Bandra Versova Sea Link Real Estate Impact: वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचे काम पूर्ण होण्यासाठी अजून जवळपास दोन वर्षांचा अवधी असला तरी, मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेत या मार्गालगत मोठ्या प्रमाणात व्यवहार आणि पुनर्विकासाची कामे होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा भाग असलेल्या या वांद्रे-वर्सोवा सी-लिंकमुळे वांद्रे, जुहू, वर्सोवा आणि मढ आयलंडसारख्या परिसरांमध्ये नवे प्रकल्प सुरू होत आहेत आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास केला जात आहे.

प्रस्तावित मुंबई कोस्टल रोड (उत्तर) इंटरचेंजेस आणि जोड रस्त्यांसह जवळपास ६० किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यामुळे वांद्रे ते वर्सोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ केवळ १५-२० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सी-लिंक आणि शिथिल झालेल्या सीआरझेड नियमांमुळे बँडस्टँड, कार्टर रोड आणि ऑटर्स क्लबच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नवे बांधकाम प्रकल्प सुरू झाले आहेत. एका स्थानिक विकासकाने सांगितले की, “बांद्रा-वर्सोवा सी-लिंकमुळे आणि सीआरझेड नियमांमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे गेल्या दोन वर्षांत अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला आहे. येत्या काही वर्षांत प्रमुख पायाभूत सुविधांमुळे परिसरातील मालमत्तांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.” येथील घरांच्या किमती प्रति चौरस फूट ५०,००० ते १ लाख रुपयांपर्यंत आहेत.

जुहूमध्ये उंच इमारती बांधण्यासाठी विकासकांनी बंगले आणि व्हिलांची खरेदी केली आहे. “अलीकडच्या काळात जुहू आणि परिसरात किमान दोन बंगले विक्रीसाठी आले आहेत. संरक्षण आस्थापनेच्या जवळ असल्यामुळे या भागात उंचीवर मर्यादा असल्या तरी, सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे अनेक पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्य ठरले आहेत, ज्याचा जुहूवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा आहे”, असे स्थानिक रिअल इस्टेट सल्लागार विशाल अरोरा यांनी सांगितले.

अपार्टमेंटच्या किमती सरासरी ६०,००० ते ७०,००० रुपये प्रति चौरस फूट आहेत, तर सी-फेस मालमत्तांची किंमत १ लाख रुपये प्रति चौरस फुटापेक्षा जास्त आहे.

वर्सोवामध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग आला आहे, कारण सुधारलेली कनेक्टिव्हिटी आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. या परिसरात अपार्टमेंटच्या किमती प्रति चौरस फूट ३५,००० रुपये ते ४५,००० रुपयांपर्यंत आहेत.

सी-लिंक आणि प्रस्तावित वर्सोवा-मढ आयलंड पुलामुळे मढ आयलंडला फायदा होण्याची अपेक्षा आहे. एका स्थानिक ब्रोकरने सांगितले की, “वांद्रे-वर्सोवा सी-लिंक आणि प्रस्तावित वर्सोवा-मढ आयलंड पुलामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.” येथील अपार्टमेंटच्या किमती प्रति चौरस फूट २५,००० रुपये ते ३५,००० रुपयांपर्यंत आहेत.