आमच्या वाचाकंना तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीची ओळख करून द्या.

प्रशांत पिंपळे : माझ्या कारकिर्दीची सुरुवात १९९९ मध्ये आग्नेय आशियाई चलन संकटाच्या काळात झाली. माझी नेमणूक उत्तर प्रदेशातील लखनौ येथील सिडबी (SIDBI) मध्ये कॅम्पस रिक्रूटमेंटने झाली. माझी निवड प्रोजेक्ट फायनान्स विभागात झाली होती. पण मला मुंबईत परत यायचे होते. आणि मला मुंबईत परतण्याची संधी मिळाली. माझा ट्रेझरी-केंद्रित कल असल्याने लवकरच सारस्वत को-ऑप बँकेत दाखल झालो. त्या नंतर बँक ऑफ बहरीन अँड कुवेत (भारत) आणि आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांसारख्या विविध बँकांसाठी ट्रेझरी मॅनेजमेंटचे काम सांभाळले. २००४ मध्ये, मी निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने (पूर्वीचा रिलायन्स म्युच्युअल फंड) मला त्यांचे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंड्स व्यवस्थापित करण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे मी म्युच्युअल फंड उद्योगात दाखल झालो. निप्पॉन इंडिया, फिडेलिटी (इंडिया) आणि जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडांसारख्या विविध म्युच्युअल फंडांच्या रोखे गुंतवणूक करण्यात जवळपास दोन दशके घालवल्यानंतर, मी बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडात चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर – फिक्स्ड इन्कम या माझ्या सध्याच्या पदावर दाखल झालो. फंडांचे व्यवस्थापन करण्याच्या आणि बाजारातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याच्या या संपूर्ण दोन दशकांहून अधिक काळाने फंड व्यवस्थापनातील माझा अनुभव समृद्ध केला आहे.

एक निधी व्यवस्थापक म्हणून सध्याच्या बाजाराकडे कसे पाहता?

प्रशांत पिंपळे: वाढती जागतिक अनिश्चितता, वाढता भू-राजकीय तणाव आणि बदलत्या चलनविषयक धोरणाच्या अपेक्षांमुळे भारताच्या रोखे बाजार एका नाजूक स्थितीत आहे. भू-राजकीय घडामोडींमुळे, विशेषतः पश्चिम आशियातील घडामोडींमुळे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जागतिक स्तरावर महागाई वाढीची चिंता पुन्हा वाढली आहे आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये रोख्यांवरील परतावा (यील्ड) वाढला आहे. बाजारांनी व्याजदर कपातीला दीर्घकाळ विराम देण्याची किंवा प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून चलनविषयक धोरण आणखी कडक करण्याची शक्यता गृहीत धरायला सुरुवात केली आहे, विशेषतः जर चलनवाढ सुरूच राहिली तर, भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी, वाढलेल्या जागतिक परताव्याचे (यील्डचे) विलारीत परिणाम लक्षणीय आहेत, ज्यामुळे देशांतर्गत परतावा (यील्ड) आणि चलनावर दबाव येत आहे. भारतीय रुपयावर अवमूल्यनाला जागतिक बाजारपेठात वाढलेले व्याजदर हे सुद्धा एक कारण आहे. अंशतः जागतिक जोखीम टाळण्याची प्रवृत्ती आणि जास्त परतावा देणाऱ्या विकसित बाजारपेठेतील मालमत्तांमधून भांडवल काढून घेण्याकडे असलेला कल. तसेच भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मध्यवर्ती बनलेने अलीकडे उचललेल्या पावलांमुळे चलनास काही प्रमाणात आधार मिळण्याची अपेक्षा आहे. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचे, बाह्य वित्तपुरवठ्याच्या अटी सुलभ करण्याचे आणि परकीय चलन सुलभता वाढवण्याचे प्रयत्न कालांतराने व्यवहार चलनावरचा दबाव दबाव कमी करू शकतात. स्थिर भांडवली ओघामुळे रुपयामधील अत्यधिक अस्थिरता मर्यादित राहू शकते, ज्यामुळे आयातित चलनवाढीचा धोका कमी होईल आणि स्थूल आर्थिक स्थिरतेला आधार मिळेल.

अलीकडील काही तिमाहींमध्ये भारताच्या चलनवाढीच्या मार्गावर नियंत्रणाची चिन्हे दिसत असली तरी, वाढीचा धोका अजूनही कायम आहे. मध्यवर्ती बँकेने चलनवाढ व्यवस्थापन आणि विकासाचा विचार यांच्यात संतुलन साधत सावध आणि दक्ष भूमिका कायम ठेवली आहे. तथापि, वाढलेल्या वस्तूंच्या किमती, पुरवठ्यातील अनिश्चितता आणि यावर्षी कमी पर्जन्यमान अपेक्षित असल्याने चलनवाढीचा धोका प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या आणि धातूंच्या किमती दीर्घकाळ वाढलेल्या राहिल्यास देशांतर्गत रोख्यांवरील परतावा तुलनेने उच्च पातळीवर स्थिर राहू शकतो.

देशांतर्गत रोखे बाजार आगामी चलनवाढीची आकडेवारी, वित्तीय घडामोडी आणि जागतिक चलनविषयक धोरणाच्या संकेतांप्रति संवेदनशील राहण्याची शक्यता आहे. भारताच्या रोखे बाजाराच्या दृष्टिकोनाला आकार देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे भू-राजकीय संघर्षांच्या कालावधीमुळे उद्भवणारे वित्तीय परिणाम. भारताचे वित्तीय गणित वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींवर आणि अनुदानाचा भार किंवा खर्चाच्या कोणत्याही संभाव्य वाढीवर अवलंबून आहे. एकंदरीत, भारताचा रोखे बाजार मजबूत देशांतर्गत घटकांच्या पाठबळावर, परंतु जागतिक अनिश्चिततेच्या आव्हानांसह, सावध आशावादाच्या टप्प्यातून वाटचाल करेल अशी अपेक्षा आहे. चलनवाढ, वित्तीय व्यवस्थापन, चलनाचे स्थैर्य आणि मध्यवर्ती बँकेच्या धोरणात्मक कृती यांच्यातील परस्परसंबंधच आगामी तिमाहींमध्ये उत्पन्नाची दिशा निश्चित करेल.

एक निधी व्यवस्थापक म्हणून तुम्ही गेल्या वीस वर्षात काय शिकलात?

प्रशांत पिंपळे: भारतीय रोखे बाजारपेठा, विशेषतः म्युच्युअल फंडाच्या दृष्टिकोनातून, गेल्या काही दशकांमध्ये पत विषयक समस्या आणि त्याच्या अनुषंगाने नियामक बदलांच्या मंथनातून परिपक्व झाल्या आहेत. या प्रवासाने तरलता व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आणि फंड गुंतवणुकी बाबत स्पष्टता यांसारखे महत्त्वपूर्ण धडे दिले आहेत, ज्याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला आहे. आपल्या गुंतवणूक कलावधीनुसार फंड निवड करण्यात अधिक स्पष्टता आली आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापन हा गुंतवणूकदारांच्या पैशांचे त्यांच्या जोखीम-नफा चौकटीच्या संदर्भात व्यवस्थापन करण्याचा एक गंभीर व्यवसाय आहे. फंड व्यवस्थापन व्यवसायाबद्दल मला एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे, दररोज परिस्थितीत बदलत असते. त्यानुसार रोज नावीन्यपूर्णतेने काम केले जाते. कोणतेही काम प्रलंबित ठेवता येत नाही. रोज उगवणारा सूर्य जसा कालच्यासारखा नसतो तशी रोजची बाजारपेठ एक नवीन संधी असते. आणि या संधीचे सोने करण्याची कौशल्य तुम्हाला आत्मसाद करायचे असते. आणि बाजारपेठेशी जुळवून घेण्याची हीच प्रक्रिया तुम्हाला या व्यवसायात गुंतवून ठेवते.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना काय संदेश द्याल?

प्रशांत पिंपळे: योग्य मालमत्ता वाटप हा कोणाच्याही गुंतवणूक प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे समभाग रोखे जिन्नस आणि इन्व्हिट (INVITs) यांसारखे सर्व मालमत्ता वर्ग वित्तीय ध्येये साध्य करण्यासाठी अत्यंत समर्पक ठरतात. अल्पकालीन ते मध्यमकालीन ध्येये साध्य करण्यासाठी रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे वाटप पोर्टफोलिओचा एक अविभाज्य भाग बनले आहे. ही ध्येये सामान्यतः कोणत्याही गुंतवणूकदाराच्या तरलतेची गरज, रोखीची आवश्यकता आणि इतर मध्यम-मुदतीच्या उद्दिष्टांशी संबंधित असतात. गुंतवणूकदारांना त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या वेळी यापैकी कोणत्याही मालमत्ता वर्गाची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे, सर्व प्रकारच्या ध्येयांसाठी कोणत्याही एकाच मालमत्ता वर्गावर अवलंबून राहणे ही एक शहाणपणाचे लक्षण नाही. आपल्या गरजानुसार योग्य मालमत्ता वाटप असणारा पोर्टफोलीओ ही अतिआवश्यक गरज बनली आहे.

प्रशांत पिंपळे, मुख्य गुंतवणूक अधिकारी – फिक्स्ड इन्कम, बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड

संकलन : वसंत कुलकर्णी
संकल्पना : गौरव मुठे