SBI Kharadi Pune Property Purchase Deal Of 414 Crore: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुण्यातील खराडी परिसरात ४१४ कोटी रुपयांना एक व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली आहे. यामध्ये एका मोक्याच्या भूखंडाचा आणि त्यावरील इमारतीचा समावेश आहे. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांनुसार, एसबीआयने डिसेंबर २०२३ मध्ये ४१.४ कोटी रुपये, २०२४ मध्ये २८९.८ कोटी रुपये आणि उर्वरित ८२.८ कोटी रुपये १४ ऑगस्ट २०२६ रोजी दिले, ज्याचे एकत्रित मूल्य ४१४ कोटी रुपये इतके आहे.
या व्यवहारामध्ये खराडी नॉलेज पार्क येथील २.१२ एकर जमिनीचे भाडेपट्ट्यावरील अधिकार हस्तांतरित करून घेणे आणि त्याच भूखंडावर उभारलेली सुमारे १.८४ लाख चौरस फूट क्षेत्रफळाची व्यावसायिक इमारत पूर्ण मालकी हक्कासह प्राप्त करणे, यांचा समावेश आहे. या इमारतीत तळघर, पार्किंगची खुली जागा आणि १५ मजले असून, येथे २०० गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे.
रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म असलेल्या CRE Matrix द्वारे उपलब्ध झालेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, सिद्धिविनायक एंटरप्रायझेसकडून हस्तांतरण कराराद्वारे ही मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. या व्यवहारावर २८.९८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
कागदपत्रांनुसार, ही खरेदी एसबीआयच्या महाराष्ट्र सर्कलसाठी स्थानिक मुख्य कार्यालय स्थापन करण्याच्या उद्देशाने केली आहे. याकरिता खराडी, विमान नगर किंवा बाणेर भागात तयार इमारत खरेदी करण्यासाठी बँकेने एप्रिल २०२३ मध्ये निविदा मागवल्या होत्या.
खराडीचीच निवड का?
खराडी हे पुण्यातील एक प्रमुख व्यावसायिक आणि कार्यालयीन केंद्र म्हणून उदयास आले असून, येथे तंत्रज्ञान कंपन्या, वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सचे मोठे जाळे आहे. गेल्या दशकात या भागात मोठ्या कार्यालयीन आणि ‘मिक्स्ड-युज’ प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. एसबीआयसाठी, या खरेदीमुळे एका प्रस्थापित व्यावसायिक केंद्राच्या ठिकाणी स्वतःची मोठी व्यावसायिक जागा उपलब्ध झाली आहे.
बंगळूरुनंतर पुणे हे भारतातील दुसरी सर्वात मोठी कार्यालयीन बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. भाडेपट्ट्याच्या करारानांना प्रामुख्याने आयटी-बीपीएम, फ्लेक्झिबल वर्कस्पेसेस आणि इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांमुळे चालना मिळाली आहे.
