वर्ष १९२६ मध्ये स्थापन झालेली, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी) ही वालचंद समूहाची प्रमुख कंपनी आहे. एचसीसी देशभरातील धरणे, बोगदे, पूल, जलविद्युत, अणुऊर्जा प्रकल्प, द्रुतगती महामार्ग आणि रस्ते, सागरी कामे, पाणीपुरवठा, सिंचन व्यवस्था आणि औद्योगिक इमारती यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अभियांत्रिकी आणि बांधकामात अग्रेसर आहे. कंपनीने भारताच्या २६ टक्के जलविद्युत क्षमतेत, त्याच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक ४,०३६ किमीचे रस्ते आणि द्रुतगती महामार्ग, ३९५ पूल आणि ३६० किमी प्रगत बोगद्यांत योगदान दिले आहे. कंपनीचे महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तराखंड, आसाम, भूतान इत्यादी ठिकाणी ३० प्रकल्प सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू आणि कोस्टल रोड हे एचसीसीने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
कार्यादेश:
अ) क्षेत्रनिहाय:
वाहतूक: ५३ टक्के
जल: २९ टक्के
पाणी: १४ टक्के
अणुऊर्जा: ४ टक्के
ब) राज्यनिहाय:

महाराष्ट्र: ३२ टक्के

उत्तराखंड: २२ टक्के

मणिपूर: ११ टक्के

मध्य प्रदेश : १० टक्के

गुजरात: १० टक्के

तमिळनाडू: ८ टक्के

राजस्थान: २ टक्के

इतर: ५ टक्के

डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने भारतातील मुख्य कामकाजावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘स्टाइनर एजी’मधील तिचा हिस्सा ‘युनिरेसोल्व एसए’, ‘इममोबिलियर होल्डिंग एसए’च्या (एम३) संलग्न कंपनीला विकला. कंपनीने मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षाचे तसेच तिमाहीचे निकाल जाहीर केले असून गेल्या तिमाहीत कंपनीने १,३९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीला २४१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. विद्यमान आर्थिक वर्षांत कंपनीने ५,६०३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११३ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (४७८ कोटी) हा कमी असला तरीही एचसीसी आघाडीवर राहील. कारण आगामी काळात कंपनीकडून भरीव कामगिरिची अपेक्षा आहे.

गेल्या तिमाहीत कंपनीने ५३४ कोटी रुपयांचे कर्ज फेडले असून त्याव्यतिरिक्त १३४ कोटी रुपयांचे कर्ज मुदतीआधीच फेडले आहेत. यामुळे कर्जाचा बोजा कमी होऊन व्याज खर्च कमी होईल. तसेच यंदाच्या पाहिल्याच तिमाहीत कंपनीला २५० कोटी रुपये मिळणार आहेत. कंपनीचे पाच प्रकल्प नुकतेच पूर्ण झाले असून आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीकडे ११,८५२ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत, तसेच सुमारे ३,५१३ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या बोलीसाठी एचसीसी पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनी सध्या सुमारे ३०,९५० कोटी रुपयांच्या आगामी योजनांच्या बोली प्राप्त करण्यासाठी चर्चा करत आहे.

भारतात आघडीवर असलेली एचसीसी आता नेपाळ, इस्रायल, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये संधी शोधत आहे. राष्ट्रीय दृष्टिकोन योजनेअंतर्गत नद्यांच्या क्षेत्रातील उदयोन्मुख आंतरजोडणीमध्ये सक्रियपणे संधींचा पाठपुरावा करत आहे. एचसीसी अणुऊर्जा क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्यासाठी उपकरणे उत्पादकांसोबत भागीदारी करेल.

सध्या ३० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर महाग वाटत असला तरीही एचसीसी एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

  हिंदुस्तान कन्स्ट्रकशन कंपनी लिमिटेड (बीएसई कोड ५००१८५)

संकेतस्थळ: www.hccindia.com

प्रवर्तक: वालचंद हिराचंद समूह

बाजारभाव: रु. ३०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: बांधकाम/ इन्फ्रा प्रोजेक्ट

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १८१.९४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक १६.७२

परदेशी गुंतवणूकदार १०.५७

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ६.८५

इतर/ जनता ६५.८६

पुस्तकी मूल्य: रु. ४.९८

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: —%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ०.६४

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७४९

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २०.८१

डेट इक्विटी गुणोत्तर: १.८५

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ०.९९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅईड (आरओसीई): २५.६%

बीटा: १.९

बाजार भांडवल: रु. ५,५४० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५८/२१

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.