कमलेश राव
मागच्या म्हणजेच २०११ च्या जनगणनेत असे दिसून आले आहे की, आपल्या एकूण लोकसंख्येपैकी ८.६ टक्के लोक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील होते. याव्यतिरिक्त जागतिक आरोग्य संघटनेने २०१९ मध्ये भारताचे सरासरी आयुर्मान अंदाजे ७०.७ वर्षे असल्याचे नमूद केले आहे. यावरून स्पष्ट दिसते की, पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना भारत मोठ्या प्रमाणात लोकसंख्याशास्त्रीय बदलाचाही सामना करत आहे. ही आकडेवारी आरोग्य, स्वच्छता आणि राहणीमानातील सुधारणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे लोकसंख्येतील एकूण प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दर्शवते. २,१०० सालापर्यंत भारताच्या लोकसंख्येचे सरासरी वय ५८ वर्षे असेल असा अंदाज असून, एकूण लोकसंख्येत वृद्धांच्या टक्केवारीतील महत्त्वाचे बदल यानिमित्ताने अधोरेखित होतात.

ज्येष्ठ नागरिक हा आयुष्याचा असा टप्पा आहे, जेव्हा जीवनभर दीर्घकाळ जपलेली स्वप्ने पूर्ण करायची असतात. देशी आणि परदेशी प्रवास करण्याची इच्छा त्यांना असू शकते. वैयक्तिक आवडी जोपासण्याची किंवा एखाद्या उद्योगात गुंतवणूक करण्याची, कधी कधी समाजोपयोगी उपक्रमांना आर्थिक पाठबळ देण्याची इच्छा असते. या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना संचित संपत्तीच्या पलीकडे एखादा कॉर्पस असणे आवश्यक असते. या दृष्टीने विचार केल्यास त्यांना काही नियतकालिक उत्पन्नाचे स्रोतही आवश्यक ठरतात.

वार्षिकी सेवानिवृत्ती (ॲन्यूइटी) आर्थिक नियोजनात निश्चितता आणते. आयुष्याच्या उत्तरार्धात स्वातंत्र्य आणि आर्थिक आत्मविश्वासाची भावना निर्माण करते. ॲन्यूइटी गुंतवणूकदारांवर त्यांच्या इच्छाआकांक्षा पैशांअभावी पुढे ढकलण्याची वेळ येऊ देत नाहीत.

आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्थिर रोख प्रवाह

मागे २०२४ मध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना एक लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शनची अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यापैकी फक्त ११ टक्के लोकांनाच निवृत्तीनंतर ही एवढी पेन्शनची रक्कम त्यांची सध्याची गुंतवणूक मिळवून देईल याची खात्री होती. बहुतांशांची मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, रिअल इस्टेट आणि शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक साधनांवर मदार असते. तथापि पोर्टफोलिओत पेन्शन योजना नसल्या कारणाने यापैकी बहुतांश व्यक्तींना खर्च भागविण्यासाठी सेवानिवृत्तीच्या काळात मालमत्तांची विक्री करावी लागू शकते. यापैकी बहुतांश मालमत्तांची विक्री प्रक्रिया फार जटिल आणि वेळखाऊ असते. तरलतेचा अभाव, शिवाय बाजाराच्या परिस्थितीनुसार मालमत्तांच्या किमतीत चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण होते.

महागाई आणि कुटुंब व्यवस्थेतील बदल या दोन्हीचा परिणाम कौटुंबिक उत्पन्नावर होत असतो. अनेकदा आयुष्याच्या धबगड्यात निवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचे भान राखणे कठीण होते. त्यामुळे भारतातील ज्येष्ठ नागरिकांकडे रोख रकमेचा अंदाज असणे आवश्यक ठरते. सेवानिवृत्ती योजनांमध्ये नियमित उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ॲन्यूइटी आणि इतर खात्रीलायक उत्पन्नाच्या मार्गांमध्ये गुंतवणुकीचे महत्त्वपूर्ण प्रमाण समाविष्ट करणे आवश्यक आहे.

ॲन्यूइटीसह अधिक चांगले नियोजन

ॲन्यूइटी हा ग्राहकाने विमा कंपनीशी केलेला आर्थिक करार असतो. या करारानुसार विमा कंपनी सेवानिवृत्ती कॉर्पसला नियमित हप्त्यांमध्ये रूपांतरित करते. त्यामुळे नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार होतो. सेवानिवृत्तांना हमी उत्पन्नाच्या निर्मितीसाठी कॉर्पसचा एक हिस्सा हप्त्यांमध्ये रूपांतरीत करण्याची मुभा असते. विमा ग्राहक ॲन्यूइटी एकरकमी किंवा हप्त्यांची मालिका ठरवून या प्रवासाची सुरुवात करते. त्या बदल्यात आयुष्यभर किंवा विशिष्ट कालावधीसाठी उत्पन्न मिळवत राहते. पारंपरिक गुंतवणूक उत्पादनांचे उद्दिष्ट संपत्ती वाढविणे आहे, तर ॲन्यूइटी योजना ही विशिष्ट कालावधीत सातत्याने पूर्वी गोळा केलेल्या संपत्तीच्या नियमित वितरणावर भर देते.

अमेरिका, जपान आणि अनेक युरोपीय देशांसह बऱ्याच विकसित अर्थव्यवस्थांमध्ये, ॲन्यूइटी सेवानिवृत्तीच्या पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा आर्थिक घटक आहे. त्याचप्रमाणे, भारतात, नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) सारख्या चौकटीत सेवानिवृत्तीच्या वेळी विशिष्ट ॲन्यूइटीचे बंधन आहे.

ॲन्यूइटी का महत्त्वाची आहे?

इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घकालीन परतावा देतात, परंतु ते बाजारातील अस्थिरतेबद्दल संवेदनशील असतात. ॲन्यूइटी योजना सातत्याने आणि निश्चित परतावा देऊन अशा चढ-उतारांपासून भांडवली बचतीचे संरक्षण करते. शिवाय, ॲन्यूइटी योजनामुळे थेट चलनवाढीमुळे बचत आणि क्रयशक्ती कमी होण्याच्या जोखमीचेही नियोजन होते.

बहुतेक आर्थिक सल्लागार सेवानिवृत्तीच्या निधीपैकी २५ टक्के ते ३० टक्के रक्कम हप्त्याने मिळणाऱ्या उत्पन्नासाठी बाजूला ठेवण्याची करण्याची शिफारस करतात. व्याजदरातील हालचाल, महागाई आणि सतत बदलणाऱ्या आर्थिक चक्रांमुळे पारंपरिक मालमत्तेतून मिळणाऱ्या निवृत्तीनंतरच्या परताव्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ॲन्यूइटी, एकतर निश्चित किंवा अनुक्रमित पे-आउट स्ट्रक्चरसह, कॅश फ्लोमध्ये स्पष्टता आणते. दुसरे म्हणजे आरोग्य आणि राहाणीमानाचा दर्जा कायम राखण्यासही मदत करते.

बऱ्याच ॲन्यूइटी योजना प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० सी’अंतर्गत करात सवलत देतात. याव्यतिरिक्त, जीवन विमा कंपन्यांद्वारे प्रस्तुत केली गेलेली अनेक ॲन्यूइटी उत्पादने आणखी एक पर्याय देतात. त्यात सेवानिवृत्तावर मृत्यू ओढवल्यास नियमित उत्पन्नाच्या प्रवाहांसह एक खात्रीशीर रक्कम त्यांच्या कुटुंबाला देण्यात येते.

निवृत्तनंतर माणसाला मनःशांती आणि स्वावलंबनाची गरज असते. उत्पन्नाचा एक भाग निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी सुरक्षित आहे याची शाश्वती असली, की सेवानिवृत्तांना छंद, कौटुंबिक जीवन आणि आराम या तिन्हीची उत्तम सांगड घालता येते.

भविष्यातील भारतासाठी

भारताच्या महत्त्वाकांक्षी मनुष्यबळासाठी संपत्ती निर्मिती आवश्यक आहे. सेवानिवृत्तीनंतरचा आर्थिक नियोजनासाठी एक स्थिर निश्चित उत्पन्नाची हमी आवश्यक ठरते. ॲन्यूइटी जीवन विमा योजनांमुळे हे सहज शक्य होते. ॲन्यूइटी योजना जोखीम व्यवस्थापन साधन आहे. सेवानिवृत्तांना आर्थिक अनिश्चितता आणि चिंतापासून संरक्षण देण्यासाठीच त्या तयार करण्यात आल्या आहेत.

संतुलित सेवानिवृत्तीसाठी वैविध्यपूर्ण विविधांगी सेवानिवृत्ती पोर्टफोलिओसाठी व्हेरिएबल आणि फिक्स्ड ॲन्युइटीजचे मिश्रण समाविष्ट असू शकते. व्हेरिएबल ॲन्युइटी ही मार्केट-लिंक्ड पेन्शन उत्पादनामधून मिळवता येते.

संपत्ती वाढविणे हा एखाद्याच्या आर्थिक नियोजनाचा भाग असलाच पाहिजे. परंतु नियमित उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्यानंतर खात्रीशीर उत्पन्नाची हमी हा देखील या नियोजनाचा एक अविभाज्य घटक असला पाहिजे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करणे हे देखील प्राधन्यक्रमात असणे गरजेचे आहे. आयुष्याच्या संध्याकाळी असे संतुलन परिपूर्ण जीवनाचा पाया ठरू शकते.

(लेखक, विमा जागरूकता समितीचे (आयएसी-लाइफ) अध्यक्ष म्हणून कार्यरत आणि त्यांना समितीचे सदस्य ऋषभ गांधी यांचे लेखन साहाय्य)