SGB Premature Redemption Date : परताव्याच्या बाबतीत सोन्याने सलग पुन्हा एकदा शेअर बाजाराला धोबीपछाड दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१९ मध्ये गुंतवणूक केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँड धारकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. SGB २०१९-२० सीरीज-व्ही’ मधील गुंतवणूकदारांना आता मुदतपूर्व पैसे काढण्याची संधी मिळणार आहे. या गुंतवणुकीने अवघ्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या योजनेतून बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदारांना मूळ रकमेवर तब्बल ३०२ टक्के नफा मिळणार आहे.
१५ एप्रिलला मिळणार पैसे काढण्याची संधी
भारत सरकारच्या सप्टेंबर २०१९ मधील अधिसूचनेनुसार, सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची मुभा दिली जाते. ही सुविधा केवळ व्याज देय असलेल्या तारखांनाच उपलब्ध असते. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेने १५ एप्रिल २०२६ ही तारीख मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांना आता नफा वसूल करायचा आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
पैसे काढण्यासाठी किंमत कशी ठरते?
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडकडून प्रसिद्ध होणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या आधारे रिडेम्प्शन किंमत ठरवण्यात आली आहे. रिडेम्प्शनच्या तारखेपूर्वीचे तीन कामकाजाचे दिवस (९ एप्रिल, १० एप्रिल आणि १३ एप्रिल २०२६) विचारात घेण्यात आले आहेत. ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी क्लोजिंग किमतीनुसार, आता १५,००९ रुपये प्रति युनिट असा दर निश्चित करण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांची चांदी!
ऑक्टोबर २०१९ मध्ये जेव्हा ही विशेष सीरीज लाँच करण्यात आली होती, तेव्हा ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्यांना एका युनिटसाठी केवळ ३,७३८ रुपये मोजावे लागले होते. आज पाच वर्षांनंतर ही किंमत १५,००९ रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ मूळ गुंतवणुकीच्या रकमेत सुमारे ४ पटीने वाढ झाली आहे. ५ वर्षांत तब्बल ३०२% परतावा मिळाला आहे. या परताव्याशिवाय गुंतवणूकदारांना वर्षाला मिळणारे २.५०% व्याज वेगळे मिळाले आहे.
