गुजरातमधील राजू इंजिनीअर्स लिमिटेडची स्थापना वर्ष १९८६ मध्ये झाली. कंपनी गुजरातमध्ये प्लास्टिक-एक्सट्रूजन मशिनरीचे उत्पादन करते तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार पर्याय प्रदान करते. आशियाई उत्पादकांमध्ये आणि भारतीय उपखंडात ‘ब्लोन फिल्म लाइन्स’, ‘शीट लाइन्स’, ‘थर्मोफॉर्मिंग’,‘एक्सट्रूजन कोटिंग’ आणि ‘लॅमिनेटिंग लाइन्स’मध्ये राजू इंजिनीअर्स अग्रणी आहे. कंपनीची लॅटिन अमेरिका, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आखाती देश, पूर्व आफ्रिका, ईशान्य आणि पश्चिम आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, आशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील ७० हून अधिक देशांमध्ये ५,००० हून अधिक आस्थापने आहेत.
उत्पादन श्रेणी
कंपनी राजकोट (गुजरात) येथील शापर येथे असलेल्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेद्वारे कार्यरत असून सहा वेगवेगळ्या विभागांमध्ये २६ हून अधिक उत्पादने तयार करते, ज्यात ‘मोनो आणि मल्टीलेयर ब्लोन फिल्म लाइन्स’, ‘मोनो आणि मल्टीलेयर एक्सट्रूजन कोटिंग’ आणि ‘लॅमिनेशन लाइन्स’, ‘मोनो आणि मल्टीलेयर शीट लाइन्स’, ‘पीव्हीसी सेगमेंट’, ‘थर्मोफॉर्मिंग’ आणि ‘पीएस फोम व्हॅक्यूम फॉर्मिंग मशीन्स’ आणि ‘क्रॉस लॅमिनेशन फिल्म लाइन’ यांचा समावेश आहे.
ग्राहकवर्ग
कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत युफ्लेक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल, बिन्नी वॅड्स, सुवी इंटरनॅशनल, सिंथेटिक पॅकेजिंग, अभिनव इंडस्ट्रीज, पॉलीकॅब, एस डी इंटरनॅशनल या कंपन्यांचा समावेश आहे. उत्तम गुणवत्तेमुळे कंपनीच्या वार्षिक व्यवसायात ६० टक्के वाटा पुन्हा मिळणाऱ्या कार्यादेशांचा असतो. वर्ष २०२५ मध्ये गुजरातचा सर्वोत्तम नियोक्ता ‘ब्रँड’ म्हणून राजू इंजिनीयर्सला मान्यता मिळाली आहे.
भागीदारी आणि विस्तारीकरण
- राजू इंजिनीअर्स लिमिटेड आणि कोहली प्रिंटिंग अँड कन्व्हर्टिंग मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील समन्वय. ‘एक्सट्रूजनपासून प्रिंटिंग’, ‘लॅमिनेटिंग’ आणि ‘स्लिटिंग’पर्यंत एकात्मिक उपाय प्रदान करून, ही युती कन्व्हर्टर्सना एकाच ठिकाणी सर्व सुविधा देईल आणि कार्यक्षमता सुधारेल.
- विस्तार उत्पादन पोर्टफोलिओ –
तुर्कीला आशियातील पहिली सात लेयर पूर्णपणे स्वयंचलित ‘ब्लोन फिल्म लाइन’ ▪ ‘एक्सपीएस शीट लाइन’साठी ‘कमोडोर इंक’. यूएसए (टेकनी-प्लेक्स इंक.) आणि ‘ब्लोन फिल्म लाइन’साठी होसोकावा अल्पाइन, जर्मनी यांच्याशी तांत्रिक सहकार्य ▪
- ‘थर्मोफॉर्मिंग’ उद्योगाच्या फायद्यासाठी ‘वंडरपॅक’ विलीनीकरण ▪ इटलीच्या बौसानो, प्लास्टिक पाइप उत्पादन उद्योगासह संयुक्त उपक्रम प्लास्टिक पाइप एक्सट्रूजन, ‘ग्रॅन्युलेशन आणि डब्ल्यूपीसी एक्सट्रूजन मशीन्स’च्या निर्मितीसाठी २०११ पासून इटलीच्या बाऊसानो अँड फिगलीसोबत तिचा संयुक्त उपक्रम आहे.
- मशिनरी विभागात धोरणात्मक अधिग्रहणासाठी एनबीआयओशी करार केला आणि जपानमधून ओकुमा मल्टस स्थापित केले, तसेच श्री यंत्रालय येथे मुख्य उत्पादन क्षमता मजबूत केली.
- फेब्रुवारी २०२५ मध्ये, कंपनीने ८० एकर जागेवर भारतातील पहिल्या विशेष उत्पादन पार्कच्या विकासाला सुरुवात केली.
- कंपनीने ‘क्यूआयबी प्लेसमेंट’द्वारे १६० कोटी रुपये उभारले
आहेत कोहली प्रिंटिंग अँड कन्व्हर्टिंग मशीन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ६० टक्के बहुसंख्य भागभांडवलात गुंतवणूक केली.
संशोधन आणि विकास
कंपनीने ‘राजू इनोव्हेशन सेंटर’ची स्थापना केली आहे, ही ‘डीएसआयआर’द्वारे मान्यताप्राप्त संशोधन आणि विकास सुविधा असून ग्राहकांना तिथे उत्पादनांची चाचणी घेता येते.
कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. डिसेंबर २०२५ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने ८८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १८ कोटी रूपयांचा नफा कमवला आहे. गेल्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत ५७ टक्के वाढ साध्य केली असून निव्वळ नफा दुपटीवर नेला आहे. कंपनीला आगामी वर्षांमध्ये १२ टक्के ते १५ टक्क्यांपर्यंत वाढीचा दर अपेक्षित आहे. कंपनी भारत, लॅटिन अमेरिका, आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे, तसेच ‘एक्सट्रूजन कोटिंग’ आणि ‘मल्टीस्टेशन थर्मोफॉर्मर्स’सारखी नवीन उत्पादने सादर करणार आहे. अनुभवी प्रवर्तक, अत्यल्प कर्ज आणि केवळ ०.२ बीटा असलेल्या या कंपनीचा शेअर सध्या ६४ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
राजू इंजिनीअर्स लिमिटेड (बीएसई कोड ५२२२५७)
संकेतस्थळ: www.rajoo.com
प्रवर्तक: राजेश दोशी
बाजारभाव: रु. ६४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इंजिनीअरिंग
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १७.८७ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६०.७०
परदेशी गुंतवणूकदार १.७५
बँकस्/ म्युच्युअल फंडस्/ सरकार ०.९९
इतर/ जनता ३६.५६
पुस्तकी मूल्य: रु.१८.३
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: १५%
प्रति समभाग उत्पन्न: रु.३.५९
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.१
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०५
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ३८.३
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): ३२.६२%
बीटा: ०.२
बाजार भांडवल: रु. ११४२ कोटी (मायक्रो स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १७३/५९
गुंतवणूक कालावधी : २४ महिने
Stocksandwealth@gmail.com
- हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
- प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

