Kumar Mangalam Birla Jatia House Most Expensive Bungalows Mumbai: मुंबई शहरात स्थावर मालमत्तेचे व्यवहार (Real Estate Transactions) नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. कुमार मंगलम बिर्ला यांनी २०१५ मध्ये मुंबईत ‘जाटिया हाऊस’ची केलेली खरेदी ही मोजक्याच व्यवहारांपैकी अशी एक खरेदी ठरली आहे, जिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
मालमत्ता सल्लागार संस्था ‘जोन्स लँग लासेल’ने (JLL) दुजोरा दिलेल्या अहवालांनुसार, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित ‘मलबार हिल’ भागात स्थित असलेला, सी-फेसिंग आणि अत्यंत प्रसिद्ध असा हा बंगला ४२५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. हा एक असा व्यवहार ठरला आहे, ज्याने भारतात वैयक्तिक वापरासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या आलिशान निवासी मालमत्तेच्या मूल्याचा एक नवाच मापदंड प्रस्थापित केला आहे.
‘लिटल गिब्स रोड’वर दिमाखाने उभे असलेले आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य समोर असणारे हे भव्य निवासस्थान, मुंबईच्या वास्तुकला आणि सामाजिक इतिहासाचाच एक अविभाज्य भाग आहे. या वास्तूला केवळ एक ‘घर’ मानणे, हे तिच्या महतीचा अपमान करण्यासारखेच ठरेल.
२०१५ मध्ये केली होती खरेदी
पीटीआयच्या वृत्तानुसार, हा व्यवहार २०१५ मध्ये एका खाजगी लिलावाद्वारे पार पडला, ज्यामध्ये पाच बोलीदारांनी सहभाग घेतला होता. यात उद्योगपती अजय पिरामल हे देखील शर्यतीत असल्याचे सांगितले जाते. या व्यवहारासाठी एकमेव सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ‘जोन्स लँग लासेल’ संस्थेने दुजोरा दिला की, या मालमत्तेचा वापर संबंधित उद्योगपतीच्या वैयक्तिक कारणांसाठी केला जाईल.
सर्वात महागडा खरेदी करार
‘बिझनेस स्टँडर्ड’च्या वृत्तानुसार, या व्यवहाराने त्या काळातील इतर महत्त्वाच्या बंगला व्यवहारांना मागे टाकले होते. यामध्ये मागील वर्षी उद्योगपती जमशेद गोदरेज यांची बहीण स्मिता कृष्णा यांनी, होमी भाभा यांचा प्रतिष्ठित बंगला ‘मेहरांगीर’ ३७२ कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या व्यवहाराचाही समावेश आहे.
जटिया हाऊसचे मूळ मालक कोण होते?
‘जोन्स लँग लासेल’च्या माहितीनुसार, १९२० च्या दशकात बांधलेली आणि मूळतः मेहेर कवासजी वकील यांच्या मालकीची असलेली ही वास्तू सुमारे २,९०० चौरस मीटर (सुमारे ३१,४९५ चौरस फूट) क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसलेली आहे. तसेच या वास्तूचे बांधकाम क्षेत्र सुमारे २५,००० चौरस फूट इतके आहे.
विविध अहवालांनुसार, या वास्तूची मालकी सर्वप्रथम १९७१-७२ मध्ये एम.सी. वकील यांच्याकडून एम.पी. जटिया यांच्याकडे हस्तांतरित झाली होती. जटिया कुटुंब १९६४ मध्ये बर्माहून मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यावेळी परदेशात अनुभवलेली तीच प्रशस्त आणि बंगल्यासारखी राहणीमान शैली मुंबईतही पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही वास्तू विकत घेतल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर ही वास्तू अरुण आणि श्याम जटिया या बंधूंच्या ताब्यात होती. जे ‘पुदुमजी इंडस्ट्रीज’चे कामकाज पाहत होते आणि कालांतराने या वास्तूची मालकी बिर्ला समूहाकडे हस्तांतरित झाली.
बिर्ला समूह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नवे मालक
गेल्या महिन्यात आदित्य बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील समुहाने जवळपास १.७८ बिलियन म्हणजेच १६ हजार ६०० कोटी खर्चून आयपीएलमधील लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ खरेदी केला आहे. त्यामुळे बिर्ला समूह सातत्याने चर्चेत आहे.
