PMAY Home Loan Subsidy Marathi : शहरात नोकरी-धंद्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न असते. मात्र, घरांच्या वाढलेल्या किमती आणि गृहकर्जाचे व्याजदर यामुळे अनेकांची घर घेण्याची हिंमत होत नाही. अशा परिस्थितीत, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री आवास योजना’ एक मोठा दिलासा ठरत आहे. या योजनेअंतर्गत सरकार गृहकर्जाच्या व्याजावर १.८० लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे, ज्यामुळे तुमच्या मासिक हप्त्याचा भार हलका होण्यास मदत होईल.

सबसिडीचे गणित आणि मर्यादा

या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त २५ लाखांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकता, तसेच त्या मालमत्तेची एकूण किंमत ३५ लाखांपेक्षा जास्त नसावी. सरकारकडून मिळणारे १.८० लाख रुपयांचे अनुदान ५ समान वार्षिक हप्त्यांमध्ये मिळते. म्हणजेच ३६,००० रुपये प्रतिवर्ष थेट तुमच्या लोन अकाउंटमध्ये जमा केले जातात. यामुळे तुमचे मुख्य कर्ज कमी होते आणि परिणामी EMI देखील कमी होतो.

अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक अटी

अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या (पती, पत्नी आणि अविवाहित मुले) नावावर देशभरात कुठेही कोणतेही पक्के घर नसावे.
कुटुंबाने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणीअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या नवीन घरांच्या नोंदणीमध्ये कुटुंबातील प्रौढ महिला सदस्याचे नाव मुख्य किंवा संयुक्त मालक म्हणून असणे अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट.
  • पगारदार लोकांसाठी सॅलरी स्लिप आणि फॉर्म १६. व्यावसायिक किंवा स्वयंरोजगारांसाठी गेल्या २-३ वर्षांचा आयटीआर.
  • देशभरात कुठेही स्वतःचे पक्के घर नसल्याचे स्व-घोषणापत्र.
  • घराचा मंजूर नकाशा, खरेदी करार किंवा बांधकामाचा अंदाजित खर्च.

अनुदान मिळवण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

  • सर्वात आधी PMAY अंतर्गत कर्ज देणाऱ्या कोणत्याही सरकारी, खाजगी बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीमध्ये जा.
  • बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज करतानाच PMAY-U 2.0 सबसिडीचा फॉर्म देखील भरा. तुमचे उत्पन्नाचे दाखले, प्रॉपर्टीची कागदपत्रे आणि शपथपत्र बँकेत जमा करा.
  • बँक तुमच्या पात्रतेची आणि कागदपत्रांची तपासणी करेल. सर्व माहिती योग्य आढळल्यास बँक कर्ज मंजूर करेल आणि सबसिडीची मागणी सरकारच्या सेंट्रल नोडल एजन्सीच्या पोर्टलवर अपलोड करेल.
  • केंद्रीय एजन्सी तुमच्या अर्जाची तपासणी करेल. मंजुरी मिळताच सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक लोन अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे जमा केली जाईल, ज्यामुळे तुमचा EMI कमी होईल.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही पात्र आहात की नाही? हे तपासू शकता.