REITs Investment Guide Marathi Details: व्यावसायिक स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज आता नाही. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (रिट्स)च्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही या क्षेत्रात सहभागी होता येते. मात्र, रिट्समधील गुंतवणूक नेमकी कशी करावी? त्यातून किती परतावा मिळू शकतो? त्यातील जोखीम कोणती? आणि गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भारतीय रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स असोसिएशनचे प्रवक्ते केदार कुलकर्णी यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.

प्रश्न : रिट्स म्हणजे नेमके काय? त्याची वैशिष्ट्ये कोणती?

केदार कुलकर्णी : रिट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. भारतात २०१९ मध्ये पहिला रिट सूचीबद्ध झाला. सोप्या भाषेत सांगायचे तर, व्यावसायिक स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी रिट्स हा एक पर्याय आहे. कार्यालयीन इमारती, व्यावसायिक संकुले आणि शॉपिंग मॉल्स यांसारख्या मालमत्तांमध्ये रिट्स गुंतवणूक करतात. या मालमत्ता कंपन्यांना दीर्घकालीन भाडेकरारावर दिल्या जातात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा गुंतवणूकदारांना मिळतो.

प्रश्न : भारतात सध्या किती रिट्स आहेत? त्यात सर्वसामान्य गुंतवणूकदार कसा सहभागी होऊ शकतो?

केदार कुलकर्णी : भारतात सध्या सहा रिट्स सूचीबद्ध आहेत. त्यापैकी पाच कार्यालयीन मालमत्तांमध्ये, तर एक शॉपिंग मॉल्समध्ये गुंतवणूक करतो. हे सर्व रिट्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध आहेत. त्यामुळे डीमॅट खाते असलेल्या गुंतवणूकदाराला शेअर खरेदी करण्याप्रमाणे रिट्सची युनिट्स खरेदी करता येतात. प्रत्येक युनिटची किंमत काहीशे रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च न करता व्यावसायिक स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करता येते.

प्रश्न : रिट्समध्ये गुंतवणूक सुरक्षित असते का? त्यावर कोणाचे नियंत्रण असते?

केदार कुलकर्णी : रिट्सचे नियमन सेबीकडून केले जाते. २०१४ मध्ये सेबीने रिट्ससाठी नियमावली आणली. सामान्य कंपन्यांच्या तुलनेत रिट्ससाठी काही अधिक कठोर नियम आहेत. उदाहरणार्थ, रिट्स किती कर्ज घेऊ शकतात, किती मालमत्ता बांधकामाधीन असू शकतात आणि गुंतवणूकदारांना किती उत्पन्न वितरित करावे लागेल, याबाबत नियम आहेत. मालमत्तांचे स्वतंत्र मूल्यांकन, नियमित अहवाल आणि कर्जावरील मर्यादा यांमुळे पारदर्शकता राखली जाते. मात्र, कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे रिट्समध्येही जोखीम असते.

प्रश्न : रिट्समधून गुंतवणूकदारांना परतावा कसा मिळतो?

केदार कुलकर्णी : रिट्समधील परताव्याचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिला म्हणजे वितरणातून मिळणारे उत्पन्न आणि दुसरा म्हणजे भांडवली मूल्यवृद्धी. रिट्स मालमत्ता भाड्याने देतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा केल्यानंतर उरणाऱ्या वितरणयोग्य रोख प्रवाहाचा किमान ९० टक्के हिस्सा गुंतवणूकदारांना वितरित करावा लागतो. हे वितरण लाभांश, व्याज किंवा भांडवलाच्या परताव्याच्या स्वरूपात असू शकते. दुसरीकडे, रिट्सच्या युनिटची बाजारातील किंमत वाढल्यास गुंतवणूकदाराला भांडवली नफाही मिळू शकतो.

प्रश्न : रिट्समधील गुंतवणुकीवर किती परतावा मिळू शकतो?

केदार कुलकर्णी : गेल्या पाच ते सहा वर्षांतील रिट्सचा वार्षिक सरासरी परतावा साधारण १४ ते १६ टक्के राहिला आहे. मात्र, हा परतावा वितरण आणि भांडवली मूल्यवृद्धी या दोन्हींचा एकत्रित परिणाम आहे. तो करपूर्व परतावा आहे. मागील परतावा भविष्यातही मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करून निर्णय घ्यावा.

प्रश्न : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांच्या तुलनेत रिट्सचे वेगळेपण काय?

केदार कुलकर्णी : रिट्स हा डेट आणि इक्विटी यांच्या मधला गुंतवणुकीचा पर्याय मानता येतो. डेटमध्ये तुलनेने कमी जोखीम आणि निश्चित स्वरूपाचा परतावा असतो. इक्विटीमध्ये जोखीम अधिक असते; परताव्याची शक्यताही अधिक असते. रिट्समध्ये जोखीम आणि परताव्याचे स्वरूप मध्यम असते. दीर्घकालीन भाडेकरारांमुळे उत्पन्नाचा अंदाज बांधणे तुलनेने सोपे होते. मात्र, रिट्समधील गुंतवणूकही बाजारातील चढ-उतारांपासून मुक्त नाही.

प्रश्न : रिट्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

केदार कुलकर्णी : सर्वप्रथम रिट्सच्या मालमत्तांची गुणवत्ता तपासावी. त्या कोणत्या शहरात आहेत, त्यांची स्थिती काय आहे, भाडेकरू कोण आहेत, किती जागा भाड्याने दिली आहे आणि किती जागा रिकामी आहे, याची माहिती घ्यावी. मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची वाढ, वितरणाचा इतिहास आणि निव्वळ परिचालन उत्पन्न यांचाही अभ्यास करावा. ही माहिती रिट्सच्या संकेतस्थळावर, गुंतवणूकदारांसाठीच्या सादरीकरणांमध्ये आणि वार्षिक अहवालांमध्ये उपलब्ध असते.

प्रश्न : रिट्समधील गुंतवणुकीची प्रमुख जोखीम कोणती?

केदार कुलकर्णी : मालमत्तांची गुणवत्ता, भाडेकरूंची आर्थिक स्थिती, रिकाम्या जागांचे प्रमाण आणि भाड्यातील बदल यांचा उत्पन्नावर परिणाम होतो. व्याजदरांमधील बदलांचाही रिट्सच्या मूल्यांकनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ परताव्याकडे लक्ष न देता या जोखमींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्रश्न : भविष्यात रिट्समध्ये निवासी मालमत्ता किंवा इतर क्षेत्रांचाही समावेश होऊ शकतो का?

केदार कुलकर्णी : भारताबाहेरील बाजारपेठांमध्ये डेटा सेंटर्स, निवासी भाडे मालमत्ता, विद्यार्थी निवास, गोदामे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची निवासस्थाने अशा विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये रिट्सची गुंतवणूक असते. ज्या मालमत्तांमधून नियमित उत्पन्न मिळू शकते, अशा क्षेत्रांमध्ये रिट्सच्या विस्ताराची शक्यता असते. भारतातही भविष्यात अशा विविध प्रकारच्या मालमत्तांचा समावेश होऊ शकतो.

प्रश्न : सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेवटी काय सांगाल?

केदार कुलकर्णी : कोणत्याही एका गुंतवणूक प्रकारात संपूर्ण पैसे गुंतवू नयेत. गुंतवणुकीत विविधता असणे महत्त्वाचे आहे. रिट्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता यांचा विचार करावा. जागतिक स्तरावर व्यावसायिक स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीसाठी रिट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. भारतातही या क्षेत्रात वाढीची संधी आहे. मात्र, गुंतवणुकीचा निर्णय घेताना परताव्याबरोबर जोखमींचाही विचार करणे आवश्यक आहे.