प्रेरक परमार
निवृत्ती म्हणजे बऱ्याचदा प्रदीर्घ व्यावसायिक प्रवासाचा शेवटचा टप्पा मानला जातो. ज्यात मोठ्या प्रमाणात पुढील आयुष्याची तजवीज म्हणून निधी जमा करून ठेवला जातो.

या संबंधातील पारंपरिक दृष्टिकोन हा प्रामुख्याने संपत्ती जमा करण्यावर लक्ष केंद्रित करणे हाच राहिला आहे. तथापि, निवृत्तीनंतरचे नियोजन हे केवळ आर्थिक लक्ष्य गाठण्यापेक्षा स्थिर, विश्वासार्ह उत्पन्नाद्वारे समर्थित, निवृत्तीनंतरच्या आयुष्याची नियोजनबद्ध रचना करण्याबद्दल जास्त असते. विश्वासार्हव उत्पन्नस्रोताशिवाय, बाजारपेठेतील अस्थिरता, चलनवाढ आणि अनपेक्षित खर्चामुळे मेहनतीने उभारलेला निधी देखील हळूहळू कमी होऊ शकतो.

 म्हणूनच निवृत्ती नियोजन हे केवळ एकगठ्ठा रकमेच्या मानसिकतेपासून उत्पन्नाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनाकडे वळले पाहिजे. एक सुव्यवस्थित निवृत्ती धोरण केवळ किती संपत्ती निर्माण होते यावर लक्ष केंद्रित करत नाही तर ती संपत्ती दीर्घकालीन आर्थिक गरजा किती प्रभावीपणे पूर्ण करू शकेल याचेही नियोजन करते.

आयुर्मान, वाढती महागाई आणि बदलती जीवनशैली हे सगळे घटक विचारत घेऊन आर्थिक स्वातंत्र्य जपून आत्मविश्वासाने आपला जीवनक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, याची खात्री करणे हे याचे उद्दिष्ट असायला हवे. जीवन विमा योजना आणि मार्केट लिंक्ड प्लॅनसारख्या वाढीला अनुकूल आर्थिक उपायांची संतुलित रचना हे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. निश्चित उत्पन्नाचे पर्याय स्थिरता आणि नियोजन प्रदान करतात, ज्यामुळे आवश्यक खर्च नेहमीच सुटतील याची खात्री होते. त्याच वेळी, वाढ-केंद्रित गुंतवणूक निवृत्त व्यक्तींना महागाईच्या पुढे राहण्यास आणि कालांतराने त्यांच्या बचतीची क्रयशक्ती राखण्यास मदत करतात. एकत्रितपणे, हा संतुलित दृष्टिकोन निवृत्त व्यक्तींना आर्थिक सुरक्षितता आणि लवचिकता दोन्हीचा आनंद देतो.

महत्त्वाचे म्हणजे, निवृत्ती नियोजनात बदलणारी जीवन ध्येय आणि दीर्घ आयुर्मानाचाही विचार केला पाहिजे. लोक अधिक काळ जगतात आणि निवृत्तीनंतर अधिक सक्रियपणे जगतात, त्यामुळे नियोजनबद्ध आणि विश्वासार्ह उत्पन्न हे अधिकच महत्त्वाचे ठरते. भविष्याचा विचार करून, निवृत्तीनंतरही कामी येतील, असे उत्पन्नाचे स्रोत तयार केल्याने निवृत्तीनंतरचे जीवन अधिक आत्मविश्वास आणि मनःशांतीने जगण्यास मदत होते.

आज उपलब्ध असलेल्या निवृत्तीच्या अनेक पर्यायांमुळे एखादी व्यक्ती आयुष्यात खूप लवकर गुंतवणुकीचे नियोजन सुरू करू शकते. उदाहरणार्थ, 30 वर्षांचा व्यावसायिक तिशीतच असे नियोजन करू शकतो, जे त्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी निश्चित उत्पन्नस्त्रोताची हमी देते. जीवन विमा कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या डिफर्ड अॅन्युइटी योजना हे या बदलाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. व्यक्तींना त्यांच्या कामकाजाच्या काळात बचत करण्यास आणि आयुष्याच्या उत्तरार्धात स्थिर उत्पन्न प्रवाहात ते रूपांतरित करण्यास सक्षम करून, हे उपाय शिस्तबद्ध दीर्घकालीन नियोजनाला प्रोत्साहन देतात, तसेच भविष्यातील निवृत्तीच्या गरजांशी जोडून आर्थिक तयारी करतात.

महत्त्वाचे म्हणजे, उत्पन्नाचे विचारपूर्वक नियोजन केल्याने निवृत्तीचा प्रवास सुखकर होतो. जेव्हा व्यक्तींना याची जाणीव असते की, त्यांचा आर्थिक पाया सुरक्षित आहे, तेव्हा निवृत्तीनंतरचे आयुष्य हे अनिश्चिततेने नव्हे तर सन्मानाने जगता येते. तसेच नोकरी करतानाच्या काळात पुढे ढकललेल्या आवडी पूर्ण करण्याचा एक पर्याय उपलब्ध होतो. जसजसे निवृत्ती नंतरचे पर्याय विकसित होत आहेत, तसतसे लक्ष्य स्पष्ट असले पाहिजे: केवळ निवृत्तीची नव्हे तर त्यानंतरच्या आयुष्यातही तयारी करणे.

लेखक भारती एक्सा लाइफ इन्शुरन्सचे चीफ ग्रोथ ऑफिसर