आज ज्यांना ‘रिटेल किंग’, ‘डी मार्टचा निर्माता’ अशा वेगवेगळ्या बिरुदांनी ओळखले जाते, त्या राधाकिशन दमाणी यांचा जन्म राजस्थानात बिकानेर येथे १२ जुलै १९५५ ला झाला. कुमारवयीन राधाकिशन यांनी मुंबई गाठली. मुंबईला आल्यानंतर एकाच खोलीत सर्वजण राहत होते. कॉमर्स शिकण्यासाठी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण एका वर्षातच शिक्षण सोडून दिले. शिक्षण सोडून दिले असे म्हणण्यापेक्षा, पुस्तकी शिक्षण सोडून व्यवहारातले शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
व्यवसायात अनेकांना आपल्या वडिलांनी जो व्यवसाय सुरू केला तोच व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे वाटते. तर काही पूर्णपणे नव्या व्यवसायात जाण्याचा विचार करतात. दमाणी यांच्या वडिलांचा बॉल बेअरिंगज विक्रीचा व्यवसाय शेअर बाजाराच्या इमारतीच्या जवळच होता. दमाणी यांनी ठरविले की, आपण वडिलांचा व्यवसाय पुढे चालवायचा नाही.
आणखी वाचा-बाजारातली माणसं : ब्रह्मा, विष्णू, महेश – शशिधर जगदीशन
ठरविल्याप्रमाणे ते १९९० ला शेअर दलाल बनले. १९९५ ला एचडीएफसी बँकेचे मोठ्या प्रमाणात शेअर्स त्यांनी खरेदी केले. पण या शेअरची खरेदी करण्यासाठी पैसा कोठून आला? याचे उत्तर मोठे रंजक आहे. अनेक शेअर दलाल तेजी करून पैसा कमावतात. मात्र दमाणी यांनी हर्षद मेहताच्या काळात मंदी करून पैसा कमावला. त्या कालावधीत मंदी करून पैसा कमावणे फार धाडसाचे होते. पण स्वतंत्र आणि वेगळा विचार करणे हे राधाकिशन दमाणी यांचे वैशिष्ट्य आहे.
बाजारात पैसा कमावला. १९९९ ला नेरळ येथे अपना बाजार फ्रँचायजी घेतली. परंतु हे काम करत असताना त्यांचे समाधान झाले नाही. कारण अपना बाजाराने आखून दिलेल्या चौकटीत व्यवहार करण्याची त्यांची तयारी नव्हती.
पुन्हा डोक्यात विचार चालू होते. पैसा कमवायचा हे डोक्यात होते. २००० ला शेअर बाजारापासून विभक्त झाले. डी मार्टची सुरुवात केली. पहिले स्टोअर्स २००२ ला पवई येथे सुरू केले आणि २०१० पर्यंत २५ दुकानांची एक साखळी निर्माण केली. या वाटचालीतूनच २०१७ ला ॲव्हेन्यू सुपर मार्ट्स लिमिटेड (डी मार्ट) कंपनीच्या शेअर्सची विक्री ‘आयपीओ’च्या माध्यमातून केली. सात वर्षांत प्रचंड पैसा कमावला. साहजिकच या पैशांची गुंतवणूक कुठे करायची, हा प्रश्न उभा राहिला. मग पुन्हा नव्याने शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवायला सुरू केली.
आणखी वाचा-बाजार रंग : शास्त्र असतं ते! ‘थ्रिल’ नाही…
प्रवर्तकाने स्वतःच्या कंपनीचे शेअर्स विकावे का? हा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही. ॲव्हेन्यू सुपर मार्ट्स या कंपनीचे शेअर्स असणे याचा अर्थ त्यांच्या हातात नोटा छापण्याचे मशीन आले होते. वडिलांचा बॉल बेअरिंग्जचा व्यवसाय होता. म्हणून त्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. पण तसे त्यांनी केले नाही. कंपन्यांचा शोध घ्यायचा, कुठे जास्त पैसा कमावण्याची संधी उपलब्ध आहे हे त्यांनी नेमके हेरले. मग व्हीएसटी इंडस्ट्रिज ही त्यांची निवड ठरली. चारमिनार सिगारेट बनवणारी कंपनी आयटीसीचा जेव्हा बाजारात जास्त बोलबाला होता अशा वेळेस व्हीएसटी इंडस्ट्रीज या शेअर्सची फारशी चर्चा बाजारात अजिबात होत नव्हती. बाजारात जास्त पुरवठासुद्धा नव्हता, अशा वेळेस या कंपनीचे शेअर्स त्यांनी घेतले. मग इंडिया सिमेंटचे शेअर्स घेतले. २०२० ला आंध्र पेपर या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवला. या कंपनीला पेपर उद्योगातली एसीसी असे म्हंटले जायचे.
बाजारात शेअर्सची फारशी उपलब्धता नाही असे शेअर्स शोधणे ते सांभाळणे आणि योग्य वेळी त्यांची विक्री करणे हे कौशल्याचे काम असते. अगदी अलीकडे २० सप्टेंबरला ४.४ कोटी रुपयांच्या व्हीएसटी शेअर्सची त्यांनी विक्री केली. काय कारण असावे व्हीएसटीने पहिल्यांदाच बोनस शेअर्स वाटप करणे, एक शेअरला १० शेअर देणे आणि ६ सप्टेंबर तारीख ठरविणे, असे सगळे योगायोग म्हणायचे का? या प्रश्नाला उत्तर नाही पण राधाकिशन दमाणी यांनी पैसा कमावला ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा वेगळा विचार हेच त्याचे मूळ. या शेअर विक्रीच्या अगोदर २०२० ला स्वतःच्याच कंपनीच्या शेअर्सची विक्री करून अतिशय चांगल्या वस्तीत मुंबईला १ हजार २३४ कोटी रुपये खर्च करून २८ फ्लॅट्स खरेदी केले. दमाणी यांना तीन मुले आहेत. पण २८ फ्लॅट्स म्हणजे संपूर्ण बिल्डिंगची खरेदी झाली. राधाकिशन दमाणी यांना राकेश झुनझुनवाला यांचे गुरू असेही म्हंटले जाते.
अडवाणी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स, भागीराधा केमिकल ॲण्ड इंडस्ट्रीज, ॲप्टेक, सुंदरम फायनान्स, मंगलम ॲग्रॉनिक्स अशा काही कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत. अर्थातच मुख्य कंपनी ॲव्हेन्यू सुपर मार्ट्स.
आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : भाव वधारलेल्या कोळंबीची अव्वल निर्यातदार
आणखी एका शेअरचा स्वतंत्र उल्लेख केला पाहिजे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ही ती कंपनी. या कंपनीची नोंदणी काही कारणामुळे अडकली होती. परंतु या कंपनीचा शेअर्स विक्रीचा रस्ता आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये ज्यांनी नोंदणी होण्याच्या अगोदर शेअर्स खरेदी केलेले होते त्यांना प्रचंड मोठा लाभांश, मोठ्या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप हे फायदे मिळणार आहेत. आणि नंतर मग शेअरची नोंदणी झाल्यानंतर नवीन गुंतवणूकदारांना काय मिळणार यांची वाट बघायची.
वरील सर्व उदाहरणे देण्याचे मुख्य कारण असे की, बाजारात फक्त तेजी करूनच पैसा कमावता येतो असे अजिबात नाही. जेव्हा बाजारात तेजीची प्रचंड लाट असते अशा वेळेस मंदीवालासुद्धा बाजारासाठी उपयुक्त असे काम करीत असतो. तेजी करणारा गुंतवणूकदार शेअरची खरेदी केल्यानंतर बाजार खाली आला तर, ‘मी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून गुंतवणूक केलेली आहे’ अशा प्रकारे स्वतःच स्वतःचे समाधान करून घेतो. याउलट खरे कौशल्य मंदी करणाऱ्याकडे असते. या व्यवहार पद्धतीला अर्थातच जास्त कौशल्य लागते. मला बाजाराच्या खरेदी-विक्रीशी, उलाढालीशी काहीही घेणे-देणे नाही. मला पैसा कमवायचा तेजी करून किंवा मंदी करून अशी विचारसरणी असलेले अनेक राधाकिशन दमाणी या बाजारात आहेत. आणि म्हणून चढ-उतार हा बाजाराचा स्थायीभाव आहे.
तंत्रज्ञानात असे काही बदल होत आहेत की काही उद्योग अचानकपणे कोसळू शकतात. कदाचित काही वर्षांनी डी मार्टसारखा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या अडचणीत येऊ शकतात. मग त्यावेळेस आपल्या गुंतवणुकीत प्रचंड नुकसान सहन करायचे की आज सुगीचे दिवस आहेत पैसा कमावण्याच्या संधी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करायचा? त्याचबरोबर सुरुवातीला एका खोलीत राहावे लागले होते ते दमाणी आता स्वतःचे मालकीचे प्रचंड मोठे घर बांधू शकतात हे बाजाराशी संबध असल्याने आणि जोखीम स्वीकारण्याचे धाडस दाखवल्यानेच होऊ शकते. आणि फक्त दमाणीच का? राजस्थानातून जुन्या काळी जुनी माणसे कलकत्त्याला गेली. कारण त्या ठिकाणी उलाढालीच्या संधी भरपूर होत्या. कलकत्त्याहून काही मंडळी मुंबईला आली. काय सांगावे ही मंडळी मुंबईहून देशाच्या कानाकोपऱ्यांत जाऊ शकतील. म्हणून पैसा कमावण्याची ईर्ष्या असलीच पाहिजे. तरच प्रगती होते बाजार कोणाचाही शत्रू नसतो, कुणाचाही मित्र नसतो. बाजार हा कल्पवृक्ष आहे. मागाल ते मिळेल या कल्पवृक्षाखाली बसून. येथे चहा मागण्याचा करंटेपणा करायचा नसतो तर अमृत मागायचे असते.