Sachin Tendulkar Lonavala Property Details: माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने लोणावळ्यात सुमारे ७० कोटी रुपयांना ३.८६ एकर जमीन खरेदी केली आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी नोंदणी झालेल्या या व्यवहारामध्ये जमिनीचे ३ भूखंड आणि सुमारे २,१०० चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत यांचा समावेश आहे. या खरेदीमध्ये लोणावळ्यातील मालमत्तांचा समावेश असून, सचिनने खरेदी केलेले एकूण क्षेत्रफळ सुमारे १.६८ लाख चौरस फूट इतके आहे. ‘झॅपकी’ या प्रॉपर्टी टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मने याबबत वृत्त दिले आहे.

या व्यवहाराच्या नोंदणी कागदपत्रांनुसार ३.०९ एकरच्या सर्वात मोठ्या भूखंडासाठी सचिनने सुमारे ६३.६९ कोटी रुपये मोजले. दुसऱ्या व्यवहाराची रक्कम ४.५६ कोटी रुपये आहे तर तिसरी मालमत्ता १.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये सचिनने ३.०९ एकरच्या भूखंडाची १०० टक्के मालकी मिळवली आहे. तर इतर दोन मालमत्तांमध्ये त्याने ५०
टक्के अविभाजित हिस्सा खरेदी केलाचे, कागदपत्रांवरून दिसून येते.

सचिनने या तीन मालमत्ता नंदन धनंजय मेहता आणि विवस्वत धनंजय मेहता यांच्याकडून खरेदी केल्या आहे. या व्यवहारांसाठी ४.२० कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ९०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. ‘झॅपकी’च्या माहितीनुसार, एकूण व्यवहार मूल्य आणि एकूण क्षेत्रफळ विचारात घेता, हस्तांतरणाच्या तिन्ही व्यवहारांमधील एकत्रित दर प्रति चौरस फूट सुमारे ४,१६८ रुपये इतका होतो.

कर्मचाऱ्यासाठी विरारमध्ये ३२ लाख रुपयांचे घर

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी मे २०२५ मध्ये विरारमध्ये ३२ लाख रुपयांना एक घर खरेदी केले होते. ‘झॅपकी’ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, हे घर मुंबईजवळील विरारच्या पेनिन्सुला हाइट्स येथे आहे. ३९१ चौरस फुटांचे हे घर तिसऱ्या मजल्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर एका कर्मचाऱ्यासाठी खरेदी करण्यात आले आहे.

वांद्र्यातील घराची किंमत १०० कोटी ते १५० कोटी रुपये

सचिनचे मुख्य निवासस्थान मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे १९-ए पेरी क्रॉस रोडवर आहे. याची किंमत १०० कोटी ते १५० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. यासह सचिनचा अलिबाग येथे २२ कोटी रुपयांचा व्हिलाही आहे. तसेच त्याने लंडनमध्येही काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत. याबाबत फायनान्शिअल एक्सप्रेसच्या वृत्ता उल्लेख आहे.