पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मची जबाबदारी असते.
- ७) तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव, मेल व फोन नंबर हा तपशील वेबसाइटवर उपलब्ध करून देणे ही जबाबदारी पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मची असते.
- ८) कर्ज वितरण, परतफेड व वसुली यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पी२पी लेंडिंग प्लॅटफॉर्मची असते.
- ९) कर्ज देणाऱ्याने रक्कम आणि कर्ज घेणाऱ्यास देण्याची रक्कम हे दोन्हीही व्यवहार एस्क्रो अकाऊंटमधूनच करावयाचे आहेत.
पी२पी लेंडिंगचे फायदे
- १) गुंतवणुकीवर सरासरी १० ते १६ टक्के इतका परतावा मिळू शकतो.
- २) दरमहा नियमित उत्पन्न मिळविता येऊ शकते.
- ३) कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करून कर्जदार व त्याच्या पतइतिहासाची बरीच अचूक माहिती मिळत असल्याने कर्ज देण्याबाबतचा निर्णय घेणे काहीसे सोपे होते.
- ४) मिळणारे कर्ज अगदी कमीतकमी वेळात (काही तासांत ) मिळू शकते.
- ५) आपण गुंतविलेली रक्कम एकाच व्यक्तीस कर्ज म्हणून दिली जात नाही. साधारणपणे १ लाख रुपयांची गुंतवणूक ही कर्ज म्हणून सुमारे ३५ ते ४० लोकांमध्ये विभागली जात असल्याने जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते.
- ६) बहुतांश कर्जदार हे नोकरी करणारे व साधारणपणे दरमहा ३०,००० रुपये ते ७५,००० रुपये उत्पन्न असणारे असल्याने कर्ज थकीत/अनियमित होण्याची शक्यता कमी असते.
पी२पी लेंडिंगचे तोटे
- १) पी२पी ही तशी नवी संकल्पना असून अजून स्थिरावयाची आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षाला जाण्यासाठी पुरेसा पूर्वेतिहास नाही.
- २) कर्ज बिनतारणी असल्याने अनियमित झाल्यास वसुलीची जबाबदारी पी२पी कंपनीवर नसते. त्यामुळे कर्ज बुडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- ३) मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न करपात्र असते.
सध्याच्या तंत्रज्ञान युगात फिनटेक कंपन्यांचा सहभाग एकूणच आर्थिक सेवा व सुविधा पुरविण्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे व भविष्यात तो झपाट्याने वाढणार आहे हे ध्यानात घेता पी२पी किंवा तत्सम आर्थिक व्यवहार हा आपल्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख अंग बनू शकते.
आर्थिक समावेशकता हे उद्दिष्ट पी२पी लेंडिंगमुळे साध्य होऊ शकते. यातून मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगास अगदी कमी वेळात अर्थसाहाय्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. रिटेल लोनची वाढती मागणी विचारात घेता पी२पी लेंडिंगला नजीकच्या भविष्यात खूप वाव असल्याचे दिसून येते. आपल्याकडे २०१४ पासून पी२पी लेंडिंग सुरू झाले असले तरी याबाबत लोकांना फारशी माहिती आजही नाही. २०१७ साली या व्यवसायासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली असून त्यानुसार नोंदणीकृत कंपन्याच हा व्यवसाय करू शकतात.
बाजारपेठ आणि विकास
सध्या सुमारे २५ कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने पी२पी लेंडिंगसाठी रजिस्ट्रेशन दिले असून खालील काही कंपन्या सध्या प्रामुख्याने या व्यवसायात दिसून येत आहेत.
प्रमुख कंपन्या: १) फेअरसेंट २) ब्रिज फ्रेन्जी ३) लेंड बॉक्स ४) लेनदेन क्लब ५) पैसा दुकान ६) रुपी सर्कल ७) आय टू आय फंड्स ८) लेंडिंगकार्ट ९) मोनेक्सो १०) कॅशकुमार
या व्यवसायाची सुमारे २१ ते २२ टक्के दराने प्रति वर्षी वाढ होणे अपेक्षित असून २०२६ अखेर भारतातील हा व्यवसाय सुमारे ८०,००० ते ८५,००० कोटी रुपये इतका होईल असा अंदाज आहे.
या पर्यायाचा लाभ गुंतवणूकदार आणि छोटे-मध्यम व्यावसायिक या दोघांनाही घेता येऊ शकतो.
(लेखक पुणेस्थित सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)
