Jeetendra And Ekta Kapoor Pune property: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, त्यांची मुलगी एकता कपूर आणि मुलगा तुषार कपूर यांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी पुण्यातील किवळे परिसरात अंदाजे ६.५ कोटी रुपये किमतीच्या एका आलिशान फ्लॅटची खरेदी केली आहे. खरेदी केलेला हा फ्लॅट २३ व्या मजल्यावरील एकमेव फ्लॅट आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या इमारतीमध्ये हा फ्लॅट आहे, ती संपूर्ण इमारतच कपूर कुटुंबाच्या मालकीचे असून त्याची अंदाजे किंमत १४५ कोटी रुपये आहे.
या फ्लॅटसाठी खाजगी लिफ्ट लॉबी आणि चार स्वतंत्र पार्किंग जागांची सुविधा उपलब्ध आहे. कपूर कुटुंब जरी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच राहणार असले, तरी पुण्यातील ही मालमत्ता सुट्टीच्या काळात राहण्यासाठी आणि शहरातील कामाच्या निमित्ताने ये-जा करताना सोयीचे ठिकाण म्हणून वापरली जाण्याची शक्यता आहे.
हा संपूर्ण २३ व्या मजला केवळ कपूर कुटुंबासाठीच आहे. ५,००० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटमध्ये पाच बेडरूम्स, एक प्रशस्त लिव्हिंग रूम, प्रत्येक बेडरूमला अटॅच्ड बाथरूम्स, एक बार, डायनिंग एरिया, मोठे स्वयंपाकघर, टेरेस आणि सिट-आउट यांचा समावेश आहे.
रणबीर कपूरही झाला मुळशीकर
दरम्यान बॉलिवूडचा ‘रॉकस्टार’ रणबीर कपूरही सध्या रिअल इस्टेटमधील व्यवहारांमुळे चर्चेत आहे. राम जन्मभूमी अयोध्येत भूखंड खरेदी केल्यानंतर रणबीरने नुकतेच पुण्यात मोठी गुंतवणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिंपरी गावामध्ये रणबीर कपूरने सुमारे २५.७ एकर जमीन खरेदी केली आहे. एका महिन्याच्या अंतरात रणबीर कपूर याची ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील डेटा विश्लेषक संस्था ‘सीआरई मॅट्रिक्स’ने दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी रणबीरने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद झाली आहे. यासाठी रणबीरने १६.४२ कोटी रुपये मोजले आहेत. मुळशी तालुक्यातील पिंपरी गावातील चार सलग जोडलेल्या जमिनीच्या तुकड्यांचा यामध्ये समावेश आहे.
यातील पहिला आणि सर्वात मोठा भूखंड ४३,८०० चौरस मीटर असून त्याची किंमत ७.०७ कोटी रुपये आहे, तर दुसरा भूखंड २९,९०० चौरस मीटर असून यासाठी रणबीरने ४.६२ कोटी रुपये मोजले. ३.३१ कोटी रुपयांचा तिसरा भूखंड २१,४०० चौरस मीटरचा आहे. सर्वात लहान आणि शेवटचा भूखंड ८,९०० चौरस मीटरचा आहे, याची किंमत १.३९ कोटी रुपये आहे. या सर्व जमिनीचे एकूण मुल्य १६.४२ कोटी रुपये आहे. या व्यवहारासाठी रणबीर कपूरने ८२.१३ लाख मुद्रांक शुल्क भरले आहे.
