आशीष थत्ते
Sales vs Marketing Difference to boost your corporate career: कंपनीच्या अनेक कार्यांपैकी एक म्हणजे विक्री अर्थात सेल्स. आपण लहानपणापासून आपल्या घरी येणाऱ्या अगदी उदबत्तीपासून कित्येक वस्तू विकणाऱ्या लोकांना बघितले आहे. आता कुणी फारसे येत नाही कारण हल्ली सगळीकडे वॉचमन असतात आणि फोनमुळे कुणी घरी येत नाही. त्यामुळे फोन करून विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कंपनीच्या याच कार्याची ओळख करून देणारा चित्रपट म्हणजे रणबीर कपूरचा रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विक्री आणि विपणन म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग यांच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
मार्केटिंग/विपणन म्हणजे, उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना उत्पादन खरेदी करण्यासाठी आकर्षित करणे, नाममुद्रेची (ब्रँड) ओळख निर्माण करणे आणि उत्पादनाची मागणी वाढवणे. मग माध्यम काहीही वापरू शकतो जसे समाज माध्यम (सोशल मीडिया), टीव्ही जाहिराती, होर्डिंग्ज, आणि डिजिटल मार्केटिंग. सेल्स/विक्री म्हणजे मार्केटिंगमुळे आकर्षित झालेल्या ग्राहकांचे समाधान करून, त्यांना तुमचे उत्पादन/सेवा विकणे आणि पैसे गोळा करणे, थेट महसूल मिळवणे आणि विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणे. यात वन-टू-वन मिटिंग, कॉल्स, आणि रिटेल दुकानांमधील विक्री. मार्केटिंग हे बाजारातील लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करते (उदा. लोकांना काय हवे आहे?).सेल्स हे कंपनीच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करते (उदा. जास्तीत जास्त उत्पादने कशी विकावीत?).मार्केटिंग ही प्रक्रिया दीर्घकालीन असते, तर सेल्स हा अल्पकालीन टप्पा आहे. कंपन्यांमध्ये ही दोन्ही कामे करणारे वेगळे लोक असतात.
चित्रपटात फक्त विक्रीवरती लक्ष केंद्रित दिसते. नुकताच कसेबसे उत्तीर्ण होऊन पदवी मिळवलेला रणबीर नोकरीच्या शोधात एवायएस या कंपनीत जी कम्युटर विकणे आणि बिघडल्यास त्याची दुरुस्तीची सेवा देण्यात अग्रेसर असते तिथे रुजू होतो. तिथे सेल्समन म्हणून मुलाखत देताना सार्वत्रिक विचारला जाणार प्रश्न त्याला विचारला जातो, तो कुठला त्यासाठी तुम्ही चित्रपट बघा. काही दिवसातच सभ्यतेमुळे त्याच्यावर गच्छन्तीची वेळ सुद्धा येते. मग तो कंपनीतील कमतरता शोधून काढतो ती म्हणजे वेळेवर आणि चांगली सेवा न पुरवता येणे. तो एवायएस कंपनीतीलच विविध संसाधने वापरून आपली रॉकेट सेल्स कॉर्पोरेशन अशी स्वतःची कंपनी सुरु करतो, त्यात त्याला इतर ४ साथीदार त्याच कंपनीतील मिळतात. विक्री करणारी माणसे काहीही विकण्यात पटाईत असतात हे आपण जाणतोच. आपण सुद्धा त्याचे बऱ्याच वेळेला बळी पडतो वस्तू किंवा सेवा विकत घेतो आणि आपल्याला हवी तशी सेवा न मिळाल्याने निराश सुद्धा होतो. रणबीर विक्रीसाठी जी आश्वासने देतो ती गिऱ्हाईकांना सुद्धा अविश्वसनीय वाटतात. तो एवायएसच्या जुन्या सेल्सकडे जातो आणि जे एवायएस देऊ शकत नाही अशा गोष्टी देऊ करतो ते सुद्धा करारावर सही करून. अर्थातच चित्रपट असल्याने त्या गोष्टी तो देऊ देखील शकतो. आपण सेवा किंवा वस्तू विकत घेतो आणि मग तो विक्री करणारा माणूस आपल्याला कधीच भेटत नाही!
विक्री हि एक कला आहे जी पुस्तकातून शिकल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात अनुभवातून अधिक समृद्ध होते. समोरचा काय बोलतोय, त्याचा पूर्वेइतिहास काय आहे, सध्या तो कुठल्या परिस्थितीतून जातोय याची माहिती घेऊन मग आपले उत्पादन किंवा सेवा विकावी लागते. रणबीर जेव्हा पहिल्यांदा त्याच्या बॉसबरोबर कम्युटर विकायला जातो तेव्हा याचे अचूक चित्रण केले आहे. समोरच्याला आपले उत्पादन घेण्यासाठी त्याचे मन वळवावे लागते त्यासाठी कल्पनेने दुसर्याच्या अंतरंगात शिरुन त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत सेल्समनमध्ये असावी लागते. चित्रपट बघताना आणि सवांद ऐकताना याची पदोपदी आठवण येते. चित्रपटाच्या कित्येक प्रसंगात सेल्समन विक्री करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे दाखवले आहे. अगदी गिऱ्हाईकाने सांगितले की, मी मेलो तरी तुमच्या कंपनीला कार्यादेश देणार नाही, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच गिऱ्हाईकाकडे जाऊन तुम्ही मेलात का हे बघायला आलो, हे सांगण्याची हिम्मत करणाराच यशस्वी विक्रेता होऊ शकतो. चित्रपटात कंपनीतले सगळे सेल्समन जेव्हा आपापसात बोलतात तेव्हा कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांची भाषा वापरली आहे जी प्रत्यक्षात सुद्धा ऐकायला मिळते. प्रतिस्पर्धी कंपनीची माहिती ठेवणे त्यांचे सेल्समन काय आणि कसे विकतात याची माहिती सुद्धा ठेवावी लागते जे चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने दाखवले आहे.
चित्रपटातील एक प्रसंगात रॉकेट कॉर्पोरेशन ३२,००० रुपयांना विकणारा कम्युटर २६,००० रुपयांत विकल्याचे एवायएसच्या मालकाला कळते. अतिशय छोटाशा प्रसंगामध्ये लागत लेखनाचे महत्त्व समजून जाते. तुम्ही जर आपल्या वस्तूंचे आणि सेवांचे योग्य कॉस्टिंग केले नाही तर तुमचे प्रतिस्पर्धी कमी भावात विकून तुमच्या विक्री वर परिणाम करू शकतात.
रणबीर कपूर आणि प्रेम चोप्रा फक्त हे दोनच नावाजलेले कलाकार असताना चित्रपटाला केवळ कथेच्या जोरावर ५५व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तीन नामांकने आणि १ पुरस्कार मिळाला. असो चित्रपट जरूर पहा विशेषतः ज्यांना विक्री किंवा विपणन या व्यवस्थापनातील शाखेत कारकीर्द करायची आहे, त्यांनी तर नक्कीच पहा पण अर्थातच वित्तीय नजरेतून!
‘रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर’ हा चित्रपट फक्त कॉर्पोरेट जगतावर आधारित नसून, त्यातून पैसा, व्यवसाय आणि आर्थिक नियोजनाचे अतिशय मोलाचे धडे मिळतात.
१. ग्राहकाचे समाधान हीच खरी संपत्ती
चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा डायलॉग आहे: बिझनेस नंबर नही बिझनेस लोग है (व्यवसाय म्हणजे केवळ आकडे नाहीत, तर माणसे आहेत).
आर्थिक धडा: जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांना प्रामाणिक सेवा देता, तेव्हा ते तुमच्याशी जोडले जातात. व्यवसायात त्वरित नफ्यामागे धावण्यापेक्षा ग्राहकांचा विश्वास जिंकणे ही दीर्घकालीन आर्थिक संपत्ती ठरते.
२. नैतिकतेने कमावलेला पैसा टिकतो
हरप्रीतची मूळ कंपनी ‘एव्हीएस’ ही लाच देऊन आणि ग्राहकांना फसवून जास्तीत जास्त नफा कमावत होती. पण रॉकेट सेल्सने प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला.
आर्थिक धडा: चुकीच्या मार्गाने किंवा शॉर्टकटने कमावलेला पैसा हा तात्पुरता आनंद देऊ शकतो, पण दीर्घकाळात तो तुमचे आर्थिक नुकसान आणि नाममुद्रेची अर्थात ब्रँडची किंमत शून्य करतो. नैतिक व्यवसाय हाच शाश्वत आर्थिक विकास देतो.
हा चित्रपट आपल्याला शिकवतो की पैशाच्या मागे धावण्यापेक्षा ‘मूल्य’ निर्माण करण्यावर भर द्या, पैसा स्वतःहून तुमच्याकडे येईल!
