फेब्रुवारी २०२५ पासून रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात करण्यास सुरुवात केली. मागील वर्षभरात रिझर्व्ह बँकेने रेपोदरात १.५० टक्के कपात केली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये चलनवाढीचा दर १.३३ टक्के होता, जो भारताच्या दीर्घकालीन सरासरी महागाई दराच्या तुलनेत बराच खाली आहे. चांगल्या पावसामुळे आलेल्या भरघोस पिकांमुळे अन्नधान्य चलनवाढ उणे २.७१ टक्क्यांवर घसरली आहे. रिझर्व्ह बँकेचा महागाई दराचा उर्वरित आर्थिक वर्ष २०२६ साठीचा अंदाज ४.२४ टक्क्यांचा असून २०२७ मध्ये महागाईच्या दरात थोडीशी घसरण होऊन ४.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. वस्तू आणि सेवादरांतील (जीएसटी) कपातीनंतर कमी झालेल्या किंमती सामान्य होऊ लागलेल्या दिसत आहेत.
मध्यम-मुदतीत (आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत) महागाईचा दर ४ टक्क्यांच्या वर जाणार नाही. सध्याच्या या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेचे धोरण वृद्धीला प्राधान्य देणारे आहे. या परिस्थितीत व्याजदरांबाबत रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. रिझर्व्ह बँकेचा सध्याचा महागाई दर आणि रेपोदर यांच्यात ३.५० टक्के आणि भविष्यातील महागाईचा अंदाजित दर आणि रेपोदर यांच्यात १ ते ०.७५ टक्के इतका फरक आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक पुढील २४ ते ३० महिने रेपोदर बहुधा स्थिर राखेल, असा अंदाज आहे. जर अर्थव्यवस्थेत समाधानकारक वृद्धी दिसली नाही तर कदाचित व्याजदरात कपात होईल किंवा महागाई वाढली तर व्याजदर वाढवावे लागतील.
‘डायनॅमिक बाँड फंड’ म्हणजे काय?
‘डायनॅमिक बाँड’ फंड म्हणजे गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला (ओपन-एंडेड) रोखे गुंतवणूक करणारा फंड. हा फंड विविध कालावधींसाठीच्या कंपन्यांनी (कॉर्पोरेट) आणि सरकारने विकलेल्या विविध पत राखणाऱ्या रोख्यांत गुंतवणूक करतात. ‘डायनॅमिक बाँड फंडां’चे मुख्य उद्दिष्ट वाढत्या आणि घसरत्या व्याज चक्राच्या दोन्ही परिस्थितींमध्ये इष्टतम ‘ड्युरेशन’ (उर्वरित कालावधी) राखून परतावा मिळविणे आहे. ‘डायनॅमिक बाँड फंडां’मध्ये उर्वरित मुदतीबाबत भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने निधी व्यवस्थापकांना कोणतीही मर्यादा घातलेली नाही. निधी व्यवस्थापक व्याजदरांतील बदलांनुसार कोणत्याही मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करू शकतात.
‘आयटीआय डायनॅमिक बाँड फंड’
‘आयटीआय डायनॅमिक बाँड’ फंडाची सुरुवात १४ जुलै २०२१ रोजी झाली. सुरुवातीपासून विक्रांत मेहता हे फंडाचे निधी व्यवस्थापक होते. ते जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडात दाखल झाल्यावर अल्प कालावधीसाठी फंडाच्या व्यवस्थापनाची सूत्रे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया यांच्याकडे होती. लौकिक बागवे यांची फंड घराण्याने जानेवारी २०२५ मध्ये रोखे गुंतवणुकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यापासून फंड व्यवस्थापनाची सूत्रे त्यांच्याकडे आली आहेत. लौकिक बागवे यांना एकूण २५ वर्षांचा रोखे व्यवस्थापनाचा अनुभव आहे. ‘आयटीआय म्युच्युअल फंडा’त दखल होण्याआधी ते १७ वर्षे ‘डीएसपी म्युच्युअल फंडा’त निधी व्यवस्थापक होते. मागील दहा वर्षांची त्यांची कामगिरी सोबतच्या कोष्टकात दिली आहे.
कॅलेंडर -फंड गट- निधी व्यवस्थापकाने
वर्ष- सरासरी -मिळविलेला परतावा
२०१६- ६.५५- ९.०४
२०१७- ८.११- ९.९३
२०१८ -०.५६- ४.१२
२०१९- ७.५७- ७.९१
२०२०- ८.६७- १२.९३
२०२१ -८.०२- ८.९३
२०२२ -२.६८- ५.३६
२०२३- ८.८० -१२.३५
२०२४- ९.५७ -१२.०१
२०१५ -७.५७- ७.९१
$ फंड प्रभाव : इक्वल वेट
विस्तृत बाजारापेक्षा सरस परतावा मिळविण्याचा त्यांचा लौकिक आहे. ‘डायनॅमिक बाँड फंड’मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी निधी व्यवस्थापकाचे कौशल्य लक्षात घेणे गरजेचे असते. ‘डायनॅमिक बाँड फंडां’च्या कामगिरीमध्ये निधी व्यवस्थापकाचे कौशल्य खूप महत्त्वाचे असते. बाजाराचा (व्याजदराचा) अंदाज बांधून वेगाने ‘डयुरेशन’ वाढविणे किंवा कमी करणे यावर फंडाचा परतावा ठरतो. वेगवेगळ्या कालावधीसाठी केलेले मालमत्तेचे वाटप आणि निवड ही निधी व्यवस्थापकाचे व्याजदरातील हालचालींबद्दलच्या अंदाज बांधण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते आणि जर व्याजदरातील बदलांची त्यांची अपेक्षा रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेशी सुसंगत नसेल त्याचा फंडावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. निधी व्यवस्थापकाची व्याजदर आणि रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाबाबत निधी व्यवस्थापकाची वेगवेगळ्या व्याजदर आवर्तनात कामगिरी तपासणे महत्त्वाचे आहे. लौकिक बागवे यांची वरील दहा वर्षांची कामगिरी त्यांचे व्याजदराबाबत अंदाज बांधण्याचे कौशल्य उत्तम असल्याचे ही आकडेवारी ग्वाही देते.
‘आयटीआय डायनॅमिक बाँड फंड’ गुंतवणुकीसाठी मुदतीचा अप्रतिबंधित गुंतवणूक दृष्टिकोन वापरतो. ‘डायनॅमिक बाँड फंड’ गटात सध्या सर्वात कमी ‘मॉडिफाइड डयुरेशन’ आणि ‘ॲव्हरेज मॅच्युरिटी’ राखलेला फंड आहे. या पोर्टफोलिओमध्ये अगदी अल्प-मुदतीच्या रोख्यांपासून ते ४०-५० वर्षांच्या दीर्घ-मुदतीच्या रोख्यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वात दीर्घ मुदत असलेला रोख ६.९० जीओआय २०६५ हा २०६५ मध्ये मुदतपूर्ती असलेला रोखा आहे. ‘आयटीआय डायनॅमिक बाँड’ फंडाचे पत विवरण (क्रेडिट प्रोफाइल) अत्यंत आकर्षक आहे. फंडाची लवचीक कार्यपद्धती तीन प्राथमिक नियमांनुसार चालते, ते म्हणजे व्याजदर घसरत असताना कालावधीचे फायदे मिळवणे, कमी व्याजदराच्या परिस्थितीत व्याजाच्या दारातून उत्पन्नातून व्याजाचे उत्पन्न मिळवणे आणि सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक), राज्य विकास कर्ज (एसडीएल) आणि उत्तम पत असलेले रोखे धारण करणे.
‘आयटीआय डायनॅमिक बाँड’ फंडानी मागील साडेचार वर्षांमध्ये परताव्यात सातत्य राखले आहे. फंडाच्या सुरुवातीपासून तीन वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न्स’वरून असे दिसून येते की, फंडाने ९५ टक्क्यांपेक्षा जास्त वेळा ७.१० टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळविला आहे, मागील या कालावधीत फंडाचा परतावा ५.५ टक्के आणि ७.६७ टक्के दरम्यान राहिला आहे.
गुंतवणुकीच्या वेगाने बदलत्या जगात, अनेक गुंतवणूकदारांना परताव्याच्या मागे धावण्याचा मोह आवरत नाही. एखादी कंपनी किंवा फंड किंवा मालमत्ता प्रकार (जसे सध्या सोने चांदी), चांगला परतावा देत असला की, त्या मालमत्ता प्रकार किंवा फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. बाजारात वेळ साधता येत नाही. मालमत्ता विभाजन हा गुंतवणुकीत यश मिळविण्याची पहिली पायरी आहे. ही पायरी चुकविली तर गुंतवणूकदार अस्थिरतेच्या भोवऱ्यात फिरत राहतात. शिस्त, उद्देश आणि भावनिक द्विधा स्थिती यामुळे हा निर्णय (त्या वेळी अव्वल परतावा देणाऱ्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करणे) योग्य ठरेलच याची खात्री देता येत नाही. मालमत्ता विभाजन सतत संतुलित करणे, हा योग्य मार्ग असतो. तिथेच खऱ्या अर्थाने दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती होते.
या फंडाच्या कामागिरीकडे पाहताना कवी अनिलांच्या ओळी आठवतात.
निसटुनी जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे…
हा फंडाकडे मोठा ‘एयूएम’ नाही परिचित नाममुद्रा नाही. मॉर्निंग स्टार रेटिंग ‘सिंगल स्टार’ असूनही या फंडाची शिफारस केवळ नवीन निधी व्यवास्थापक आणि त्या व्यवस्थापकाच्या ‘लौकिका’वर विसंबून केली आहे. म्युच्युअल फंड संशोधनासाठी वापरत असलेल्या प्रणालीने या फंडाचा शोध लागला. या फंडात गुंतवणूक करण्यास संकोच करण्याचे कारण नाही. हा फंड पुढील तीन वर्षांत वार्षिक ७.२५ ते ७.७५ टक्के दरम्यान परतावा देईल, अशी आशा बाळगायला वाव आहे.
