Circle Rate vs Market Rate : मालमत्ता खरेदी करताना बहुतेक लोक आपलं बजेट आणि लोकशनला महत्त्व देतात. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ‘सर्कल रेट’कडे दुर्लक्ष होते. प्रत्यक्षात तुमची प्रॉपर्टी टॅक्सची रक्कम, नोंदणी खर्च आणि गृहकर्जाची पात्रता हे सर्व याच दराभोवती फिरत असते. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संबंधित भागाचा सर्कल रेट जाणून घेतल्यास तुमचे बजेट कोलमडणार नाही. अनेकदा कमी किमतीत घर मिळते म्हणून आपण व्यवहार करतो, पण सर्कल रेट जास्त असल्याने नोंदणीचा खर्च आवाक्याबाहेर जातो.
घर किंवा जमीन खरेदी करताना केवळ करारातील किंमत महत्त्वाची नसते, तर सरकारी दप्तरी त्या भागासाठी निश्चित केलेला किमान दर म्हणजेच ‘सर्कल रेट’ काय आहे, यावर तुमचा प्रत्यक्ष खर्च अवलंबून असतो. अनेक राज्यांमध्ये याला ‘रेडी रेकनर रेट’ असेही म्हणतात.
सर्कल रेट म्हणजे नेमकं काय?
राज्य सरकारकडून एखाद्या विशिष्ट भागातील मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या नोंदणीसाठी जो किमान दर निश्चित केला जातो, त्याला ‘सर्कल रेट’ म्हणतात. मालमत्तेची मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी याच दराच्या आधारावर ठरवली जाते. जरी तुम्ही मालमत्तेचा व्यवहार सर्कल रेटपेक्षा कमी किमतीत केला, तरी सरकार तुमच्याकडून सर्कल रेटनुसारच मुद्रांक शुल्क आणि नोंदणी खर्च घेते. साधारणपणे राज्य सरकारचा महसूल विभाग दर १ ते ३ वर्षांनी हे दर अपडेट करत असतो.
सर्कल रेट कसा ठरवला जातो?
- सरकार हे दर ठरवताना अनेक घटकांचा विचार करते.
- ठिकाण : उत्तम रस्ते, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा असलेल्या भागात दर जास्त असतात.
- मालमत्तेचा प्रकार : निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांसाठी वेगवेगळे दर असतात.
- सुविधांची उपलब्धता : जवळपास शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठा असल्यास रेटवर परिणाम होतो.
- वय आणि आकार : मालमत्तेचे वय आणि आकार यानुसारही दरांमध्ये तफावत असू शकते.
- मालकी हक्क : फ्रीहोल्ड आणि लीजहोल्ड मालमत्तांचे दर वेगवेगळे असू शकतात.
सर्कल रेटचे महत्त्व आणि कार्यपद्धती
बाजारपेठेतील खऱ्या किमती समोर याव्यात आणि मुद्रांक शुल्काची चोरी रोखली जावी, हा सर्कल रेटचा मुख्य उद्देश असतो. समजा एखाद्या मालमत्तेची बाजार किंमत ५० लाख रुपये आहे, पण सर्कल रेटनुसार तिची किंमत १ कोटी रुपये ठरत असेल, तर तुम्हाला १ कोटी रुपयांच्या आधारावरच टॅक्स आणि स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. यामुळे व्यवहारात पारदर्शकता येते आणि सरकारला योग्य महसूल मिळतो.
गृहकर्जावर होणारा परिणाम
तुमची गृहकर्जाची पात्रता ठरवण्यात सर्कल रेटची मोठी भूमिका असते. बँका सहसा सर्कल रेटनुसार ठरलेली किंमत आणि प्रत्यक्ष व्यवहार किंमत यापैकी जी ‘कमी’ असेल, त्या आधारावर कर्ज मंजूर करतात. जर एखाद्या भागाचा सर्कल रेट खूपच कमी असेल, तर तुमची कर्ज पात्रता कमी होऊ शकते आणि तुम्हाला स्वतःच्या खिशातून ‘डाऊन पेमेंट’ भरावे लागू शकते.
ग्राहकाला काय फायदा?
सर्कल रेट फक्त मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी शुल्कापुरता मर्यादीत नाही. तर मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फार महत्त्वाचा आहे. खरेदी करत असलेल्या मालमत्तेच योग्य मूल्य काय आहे? आपण वाजवीपेक्षा जास्त किंमत तर देत नाही ना? याचा अंदाज घेऊन ग्राहकांना यातून येतो.
