-केदार पत्की
‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणापासून ऐकलेली असते. या म्हणीतील ज्ञान हे कालातीत आहे. सातत्याने केलेले लहान लहान प्रयत्न काळाच्या ओघात एक अर्थपूर्ण आणि शाश्वत गोष्ट निर्माण करतात. हाच नियम आर्थिक नियोजनालाही तंतोतंत लागू होतो.
प्रत्येक पिढी आपल्या पुढील पिढीसाठी अधिक उज्ज्वल भविष्य घडवण्याची आशा बाळगते. काहींसाठी याचा अर्थ आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे असा असतो. इतरांसाठी स्वतःचे हक्काचे घर असणे, वृद्ध पालकांना आधार देणे, दीर्घकाळापासून जपलेली स्वप्ने पूर्ण करणे किंवा सुखकर निवृत्तीचे नियोजन करणे असा असू शकतो. या आकांक्षा कुटुंबागणिक भिन्न असू शकतात, तरीही आज त्या सर्व एका सामायिक वास्तवाशी जोडलेल्या आहेत. ते वास्तव आहे महागाईचे… ही सर्व स्वप्ने पूर्ण करणे दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चालले आहे.
महागाईचा विचार आपण आपल्या आयुष्यावरील एका अप्रत्यक्ष ‘सबस्क्रिप्शन फी’ म्हणून करू शकतो. दरवर्षी ही ‘फी’ शांतपणे प्रत्येक गोष्टीवर होणारा खर्च वाढवत असते. तुमचा कॉफीचा कप महाग होतो. घराचे भाडे वाढते; प्रवास अधिक खर्चिक होतो. आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून ते रोजच्या घरगुती खर्चांपर्यंत, गेल्या काही वर्षांत सर्वच खर्च सातत्याने वाढले आहेत. परिणामी, महागाई ही आता केवळ अर्थतज्ज्ञांच्या चर्चेपुरती मर्यादित राहिलेली संकल्पना नाही. ती आपण सर्वजण दररोज अनुभवत असतो. या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंवर होणारा खर्च तुमच्या स्वप्नांमध्ये दरवर्षी वाढीव वाटा मागत असतात. परंतु ही झळ अप्रत्यक्ष असल्याने आपल्याला त्याची जाणीव उशिरा होते.
आज संपत्ती फक्त तशीच पडून राहण्यापेक्षा ती अधिक वेगाने वाढणे गरजेचे आहे, याबद्दलची जागरूकता वाढत आहे. महागाईमुळे होणाऱ्या संपत्तीच्या ऱ्हासाचा प्रभाव दीर्घकालीन दृष्टीने मोठा असतो आणि त्याला छेद देण्यासाठी संपत्तीचा वाढीचा वेगही महागाईपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. हे कसे साध्य करायचे? तर काळाच्या ओघात संपत्तीत वाढ व्हावी आणि तिचे टिकून राहावे यासाठी तिची जाणीवपूर्वक आणि हुशारीने गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात ही हुशारी लोकांच्या अंगी बाणवलीय, हा एक अतिशय उत्साहवर्धक बदल आहे. हा बदल अधिक आर्थिकदृष्ट्या जागरूक होत असलेल्या भारताचे प्रतिबिंब आहे.
वाढत्या आकांक्षांसाठी वाढत्या संपत्तीची गरज
उच्च शिक्षण, स्वतःचे घर आणि निवृत्ती यांसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी काळाच्या ओघात वाढणाऱ्या आर्थिक संसाधनांची गरज असते, हे आजची कुटुंबे चांगल्या प्रकारे समजून आहेत. परिणामी, अनेक जण बाजारपेठेशी जोडलेल्या (मार्केट-लिंक्ड) पर्यायांमध्ये अधिक सक्रियतेने सहभागी होत आहेत आणि नियमित गुंतवणुकीसारख्या चांगल्या सवयी आत्मसात करत आहेत.
‘चक्रवाढ वाढीची ताकद’ (पावर ऑफ कंपाऊंडिंग) अत्यंत प्रभावी आहे. परंतु ती अजूनही सर्वांना सहजासहजी समजलेली नाही. गुंतवणुकीची लवकर केलेली सुरुवात आणि मिळालेली स्थिर वाढ हा संपत्ती निर्माण करण्याचा आणि महागाईच्या पुढे राहण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हा मार्ग संयम, सातत्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाला योग्य फळ देतो. शिवाय, यामुळे कुटुंबांमध्ये केवळ स्वप्ने पाहण्यापेक्षा आपण आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे पावले उचलत आहोत, असा आत्मविश्वास निर्माण होतो. तथापि, संपत्ती वाढवणे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच तो आर्थिक सुरक्षेचा केवळ एक भाग आहे.
जेव्हा आयुष्य आपल्या नियोजनानुसार चालत नाही
बहुतेक सर्व आर्थिक नियोजने ही भविष्यातील उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून केली जातात. परंतु आयुष्य हे वर्तमानात जगायचे असते आणि वर्तमान बऱ्याचदा अनपेक्षित व अनिश्चित असू शकतो. अचानक आलेले वैद्यकीय संकट, दीर्घकालीन आजारपण, उत्पन्नाचे साधन अचानक बंद होणे किंवा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे अकाली निधन यांसारख्या घटना कुटुंबाची आर्थिक घडी एका रात्रीत विस्कटून टाकू शकतात. अशा घटनांचे नियोजन कोणीही आधीपासून करत नाही, पण नेमक्या याच परिस्थिती आर्थिक नियोजनाच्या भक्कमपणाची परीक्षा घेतात.
एका अशा तरुण व्यावसायिकाची कल्पना करा ज्याने भविष्यातील उद्दिष्टांसाठी सातत्याने गुंतवणूक करून काही वर्षे एक मोठा निधी (कॉर्पस) उभारला आहे. त्याचे नियोजन अगदी साधे आहे, गुंतवणुकीत टिकून राहणे, संपत्ती वाढू देणे आणि या दीर्घकालीन प्रवासाचा लाभ घेणे. किंवा कदाचित वेगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘लवकर निवृत्त’ होणे. आणि मग अचानक एक अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणी उद्भवते.
अचानक, भविष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी ठेवलेली गुंतवणूक ही तात्कालिक गरजा पूर्ण करण्यासाठी काढून घ्यावी लागते. इथे आव्हान परताव्याचे किंवा बाजारातील कामगिरीचे राहत नाही. तर वर्षानुवर्षांच्या शिस्तबद्ध आर्थिक प्रयत्नांशी तडजोड न करता या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचे असते. अनेक कुटुंबांनी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर असा अनुभव घेतलेला असतो. जेव्हा आयुष्याला अनपेक्षित वळण मिळते, तेव्हा कित्येक वर्षांपासून विचारपूर्वक आखलेले आणि दृष्टीपथात असलेले ध्येय अचानक दृष्टीआड होते किंवा आणखी दूर गेल्याचे दिसते.
थोडक्यात, आर्थिक सुरक्षा ही केवळ आपण निर्माण केलेल्या संपत्तीच्या प्रमाणावरून मोजता कामा नये. ती संपत्ती टिकवण्याच्या आणि त्या संपत्तीशी जोडलेली उद्दिष्टे सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या क्षमतेवरूनही मोजली गेली पाहिजे. याच ठिकाणी आर्थिक सुरक्षेची (विमा छत्र) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जर गुंतवणूक कुटुंबांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ जाण्यास मदत करत असेल, तर परिस्थिती अनपेक्षितपणे बदलली तरीही ती स्वप्ने साकार होण्याच्या कक्षेत राहतील याची खात्री आर्थिक संरक्षण देत असते.
वाढीचे नियोजन आणि आयुष्याची पूर्वतयारी
अनेक लोकांना वाटते की आर्थिक नियोजन म्हणजे केवळ परतावा आणि बाजारातील कामगिरी. या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी चित्र एवढ्यावरच पूर्ण होत नाही. हा एक सुरळीत प्रवास असणे नेहमीच शक्य नसते. बाजार बदलतात, आयुष्य बदलते आणि अनपेक्षित घटना घडतात. यशस्वी नियोजन करणारी कुटुंबे या संधी आणि अनिश्चितता या दोन्हींचा विचार करून पावले उचलतात.
आपल्या मुलाच्या भविष्याचे नियोजन करणाऱ्या एका तरुण दांपत्याचे उदाहरण घ्या. ते नियमितपणे गुंतवणूक करतात कारण मुले मोठी होत असताना त्यांच्यासाठी त्यांना एक मजबूत आर्थिक पाया तयार करायचा असतो. त्याचवेळी, त्यांना हेदेखील ठाऊक असते की या ध्येयापर्यंतचा प्रवास जवळजवळ दोन दशकांचा असू शकतो. त्यामुळे अपेक्षित टप्प्यांचे नियोजन करण्याइतकेच अनपेक्षित परिस्थितीची पूर्वतयारी करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
हा संतुलित दृष्टिकोन आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. महागाई हळूहळू पैशांचे मूल्य कमी करत असते, तर अनपेक्षित घटना कोणत्याही क्षणी आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतात. कुटुंबांना या दोन्ही आव्हानांचा सामना करण्यास मदत करतील अशा रणनीतींची आवश्यकता असते. एका अर्थाने, वाढत्या आर्थिक जागरूकतेमुळे हा सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.
आर्थिक नियोजनामागील सर्वात महत्त्वाचे सत्य हे आहे की प्रत्येक आर्थिक ध्येयामागे एक मानवी उद्देश दडलेला असतो. कुटुंबाची काळजी घेणे असो, जबाबदाऱ्या पार पाडणे असो किंवा आपल्या प्रिय व्यक्तींसाठी संधी निर्माण करणे असो; खरे मूल्य हे आकड्यांच्या पलीकडे असते. शेवटी मोठी जोखीम पत्करुन विजय मिळवणे हा खरा विजय नसून, आपल्या स्वप्नांना एका भक्कम पर्यायी योजनेचा (बॅकअप प्लॅन) आधार देऊन विजय मिळवणे हा खरा विजय आहे.
लेखक इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आहेत.
