ED RERA Warning Home Buyers: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच घर खरेदीदारांना आवाहन केले आहे की, जर एखादी रिअल इस्टेट कंपनी आणि तिचे प्रवर्तक मालमत्तेच्या व्यवहारादरम्यान त्यांची रेरा (RERA) नोंदणी देण्यास नकार देत असतील, पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असतील किंवा रोख रकमेचा आग्रह धरत असतील, तर त्यांनी संबंधित बिल्डरची तक्रार संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे करावी.
तसेच, घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी मालमत्तेच्या मालकी हक्काशी संबंधित कागदपत्रांची खातरजमा करावी आणि रिअल इस्टेट दलालांनी दिलेल्या तोंडी आश्वासनांवर विसंबून राहू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
घर खरेदीदारांची फसवणूक झाल्याच्या एका कथित प्रकरणात, अहमदाबादस्थित रिअल इस्टेट कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांच्या १२९.८० कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर तात्पुरती टाच आणताना, ईडीने एका निवेदनाद्वारे हा सल्ला आणि इशारा दिला.
“घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी संबंधित मालमत्तेसाठी पैसे भरण्यापूर्वी रेरा नोंदणी, सरकारी मंजुरी, मालकी हक्काची कागदपत्रे, जमिनीची कागदपत्रे आणि बोजाचा तपशील तपासावा. मालमत्ता गहाण ठेवलेली आहे किंवा त्याबबत कोणता कायदेशीर वाद सुरू आहे का, हे सुद्धा तपासावे”, असे ईडीने म्हटले आहे.
“खरेदीदारांनी केवळ तोंडी आश्वासने, बुकिंग फॉर्म, नोटरीकृत कागदपत्रे किंवा दलालांकडून मिळालेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नये”, असेही त्यात म्हटले आहे. याचबरोबर ईडीने खरेदीदारांना विक्रीसाठी योग्य करार किंवा विक्रीपत्राचा आग्रह धरण्यास सांगितले आहे.
“जर एखादा बिल्डर कागदपत्रे देण्यास नकार देत असेल, रोख रकमेचा आग्रह धरत असेल, नोंदणीकृत कागदपत्रांना विलंब करत असेल, पैसे परत करण्यास नकार देत असेल किंवा प्रकल्पाची जमीन तिसऱ्या व्यक्तींना हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे प्रकरण संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना, रेरा आणि इतर सक्षम प्राधिकरणांना कळवावे”, असे त्यात म्हटले आहे.
धोक्याचे संकेत
ईडीने म्हटले आहे की, अत्यंत जास्त परतावा, हमीसह पुनर्खरेदी किंवा असामान्य सवलतींच्या आश्वासनांकडे ‘धोक्याचे संकेत’ म्हणून पाहिले पाहिजे.
मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत आरोपी बिल्डर्सची मालमत्ता जप्त करून आणि त्यानंतर ती घरे खरेदी करणाऱ्यांना परत करून किंवा त्यांना न्याय मिळवून देऊन, गुन्ह्यातून मिळवलेला पैसा शोधून तो रोखण्यासाठी तसेच पीडित घर खरेदीदार आणि कायदेशीर दावेदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ई़डीने म्हटले आहे.
