Home Loan Tenure : स्वतःचे हक्काचे घर खरेदी करणे हा प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय समजला जातो. म्हणूनच आपल्याकडे ‘घर बांधावे पाहून’ अशी म्हण प्रचलित आहे. जेव्हा एखादा ग्राहक गृहकर्जासाठी बँकेत जातो, तेव्हा त्याच्या डोक्यात २ गोष्टी असतात, कर्जाची रक्कम आणि व्याजदर. कर्जाच्या कालावधीकडे बहुतांश खरेदीदारांचे दुर्लक्ष होते. पण लक्षात ठेवा, कर्जाच्या कालावधीचा आकडा फक्त तुमचा हप्ता ठरवत नाही तर आयुष्यातील गणित ठरवत असतो. त्यामुळे २० वर्षांचे की ३० वर्षांचे गृहकर्ज घ्यायचे, यावर सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

गृहकर्जाचा कालावधी इतका महत्त्वाचा का?

गृहकर्जाचा कालावधी म्हणजे तुम्ही तुमचे कर्ज किती वर्षांत मासिक हप्त्यांद्वारे फेडणार आहात. ‘कॅप्री होम लोन्स’चे सीबीओ मुनीश जैन यांच्या मते, “जर तुम्ही लहान कालावधी निवडला, तर तुमचा मासिक हप्ता वाढतो, पण एकूण व्याजाचा बोजा खूप कमी होतो. याउलट, मोठा कालावधी निवडल्यास मासिक हप्ता हलका होतो, पण बँक तुमच्याकडून व्याजाच्या रूपाने मोठी रक्कम वसूल करते. यातील कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे? हे तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर अवलंबून आहे.

२० वर्षांचे कर्ज कोणासाठी ठरू शकते वरदान?

ज्या कर्जदारांचे उत्पन्न स्थिर असून इतर कोणतीही मोठी आर्थिक जबाबदारी नाही, त्यांच्यासाठी २० वर्षांचे गृहकर्ज अत्यंत फायदेशीर ठरते. याचे गणित अगदी सोपे आहे, तुम्ही जितक्या वेगाने मुद्दल परत कराल, तितके कमी व्याज तुम्हाला द्यावे लागेल. गृहकर्ज लाखांच्या घरात असल्याने, व्याजाची वाचलेली ही रक्कम खूप मोठी असते. हा पैसा बँकेला व्याजाच्या रुपात देण्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा स्वतःच्या निवृत्तीसाठी गुंतवू शकता. फक्त यामध्ये तुमचा दरमहा जाणारा ईएमआय जास्त असेल, हे लक्षात ठेवावे.

३० वर्षांचे कर्ज का ठरू शकते स्मार्ट निर्णय?

३० वर्षांचा कालावधी काही कर्जदारांसाठी नक्कीच एक ‘स्मार्ट’ निर्णय ठरू शकतो. जे नव्याने नोकरीला लागले आहेत, ज्यांच्याकडे अद्याप मोठी बचत जमा झालेली नाही. अशा ग्राहकांना कमी हप्त्यात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध होते. ज्या कुटुंबांवर आधीच मुलांची शाळा-कॉलेज फी, विम्याचे हप्ते आणि घरखर्च यांचा भार आहे, त्यांच्यासाठी देखील मोठा कालावधी वरदान ठरतो.

३० वर्षांच्या कर्जाचे छुपे फायदे

बँका कर्ज देताना ग्राहकाची कर्ज परतफेडीची क्षमता तपासतात. तुमचा ईएमआय उत्पन्नाच्या तुलनेत जितका कमी असेल, तितके बँक तुम्हाला जास्त कर्ज मंजूर करू शकते. यामुळे बजेटअभावी छोट्या घरात राहण्याऐवजी तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार मोठे घर घेऊ शकता. कमी ईएमआयमुळे पगारातील अर्धी रक्कम कर्जात जात नाही. परिणामी, आणीबाणीच्या काळासाठी पैसे राखून ठेवणे आणि ‘एसआयपी’च्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवणे शक्य होते. ३0 वर्षांचे कर्ज घेतले म्हणजे ३0 वर्षेच हप्ते भरावे लागतील असे नाही. भविष्यात जसे उत्पन्न वाढेल, तसे तुम्ही अंशतः मुद्दल परतफेड करून बँकेवर फिक्स पेमेंटचा दबाव न आणता कर्जाचा कालावधी स्वतःहून कमी करू शकता.