REIT vs FD Investment Guide : शेअर बाजारात नुकतेच रिअल इस्टेट क्षेत्रावर आधारित इंडेक्स फंड लाँच झाला. यानंतर ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ (REIT) हा प्रकार पुन्हा एकदा किरकोळ गुंतवणूकदारांच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, ‘आरईआयटी’ हा फिक्स डिपॉझिट किंवा रोख्यांसारखा परतावा देतो असा अनेकांचा समाज आहे. एडलवाइज म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी हा गैरसमज दूर केला आहे. ‘आरईआयटी’ हे फिक्स डिपॉझिट वेगळे कसे आहे? हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आरईआयटी कसे काम करते?

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट गुंतवणूकदारांचे पैसे व्यावसायिक मालमत्तांमध्ये गुंतवतात. यातून भाड्याच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न गुंतवणूकदारांना लाभांश किंवा परतावा म्हणून दरमहा किंवा तिमाहीला दिले जाते. उदा. एखाद्या मॉलमध्ये केलेली गुंतवणूक. वेगवेगळ्या शॉप्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून भाडेस्वरुपात मोठी कमाई होती. यातूनच गुंतवणूकदारांना लाभ दिला जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांना ही गुंतवणूक एखाद्या बचत ठेव किंवा मासिक योजनेसारखी वाटते. यातून नियमित परतावा मिळत असला तरी बाजारातील चढउतारानुसार आरईआयटीच्या युनिट्सची किंमत बदलत असते.

राधिका गुप्ता यांचे स्पष्टीकरण

राधिका गुप्ता यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये याचे सविस्तर विश्लेषण केलं आहे. भांडवली बाजारात आरईआयटीचे वर्गीकरण ‘इक्विटी’ म्हणूनच ‘सेबी’ने केलं आहे. मुख्य शेअर बाजाराची अस्थिरता १४ ते १६ टक्के आहे. तुलनेत आरईआयटीची अस्थिरता सुमारे १० ते ११ टक्के आहे. मुख्य बाजाराच्या तुलनेत अस्थिरता कमी असली तरी डेट फंडांच्या तुलनेत खूप जास्त आहे. बचत ठेवींमध्ये तर निश्चित उत्पन्न मिळते. जागतिक स्तरावरही आरईआयटीची कामगिरी दीर्घकाळात शेअर बाजाराच्या चालीवरच आधारित राहिली आहे, असं राधिका गुप्ता यांनी लिहिलं आहे.

आरईआयटीमधून मिळणारा परतावा कसा ठरतो?

  • सामान्य शेअर्समधील परतावा हा कंपन्यांच्या नफ्यावर अवलंबून असतो. मात्र, आरईआयटीचा परताव्यावर दोन मुख्य घटक परिणाम करतात.
  • भाड्याचे उत्पन्न : व्यावसायिक इमारती, आयटी पार्क किंवा मॉल्समधून मिळणारे भाडे. सध्या आरईआयटीचा डिव्हिडंड यिल्ड ५ ते ६ टक्के आहे, जो सामान्य शेअर्सपेक्षा जास्त आहे.
  • मालमत्तेचे मूल्य वाढणे : जर त्या रिअल इस्टेट मालमत्तेचे बाजारमूल्य वाढले, तर आरईआयटी युनिटची किंमतही वाढते.

‘आरईआयटी’मध्ये कोणी गुंतवणूक करावी?

  • राधिका गुप्ता यांच्या मते, गुंतवणूकदारांनी आरईआयटीचा विचार एफडी किंवा बाँड्सचा पर्याय म्हणून करू नये, तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी करावा. पारंपारिक डेट गुंतवणुकीपेक्षा आरईआयटी हे सोन्यासारख्या भौतिक मालमत्तांच्या जास्त जवळ आहे. कोट्यवधी रुपये न घालवता थेट शेअर बाजाराच्या माध्यमातून भाडे देणाऱ्या मोठमोठ्या व्यावसायिक इमारतींमध्ये मालकी हक्क मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
  • आरईआयटी नियमित परतावा देत असले तरी ते बाजारपेठेशी जोडलेले असल्याने चढउताराचा तुमच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. व्याजदर बदलल्यास किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आल्यास युनिट्सच्या किमती घसरू शकतात.