India’s Most Expensive House DLF Dahlias Penthouse Gurugram: वॉर्बर्ग पिंकस या जागतिक खाजगी इक्विटी कंपनीने विकत घेतलेल्या इम्पीरियल ऑटोशी संबंधित असलेले उद्योजक मानव सरदाना यांनी डीएलएफच्या ‘द डॅलियाज’ या प्रकल्पात २७१ कोटी रुपयांना एक पेंटहाऊस खरेदी केले आहे. हा देशातील एकाच घराचा सर्वात महागडा व्यवहार ठरला आहे, अशी माहिती या व्यवहाराची माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी दिली.

१७,२०० चौरस फूट ‘सुपर एरिया’ आणि १०,५०० चौरस फूट ‘कार्पेट एरिया’ असलेल्या या पेंटहाऊसचा दर ‘कार्पेट एरिया’च्या आधारावर प्रति चौरस फूट सुमारे २.६ लाख रुपये इतका होतो. यामुळे प्रति चौरस फूट दराच्या दृष्टीने हा देशातील सर्वात महागड्या निवासी व्यवहारांपैकी एक ठरला आहे. याबाबत इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे.

डीएलएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी आकाश ओहरी यांनी आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी आयोजित विश्लेषकांच्या बैठकीत सांगितले की, कंपनीने गेल्या तिमाहीत सुमारे ३४ युनिट्सची विक्री केली आहे. ओहरी यांनी गुंतवणूकदारांना सांगितले, “आम्ही जवळपास ६५% विक्री पूर्ण केली आहे. आता प्रति चौरस फूट विक्री किंमत १ लाख रुपयांच्या वर गेली आहे आणि वरच्या मजल्यांवर ती प्रति चौरस फूट १,२०,००० रुपयांच्या (सुपर एरियानुसार) आसपास पोहोचत आहे. या प्रकल्पातील सुरुवातीची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि आता आमचा जवळपास २५-३०% व्यवसाय हा उर्वरित भारत तसेच परदेशातील ग्राहकांकडून येत आहे.”

कंपनीने असा दावा केला आहे की, ‘टायर-२’ शहरांमधील सर्वात श्रीमंत १० कुटुंबे येथे अपार्टमेंट्स खरेदी करण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी, डीएलएफने या प्रकल्पातील एक निवासी अपार्टमेंट भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार मधुसूदन मुरलीधर केला यांना १२०.७ कोटी रुपयांना विकली होती.

शिखर धवन शेजारी

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन यानेही गुरुग्राममधील मे २०२५ मध्ये डीएलएफच्या ‘द डॅलियाज’ या प्रकल्पात ६९ कोटी रुपयांना एक अति-आलीशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा २०२५ मधील सर्वात महागड्या रिअल इस्टेट व्यवहारांपैकी हा एक व्यवहार ठरला होता. यासाठी शिखर धवनला तब्बल ३.२८ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागले होते.

रिअल इस्टेट ॲनालिटिक्स फर्म ‘CRE Matrix’ ने तपासलेल्या आकडेवारीनुसार, या व्यवहाराची नोंदणी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली होती. या मालमत्तेचे मूल्य ६५.६१ कोटी रुपये होते, तर मुद्रांक शुल्कामुळे त्याची एकूण किंमत आणखी ३.२८ कोटी रुपयांनी वाढली. ६,०४० चौरस फूट क्षेत्रफळाचा हा अपार्टमेंट गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर असलेल्या डीएलएफच्या ‘द डॅलियाज’ या अत्याधुनिक अति-आलीशान प्रकल्पात आहे.

डीएलएफचा ४०,००० कोटी रुपयांच्या आलिशान प्रकल्प

डीएलएफने ऑक्टोबर २०२४ मध्ये गुरुग्राममधील डीएलएफ फेज ५ येथे १७ एकर क्षेत्रावर ‘द डॅलियाज’ हा अति-आलिशान गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला. सुमारे ७५ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात आठ टॉवर्स आणि २९ मजल्यांमध्ये एकूण ४२० निवासस्थानांचा समावेश आहे. या प्रकल्पात १५ डुप्लेक्स पेंटहाउसेस आणि ३.५ लाख चौरस फूट आकाराचे क्लबहाऊस यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य ४०,००० कोटी रुपयांहून अधिक आहे.