Home Loan Tenure Impact : मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय म्हणजे गृहकर्ज. अनेकांची हयात एखादं गृहकर्ज फेडण्यात निघून जाते. त्यामुळे एखादा चुकीचा निर्णय तुमचे लाखो रुपयांचे नुकसान करू शकतो. गृहकर्ज घेणाऱ्या बहुतेकांचा एकच आग्रह असतो ईएमआय खिशाला परवडणारा असावा. हा विचार वरवर योग्य वाटत असला, तरी तो आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकतो. ५,००० रुपयांचा ईएमआय वाचवण्याच्या नादात तुम्ही बँकेला चक्क एक ३० ते ४० लाख रूपये जास्त देता. आकडा वाचून धक्का बसला ना? चला गणित समजून घेऊ.

ईएमआयचे गणित: २० वर्षे विरुद्ध ३० वर्षे

समजा तुम्ही ५० लाख रुपयांचे गृहकर्ज ८.५% व्याजाने घेतले असेल

तपशीलकालावधी (२० वर्षे) कालावधी (३० वर्षे)
ईएमआय४३,००० रुपये३८,००० रुपये
एकूण व्याज५४ लाख रुपये८८ लाख रुपये
एकूण परतफेड१.०४ कोटी रुपये१.३८ कोटी रुपये

३० वर्षांच्या पर्यायात तुम्ही दरमहा ५,००० रुपये वाचवता, पण एकूण व्याजापोटी ३४ लाख रुपये जास्त द्यावे लागतील! हा खर्च तुमच्या घराच्या मूळ किमतीच्या निम्म्याहून अधिक आहे.

व्याज की कालावधी

अनेकजण व्याजाच्या दरात (उदा. ८.५% वरून ९%) होणाऱ्या बदलावर जास्त लक्ष देतात. पण, खरोखर मोठा फरक कर्जाच्या कालावधीमुळे पडतो. तुम्ही जेवढे जास्त वर्ष कर्ज ओढाल, तेवढे जास्त व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते.

उत्पन्न कमी असल्यास काय करावे?

  • जर सुरुवातीला जास्त ईएमआय परवडत नसेल, तर जास्त मुदतीचे कर्ज घ्या. पण, जसा तुमचा पगार वाढेल, तसा दरवर्षी ईएमआयची रक्कम वाढवा.
  • बोनस किंवा जास्तीचे पैसे आल्यावर कर्जाची अंशतः परतफेड करा. यामुळे मुद्दल वेगाने कमी होते आणि कर्जाचा कालावधी झपाट्याने घटतो.
  • बँक तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार जास्तीत जास्त किती कर्ज मिळेल हे सांगते, पण ते तुम्हाला ‘परवडेल’ का, हे तुम्हालाच ठरवावे लागेल.
  • जुन्या कर प्रणालीत मुद्दलावर (८० सी) १.५ लाख आणि व्याजावर (२४ बी) २ लाखांपर्यंत सवलत मिळते. मात्र, नवीन कर प्रणालीत या सवलती नाहीत, हे ध्यानात ठेवा.
  • उत्पन्नाचे जास्त स्त्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न करा. जेणेकरुन कर्ज कमी कालावधी फेडून जास्तीचे जाणारे व्याज कमी करता येईल.