Trump Towers Hyderabad Launch : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘ट्रम्प टॉवर्स’ ब्रँड भारतात आपला विस्तार वाढवत आहे. मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकात्यानंतर ट्रम्प टॉवरने आता दक्षिणेकडे कूच केली आहे. आयटी हब असलेल्या हैदराबादमध्ये ‘ट्रम्प टॉवर्स हैदराबाद’ या नावाने आलिशान गृहप्रकल्प बांधण्यात येणार आहे. ‘ट्रायबेका डेव्हलपर्स’ने ‘इरा रिएल्टी’ सोबतच्या भागीदारीत याची अधिकृत घोषणा केली आहे.

कसा असणार ‘ट्रम्प टॉवर्स हैदराबाद’?

शहरातील कोकापेट येथील गोल्डन माइल रोडवरील ४ एकर जागेवर हा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये ८०० फूट उंचीचे दोन टॉवर्स असणार आहे. यामध्ये एकूण ६५ मजले असून २८ व्या मजल्यावर ‘स्काय ब्रिज’ने दोन्ही टॉवर ऐकमेकांना जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनला खुद्द एरिक ट्रम्प येणार आहेत. या प्रकल्पात ४५० हून अधिक निवासस्थानांचा समावेश असेल, ज्यामध्ये ३.५-बीएचके आणि ४-बीएचके घरांचा समावेश आहे. ज्याची किंमत ५ कोटी रुपयांपासून सुरू होऊन पेंटहाऊससाठी १८ कोटी रुपयांपर्यंत असेल.

१,८०० कोटींची गुंतवणूक, ३,५०० कोटींचे उत्पन्न!

ट्रायबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात १,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून किमान ३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. “सुरुवातीला या प्रकल्पात केवळ ८ पेंटहाऊसचे नियोजन होते. पण, एका कुटुंबाने २ संपूर्ण मजले खरेदी केल्याने ४ पेंटहाऊस एकाच वेळी विकले गेले. त्यानंतर मागणी लक्षात घेऊन टीमने आणखी ४ पेंटहाऊस वाढवले. विशेष म्हणजे तेदेखील आधीच बुक झाले असल्याचे कल्पेश मेहता यांनी सांगितले.

भारतात ‘ट्रम्प’ ब्रँडचा वेगाने विस्तार

गेल्या १२ वर्षांत ट्रम्प ब्रँडने भारतीय रिअल इस्टेट बाजारात मोठे स्थान निर्माण केले आहे. यापूर्वी मुंबई, पुणे, गुरुग्राम, नोएडा आणि कोलकाता या शहरांमध्ये ट्रम्प टॉवर्स यशस्वीरीत्या लाँच करण्यात आले आहेत. ट्रम्प टॉवर्स हैदराबादला ‘रेरा’ मंजुरी मिळाली असून, सध्या ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्रक्रिया सुरू आहे.

भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात बदलता ट्रेंड

गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्राचा ट्रेंड बदलताना पाहायला मिळत आहे. परवडणाऱ्या घरांची विक्री मंदावली असून ग्राहक लक्झरी घरांना अधिक पसंती देत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षीची आकडेवारी पाहिली तर लक्झरी घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. परिणामी आता विकासक लक्झरी घरांची निर्मिती अधिक करत आहेत.