RBI Silver Loan Rules: जर तुमच्याकडे चांदीचे दागिने किंवा नाणी असतील आणि तुम्हाला जर कर्ज हवे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. हो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चांदी तारण ठेवून कर्ज देण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. याचा अर्थ तुम्ही सोन्याप्रमाणेच चांदीवर कर्ज घेऊ शकता.

कधीपासून सुरू होणार सुविधा?

चांदी गहाण ठेवून कर्ज मिळवण्याची ही सुविधा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे. बँक किंवा एनबीएफसीकडे चांदी गहाण ठेवून तुम्ही त्वरित कर्ज मिळवू शकाल. आरबीआयने स्पष्ट केले आहे की ही सुविधा फक्त व्यावसायिक बँका, लघु वित्त आणि प्रादेशिक ग्रामीण बँका, शहरी आणि ग्रामीण सहकारी बँका, एनबीएफसी आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या देऊ शकतात.

सोने आणि चांदी (कर्ज) निर्देश, २०२५ अंतर्गत, आरबीआयने औपचारिकपणे कर्जासाठी तारण म्हणून चांदीचा समावेश केला आहे. पण, गैरप्रकार रोखण्यासाठी शुद्ध चांदी (बुलियन) किंवा चांदीच्या बारवर कर्ज मिळणार नाही.

तुम्ही किती सोने आणि चांदी गहाण ठेवू शकता?

सोन्याचे दागिने: १ किलो पर्यंत
चांदीचे दागिने: १० किलो पर्यंत
सोन्याची नाणी: ५० ग्रॅम पर्यंत
चांदीची नाणी: ५०० ग्रॅम पर्यंत

तुम्हाला किती कर्ज मिळेल?

२.५ लाख रुपयांपर्यंतच्या दागिण्यांवर ८५% कर्ज
२.५ ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या दागिण्यांवर ८०% कर्ज
५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दागिण्यांवर ७५% कर्ज

कर्जाचे मूल्य कसे ठरवले जाईल?

बँका गेल्या ३० दिवसांतील सरासरी किंमत किंवा मागील दिवसाचा दर, यापैकी जे कमी असेल त्यावर आधारित मूल्य ठरवतील. दर IBJA किंवा मान्यताप्राप्त कमोडिटी एक्सचेंजवर आधारित असतील.

कर्ज प्रक्रिया आणि सुरक्षा

बँक तुमच्या दागिन्यांची तपासणी करेल आणि प्रमाणित मूल्यांकन अहवाल देईल. कर्ज करारात व्याज, शुल्क आणि इतर अटी स्पष्टपणे नमूद केल्या असतील. सर्व कागदपत्रे तुमच्या पसंतीच्या भाषेत उपलब्ध असतील. तारण ठेवलेले दागिने बँकेच्या तिजोरीत ठेवले जातील.

जर कर्ज फेडले नाही तर काय?

बँक नोटीस जारी करेल आणि आवश्यक असल्यास लिलाव करेल.

राखीव किंमत बाजार दराच्या किमान ९०% असेल.

जर लिलाव दोनदा अयशस्वी झाला तर ही किंमत ८५% पर्यंत कमी केली जाऊ शकते.