नवनीत मुनोत
Master your Retirement Planning strategy to tackle inflation and maximize future savings: १९९० च्या दशकातील उन्हाळ्याधील एक सुखद सायंकाळ आहे. लोक कामावरून घरी परतले आहेत, ज्येष्ठ नागरिक सायंकाळी फेरफटका मारून आले आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अजूनही उत्साहाने रसरसलेली मुले हळूहळू घरात येऊ लागली आहेत. प्रत्येक जण गल्लीतल्या अशा एकाच घराकडे धाव घेतोय, ज्यांच्याकडे नवीन टीव्ही आहे, कारण त्यांची आवडती मालिका सुरू होणार आहे. दूरदर्शनवरील त्या मालिका सर्व शेजाऱ्यांना एकत्र आणायच्या. लोक कसे जगायचे, त्यांची स्वप्ने काय असायची, याची एक झलक त्या मालिकांमधून दिसायची. विशेष म्हणजे, त्या काळातील निवृत्त व्यक्ती साधे कपडे घातलेले, चहाचा आस्वाद घेणारे आणि वृत्तपत्र वाचताना दाखवले जायचे. तेव्हा निवृत्तीचा अर्थ आयुष्याचा वेग मंदावणे आणि मर्यादित उत्पन्नात सुखाने जगणे असा असायचा.
निवृत्तीनंतरच्या बदलत्या आयुष्याचा चेहरामोहरा
आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. निवृत्ती म्हणजे आता फक्त आराम करणे राहिलेले नाही. लोकांना आता सक्रिय राहायचे आहे, प्रवास करायचा आहे, आपले छंद जोपासायचे आहेत आणि ज्या जीवनशैलीची त्यांना सवय आहे तीच पुढेही कायम ठेवायची आहे. म्हणूनच म्हणतात ना, ‘साठी हीच आताची चाळीशी झाली आहे!!’ निवृत्त झालेल्या व्यक्तींना अजूनही शांतपणे कॉफीचा आस्वाद घ्यायला नक्कीच आवडेल, पण तो कदाचित भारतातल्या किंवा परदेशातल्या एखाद्या नयनरम्य पर्यटन स्थळावर फिरायला गेल्यावर! खरेतर ३-४ दशकांपूर्वी ही गोष्ट अगदी अशक्य वाटली असती, पण आज अशा आकांक्षा आणि जीवनशैलीच्या निवडी अगदी सामान्य आणि नित्याच्या झाल्या आहेत. आजच्या काळातील जीवनशैलीचा वाढता खर्च निवृत्तीबद्दलच्या जुन्या पारंपरिक कल्पनांना कालबाह्य ठरवतो. म्हणून, आजच्या काळात रिटायरमेंट प्लॅनिंग (निवृत्तीनंतर जीवनाचे नियोजन) पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आणि आवश्यक बनले आहे.
वाढते आयुर्मान आणि वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च
भारतातील व्यक्तींचे आयुर्मान वाढल्यामुळे आता सरासरी आयुर्मान सुमारे ७०.८ वर्षे झाले आहे. त्यामुळे निवृत्ती हा आता केवळ एक छोटा काळ नसून आयुष्यातील मोठा आणि महत्त्वाचा टप्पा बनला आहे. वाढलेले आयुर्मान आणि त्याचसोबत वाढता वैद्यकीय खर्च पाहता काळजीपूर्वक आर्थिक नियोजनाची अत्यंत गरज आहे. जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील महागाईमुळे उपचारांचा खर्च वर्षानुवर्षे महाग होत चालला आहे. एखादा मोठा आजार लाखांचा गंडा घालून वर्षानुवर्षांची बचत संपवू शकतो. २०५० पर्यंत भारतातील ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या ३८ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असल्याने निवृत्तीनंतर जीवनासाठी आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचे, तरीही सर्वात जास्त दुर्लक्षित आर्थिक ध्येय
विविध कारणांमुळे ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ हे आजवरचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक ध्येय आहे, असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. पहिले कारण म्हणजे, बहुतांश व्यक्तींसाठी निवृत्ती अटळ आहे. दुसरे म्हणजे, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि वाढत्या आयुर्मानामुळे निवृत्तीनंतर जगण्याची वर्षे वाढली आहेत. पण, माणूस निवृत्तीनंतर नेमका किती वर्षे जगणार हा आकडा अनिश्चित आहे, ज्यामुळे निवृत्तीनंतर जीवनाचे नियोजन करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आव्हानात्मकही बनते. या अनिश्चिततेमुळे, निवृत्त झालेल्या व्यक्तीला केवळ काही वर्षांसाठीच नव्हे, तर पुढील कित्येक दशकांसाठीच्या खर्चाची सोय करावी लागू शकते. याव्यतिरिक्त, निवृत्ती हे खूप दूरच्या भविष्यातील ध्येय असल्यामुळे बहुतांश व्यक्ती खूप उशीर होईपर्यंत त्याचे नियोजन पुढे ढकलत राहतात. आणि नियोजन करणारे व्यक्ती देखील दीर्घकाळात वाढणारी महागाई (किंमतींमधील आणि राहणीमानातील महागाई) लक्षात घेण्यास कमी पडतात.
अपेक्षा आणि वास्तव यातील तफावत
अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे की, व्यक्तींच्या निवृत्तीनंतरच्या आकांक्षा आणि त्यासाठी त्यांचे आर्थिक नियोजन या दोन्हीमध्ये मोठी विसंगती किंवा तफावत आहे. आजचे अनेक तरुण नोकरदार त्यांच्या पालकांच्या तुलनेत लवकर निवृत्त होण्याची स्वप्ने पाहतात. केवळ अविरत काम करत राहण्यापेक्षा बंधनांमधून मुक्त होऊन स्वतःचे छंद जोपासण्याचे जीवन त्यांना जगायचे असते. पण, या स्वप्नांमध्ये आणि त्यांच्या प्रत्यक्ष आर्थिक नियोजनामध्ये मोठी तफावत निर्माण होत आहे.
देशांचे चक्र: आज तरुण, उद्या वृद्ध
भारत आज एका रंजक वळणावर उभा आहे. सध्या आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत, जिथे तरुणांची संख्या खूप मोठी आहे. एकीकडे आपल्या या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशावर सर्वत्र चर्चा होत असताना दुसरीकडे आपल्याला आपल्या समवयस्क देशांकडून धडा घेऊन पुढील मार्ग निश्चित करण्याची गरज आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चीन, ज्याला मागे टाकून आपण लोकसंख्येच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. वृद्ध होत चाललेल्या आणि आक्रसत चाललेल्या चीनचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत होण्यासोबत तिथल्या वृद्ध लोकसंख्येला भेडसावणाऱ्या संभाव्य आव्हानांकडेही यामुळे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः अशा देशात, जिथे काम करणाऱ्या तरुणांच्या संख्येपेक्षा वृद्ध व्यक्तींची संख्या अधिक असू शकते, तिथे ही आव्हाने अधिक तीव्र होतात.
४-२-१ समस्या
एका उलट्या पिरॅमिडप्रमाणे असणाऱ्या, ‘४-२-१’ या समस्येमुळे (म्हणजेच ४ आजी-आजोबा आणि २ आई-वडील अशा एकूण ६ व्यक्ती एकाच अपत्यावर/मुलावर अवलंबून असणे) आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव असल्यामुळे चीन सध्या मोठ्या लोकसंख्याशास्त्रीय संकटाचा सामना करत आहे. भारताची लोकसंख्या सध्या तुलनेने तरुण असली (भारताचे सरासरी वय २८ वर्षे आहे, तर चीनचे ३८ वर्षे आहे) आणि आपल्याकडील लोकसंख्या २०५० नंतर घटण्याची शक्यता असली, तरी आज योग्य दिशेने पावले उचलल्यास भविष्यातील उपजीविकेचे कोणतेही साधन नसलेल्या मोठ्या वृद्ध लोकसंख्येची परिस्थिती टाळता येऊ शकते. ऐकायला जरी विरोधाभासी वाटले, तरी सरासरी आयुर्मानात झालेली संथ, पण निरंतर वाढ (जी १९५० च्या दशकात सुमारे ३५ वर्षे होती, आता दुप्पट होऊन ७० वर्षे झाली आहे आणि पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे) या समस्येला अधिक गंभीर बनवते. आज भारतात वृद्ध व्यक्तींची संख्या सुमारे १५ कोटी म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या जवळपास १० टक्के आहे. २०५० पर्यंत हा आकडा सुमारे ३५ कोटींवर म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या जवळपास २० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हे अधिक स्पष्टपणे समजून घ्यायचे तर, हा आकडा युनायटेड स्टेट्सच्या सध्याच्या एकूण लोकसंख्येच्या बरोबरीचा आहे.
दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची गरज
निवृत्ती ही अटळ असली तरी अनेकांसाठी अजूनही सर्वात जास्त पुढे ढकलले जाणारे आर्थिक ध्येय आहे. स्वतःचे घर, कार, मुलांचे शिक्षण या गोष्टी व्यक्तींना तातडीच्या व महत्त्वाच्या वाटतात आणि त्यामुळे त्यांना नेहमी प्राधान्य दिले जाते. निवृत्तीनंतर जीवनाचे नियोजन नंतर कधीतरी करू, इतक्यात काय घाई आहे असे नेहमी वाटत राहते. पण तो नंतरचा काळ अपेक्षेपेक्षा खूप लवकर समोर येतो. जेव्हा बहुतांश व्यक्ती याकडे लक्ष देतात, तेव्हा एक चांगला फंड उभारण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी झालेला असतो. याचे उत्तर अवघड नाही, पण त्यासाठी शिस्त आणि लवकर सुरुवात करणे आवश्यक आहे. इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर्समध्ये सातत्याने गुंतवणूक करणे, हा निवृत्तीचा एक मोठा फंड तयार करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो, जो तुम्हाला तुमचे उर्वरित आयुष्य मनासारखे जगण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल.
गल्लीतल्या एखाद्या घरात टीव्हीसमोर एकत्र बसून हसण्या-खिदळण्यापासून ते एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी शांत, सुखद सायंकाळ घालवण्यापर्यंत भारतातील व्यक्तींच्या निवृत्तीनंतर जीवनाबाबत आकांक्षांनी आता मोठा पल्ला गाठला आहे. पूर्वी ज्या निवृत्तीचा अर्थ आयुष्याचा वेग मंदावणे असा असायचा, आता आयुष्य भरभरून आणि दीर्घकाळ जगणे असा झाला आहे. पण या स्वप्नांना योग्य नियोजनाची जोड देणे आवश्यक आहे. बदलती जीवनशैली आणि वाढते आयुर्मान पाहता आता जुन्या पद्धतींवर अवलंबून राहणे चालणार नाही. निवृत्तीनंतर जीवनाच्या नियोजनाबद्दल जागरूकता वाढवणे आणि इक्विटी मालमत्तेमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे, हाच यावरील योग्य मार्ग ठरू शकतो. बऱ्याचदा म्हटले जाते की, चीन श्रीमंत होण्यापूर्वी वृद्ध होत चालला आहे. भारताचा विचार केला तर आपला देश सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या नेहमी श्रीमंत राहिला आहे, पण आता आर्थिकदृष्ट्याही आपण वृद्ध होण्यापूर्वी श्रीमंत होणे ही काळाची गरज आहे.
म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
लेखक एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे (एचडीएफसी एएमसी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत
