Niranjan Hiranandani Real Estate News: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा आखाती देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. या तणावामुळे यूएईच्या (UAE) रिअल इस्टेट बाजारपेठेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात आखाती देशांना बसणाऱ्या या फटक्याचा लाभ भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राला होत असल्याचे मत रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज आणि अब्जावधी डॉलर्सच्या ‘हिरानंदानी समूहा’चे प्रमुख निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले आहे. ‘मनीकंट्रोल’शी साधलेल्या संवादात त्यांनी हे भाष्य केले.

मध्य पूर्वेतील तणाव आणि भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राबाबत बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले, “भारताला मध्यपूर्वेकडील देशांकडून ४० अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेचा परकीय चलन ओघ (Remittances) प्राप्त होतो. तेथे कार्यरत असलेले अनेक भारतीय कामगार सध्या अनिश्चिततेच्या किंवा धोक्याच्या छायेत आहेत. कच्च्या तेलाचे दर ६०-७० डॉलर्सवरून प्रति बॅरल १०० डॉलर्सपेक्षा अधिक झाल्यामुळे, एकूण उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची (GDP) वाढ ७.४ टक्क्यांवरून सुमारे ६.४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.”

ते पुढे म्हणाले, “जीडीपी (GDP) वाढीचा वेग मंदावला असला, तरीही रिअल इस्टेट क्षेत्र मात्र अर्थव्यवस्थेच्या इतर भागांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याचे कारण काय? तर ‘उलट्या दिशेने होणारी गुंतवणूक’ (रिव्हर्स इन्व्हेस्टमेंट) हे आहे. पूर्वी भारतीय लोक परदेशात गुंतवणूक करत असत. आता मात्र, तो पैसा पुन्हा भारतात परत येत आहे. अनिवासी भारतीय, विशेषतः अमेरिका आणि मध्यपूर्वेकडील लोक भारतात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत. गेल्या महिन्यातील आमच्या विक्रीमध्ये २५ टक्के वाटा अनिवासी भारतीयांचा होता आणि त्यातीलही २० टक्के गुंतवणूक केवळ अमेरिकेतून आली होती. ही गुंतवणुकीची लाट अद्याप महापुरासारखी नसली, तरी ती सातत्याने वाढत आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी थोडा वेळ लागतो, परंतु या गुंतवणुकीची दिशा मात्र आता स्पष्ट झाली आहे.”

हिरानंदानी समूहाची वाटचाल

हिरानंदानी समूहाच्या व्यावसायिक वाटचालीबाबत बोलताना ते म्हणाले, “मला असे वाटते की, आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांत, आम्ही डेटा सेंटर्स, हॉस्पिटॅलिटी, संयुक्त उपक्रम, पुनर्विकास आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही सातत्याने नवीन संधींचा शोध घेत आहोत. भारतामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि नवनवीन कल्पना सतत समोर येत आहेत. आज उपलब्ध असलेल्या विकासाच्या संधी खरोखरच अविश्वसनीय आहेत.”