चित्रपटात वित्त कधी फक्त एखाद्या संवादात असते किंवा कधी अख्खा चित्रपट त्यावर बेतलेला असतो तर काही चित्रपटांत वित्तविषयक संकल्पना शोधाव्या लागतात. बाबुराव गणपतराव आपटे म्हणजे परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा बहुचर्चित आणि दूरचित्रवाणीवर बऱ्याच वेळेला लागणाऱ्या या चित्रपटात वित्तीय संकल्पना तशा ठळक असल्या तरीही इतर आशयांमुळे त्या झाकोळल्या जातात.
या चित्रपटात माझ्या दृष्टीने दोन संकल्पना महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे सुरुवातीलाच अक्षय कुमार आपल्या दोन्ही मित्रांना एका ‘चिट फंड’मध्ये गुंतवणूक करायला भाग पाडतो. चिट फंड त्यांना २१ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवतो. चित्रपटात हे अगदी विनोदी पद्धतीने दाखवले असले तरी आपल्या आसपास अशा भूलथापांना बळी पडणारे काही कमी नाहीत. मागच्याच वर्षी ‘टोरेस ज्वेलर्स’ने केलेला ‘पॉन्झी स्कॅम’ तुम्हाला आठवतच असेल. आजसुद्धा त्याच्या खऱ्या सूत्रधारांचा शोध संपलेला नाही आणि गुंतवणूकदारांचे पैसेसुद्धा परत मिळाले नाहीत.
वर्ष २०२४ मध्ये वित्तरंजन सदरात मी अशा फसव्या योजनांची रचना कशी केली जाते आणि यांना ‘पॉन्झी स्कीम’ का म्हटले जाते, हे लिहिले होते. ठाण्यासारख्या छोट्या शहरातसुद्धा अलीकडेच एक ‘पॉन्झी’ घोटाळा उघडकीला आला, त्यात गुंतवणूकदारांचे तब्बल ५०० कोटी रुपये बुडवले गेल्याचा आरोप आहे.
चित्रपटात जरी विनोदी पद्धतीने दाखवले गेले असले तरी सुज्ञ गुंतवणूकदारांना हा मोठा धडा आहे की, झटपट परतावा देणाऱ्या या योजनांपासून सावध राहिले पाहिजे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या योजनांचा बुरखा फाटल्यावर त्या ठिकाणी गुंतवणूकदार जमा होतात आणि कंपनीच्या कार्यालयाला एक दिवस अचानक टाळे लागलेले त्यांना दिसते. प्रत्यक्षातसुद्धा असेच होते, हे टोरेसच्या अनुभवातून सिद्ध झाले.
पण याच चित्रपटात एक अजून महत्त्वाची शिकवण किंवा गुंतवणुकीचा एक रस्ता दाखवलेला आहे. सामान्य माणसे याचा विचारदेखील करत नाहीत. पण ज्यांना जुन्या वस्तूंमध्ये रस आहे, त्यांना मी काय म्हणतोय ते समजेल. चित्रपटात एक पारसी गृहस्थ आपल्या घरामध्ये सव्वासहा कोटी रुपयांच्या जुन्या बंदुका संग्रह म्हणून ठेवतो.
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बिनविरोध निवड झालेले अभिषेक मनू सिंघवी यांनी आपल्याकडे २५ कोटी रुपयांचे ‘आर्टवर्क’ म्हणजे एखादे चित्र, शिल्प किंवा मूर्तीमध्ये गुंतवणूक असल्याचे जाहीर केले होते. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांनी आपली पदक विजेती बंदूक उद्योगपती हर्ष गोयंका यांना त्यांची खेळाची आवड बघून दिली आहे.
थोडक्यात काय तर गुंतवणूकदारांनी अशा अपारंपरिक गुंतवणुकीचे मार्गदेखील निवडावेत आणि असे मार्ग निवडणारे फक्त चित्रपटात नसून प्रत्यक्षातसुद्धा आहेत. आपल्या देशामध्ये बंदुका किंवा लष्करी वस्तू बाळगण्यास बरीच बंधने आहेत. त्याला विशिष्ट परवाना घ्यावा लागतो आणि वरचेवर त्याची माहितीसुद्धा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी लागते मग तुम्ही बंदूक स्वसंरक्षणासाठी घेतली आहे किंवा गुंतवणूक म्हणून घेतली आहे. त्याला काही अपवादसुद्धा आहेत पण बऱ्याच ठिकाणी परवाना असावाच लागतो. त्यात अजून म्हणजे तलवारी किंवा इतर शस्त्रांमध्ये गुंतवणूकसुद्धा करू शकतो पण पुन्हा कायद्याची काळजी घ्यावी लागतेच. काही हौशी लोकांकडे आजसुद्धा जुन्या काळातील तलवारी त्यांच्या म्यानी आणि इतर जुनी लष्करी साधने आहेत.
अशा अपारंपरिक गुंतवणुकीमध्ये कमी काळात फायदे मिळतातच असे नाही आणि प्राप्तिकरामध्येसुद्धा काहीही सूट मिळत नाही, त्यामुळे त्याचा विचार करूनच गुंतवणूक करा. अजून एक म्हणजे त्यात फसवणूक होण्याचीसुद्धा शक्यता असते. जाणकार माणसांना खरी पुरातन काळातील बंदूक आणि त्याची प्रतिकृती यातील फरक समजतो. पण सामान्य गुंतवणूकदारांना तो समजेलच असे नाही. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार या वाटेला जाईलच असे नाही.
असो, चित्रपट इंटरनेटवर विनामूल्य उपलबध आहे. नीरज व्होरा यांनी दिग्दर्शित केलेला वर्ष २००६ चा हा चित्रपट हसवणारा असला तरी काही गुंतवणुकीचे सल्लेदेखील देऊन जातो फक्त तुमची बघण्याची दृष्टी हवी.
