Pune IT worker builds Rs 9 Cr : शेअर बाजारातून पैसे कमवायचं म्हटलं की योग्य फंड किंवा स्टॉक्स निवडण्याचे ज्ञान आवश्यक मानले जाते. आणि हे खरंही आहे. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाचं सूत्र म्हणजे गुंतवणुकीतील शिस्त आहे. पुण्यातील एका तरुणाने कोणताही विशेष अभ्यास न करता निवडलेल्या अॅव्हरेज फंडातून तब्बल ९ कोटी रुपयांची संपत्ती उभी केली आहे. सुधीर दंडोतिया, असं या ३२ वर्षीय तरुणाचं नाव असून त्याने गुंतवणूक सुरू केल्यापासून एकही एसआयपी चुकवलेली नाही. सुधीर स्वतः सांगतो, “मी काही गुंतवणुकीचा तज्ज्ञ नाही. माझ्या गुंतवणुकीचा भाग वगळला, तर माझे रिटर्न्स अगदी सरासरी आहेत.” तरीही आज तो कोटींचा मालक आहे.
दरमहा ३०,००० रुपये पगार ते ५२ लाखांचे वार्षित पॅकेज
अलीकडच्या काळात पगार वाढला तरी बचत किंवा गुंतवणूक वाढत नसल्याची तक्रार तरुण करतात. कारण, लाईफस्टाईल इन्फ्लेशन (पगारासोबत वाढणारा राहणीमानाचा खर्च) अनेकांची कमाई खात आहेत. इथेच सुधीरने पहिली लढाई जिंकली आहे. इंदौरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या सुधीरने २०१७ मध्ये भोपाळमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. सुरुवातीला ‘ॲक्सेंचर’ कंपनीत अवघ्या ४.५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर त्याने नोकरी सुरू केली. त्यानंतरच्या ९ वर्षांत त्याच्या पगारात तब्बल ११.६ पट वाढ झाली.
- २०१७ पहिली नोकरी : ४.५ लाख
- २०२० दुसरी नोकरी : १८ लाख
- २०२२ तिसरी नोकरी (पुणे) : ४० लाख
- २०२६ सध्याची नोकरी : ५२ लाख
पगार वाढल्याबरोबर कार, सुट्ट्या किंवा महागड्या वस्तूंवर खर्च वाढवण्याचा मोह बहुतेकांना होतो. मात्र, सुधीरने गेल्या ४ वर्षांत आपला कौटुंबिक खर्च महिना २ लाख रुपयांवरच नियंत्रित ठेवला.
काय आहे ‘फर्स्ट-डिडक्ट’ पद्धत?
‘फर्स्ट-डिडक्ट’ (First-Deduct) हा प्रामुख्याने बँकिंग, कर्ज किंवा विमा क्षेत्रात वापरला जाणारा एक नियम किंवा पद्धत आहे. याचा सोपा अर्थ ‘आधी वजा करणे’ असा होतो. पगार हातात आल्यावर आधी बचत आणि गुंतवणूक झाली पाहिजे आणि उरलेल्या पैशातून खर्च ठरवला पाहिजे,” हे सुधीरचे साधे सूत्र आहे.
- महिन्याची SIP : १.५ लाख रुपये
- गृहकर्ज हप्ता : १.६१ लाख रुपये
- एकूण महिना गुंतवणूक/कर्जफेड : ३.११ लाख रुपये
सुधीरची पत्नी देखील वरिष्ठ IT पदावर कार्यरत असून घराच्या खर्चात मोठा वाटा उचलते. यामुळे सुधीरला आपली संपूर्ण कमाई गुंतवणुकीकडे वळवणे शक्य झाले.
सुधीरचा ‘९ कोटीं’चा पोर्टफोलिओ
- म्युच्युअल फंड : २.५६ कोटी रुपये
- सोने (SGB व भौतिक सोने) : ६४ लाख रुपये
- फिक्स्ड डिपॉझिट व बँक शिल्लक : ५७ लाख रुपये
- पीपीएफ व ईपीएफ : २४ लाख रुपये
- थेट शेअर्स : २३ लाख रुपये
- एकूण आर्थिक संपत्ती : ४.३ कोटी रुपये
- पुण्यातील फ्लॅट (सध्याचे मूल्य) : ४.७ कोटी रुपये
- एकूण मालमत्ता : ९ कोटी रुपये
सुधीर यांच्यावर अजूनही २०२१ मध्ये घेतलेल्या घराचे कर्ज थकीत आहे. कर्ज वजा करता त्याची खरी ‘निव्वळ संपत्ती’ सुमारे कोटी रुपयांच्या आसपास आहे.
गुंतवणुकीतील महत्त्वाचे धडे
- चांगला फंड निवडण्यापेक्षा जास्तीत जास्त रक्कम बाजारात गुंतवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सुधीर यांच्या उदाहरणातून दिसून येते. दरमहा १.५ लाख रुपयांची मोठी SIP हीच त्याच्या संपत्तीचा मुख्य पाया ठरली.
- सुधीर यांनी ११ वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त फंड निवडल्याने पोर्टफोलिओचा परतावा निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या सरासरी परताव्यासारखाच मिळतो. सुधीर यांच्या बाबतीतही हेच घडले. पण सातत्याने केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे सरासरी परतावा मिळूनही त्याची संपत्ती वेगाने वाढली.
- केवळ शेअर बाजाराच्या भरवश्यावर न राहता २०२१ मध्ये सुधीर यांनी पुण्यात २.५ कोटी रुपयांचा अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतला. ५० लाख स्वतःचे लावून २ कोटींचे कर्ज घेतले. आज ५ वर्षांत त्या मालमत्तेचे मूल्य ४.५ ते ४.७ कोटींच्या घरात पोहोचले आहे.
४० व्या वर्षी २५ कोटींचे लक्ष्य!
वयाच्या ४० व्या वर्षी (२०३४ पर्यंत) २० ते २५ कोटींची संपत्ती निर्माण करून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतंत्र काम करण्याचे सुधीर यांचे उद्दिष्ट आहे.
