केदार पत्की
सुयोग्य हेतू असूनही जीवन विमा हा अजूनही अनेकांसाठी टाळला जाणारा किंवा सर्वाधिक दुर्लक्षित आर्थिक साधनांपैकी एक आहे. याचा प्रत्यय दरवर्षी सरकारी संस्थांकडून जाहीर होणाऱ्या दरडोई विमा खर्चाच्या (इन्शुरन्स डेन्सिटी) Insurance Density) आणि विम्याच्या व्याप्तीच्या (इन्शुरन्स पेनिट्रेशन) आकडेवारीतून स्पष्टपणे येतो.भारताची वाटचाल पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने वेगाने सुरू असताना, एक महत्त्वाचा पाया अजूनही कमकुवत आहे. तो म्हणजे नागरिकांची आर्थिक सुरक्षितता होय. झपाट्याने आर्थिक प्रगती होत असली तरी, जीवनातील अनिश्चित प्रसंगांपासून व्यक्ती आणि कुटुंबाचे संरक्षण करणारी सक्षम सामाजिक सुरक्षाव्यवस्था देशात अजूनही पुरेशी विकसित झालेली नाही. भारताला खऱ्या अर्थाने आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर विकासाबरोबर आर्थिक सुरक्षितताही तितकीच आवश्यक आहे. जीवन विमा हा या सुरक्षा कवचाच्या अंगाने महत्त्वाची भूमिका निभावतो. मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे.
आजही भारतात विमा संरक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. सुमारे ८० टक्क्यांहून अधिक कुटुंबांकडे जीवन विमा संरक्षण नाही. विमा नियामक ‘इर्डा’च्या २०२४-२५ वार्षिक अहवालानुसार, विमा उद्योगाने ८.८६ लाख कोटी रुपयांचे प्रीमियम उत्पन्न नोंदवत ६.७३ टक्के वाढ साधली असली तरी, प्रत्यक्ष नवीन विमा खरेदीचे प्रमाण सुमारे २.७ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. हे आकडे संरक्षण आणि विम्याचे प्रत्यक्ष खरेदीचे प्रमाण यांतील मोठी दरी दर्शवतात. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे ‘विशिष्ट जीवन टप्प्यावर पोहोचल्यानंतरच जीवन विमा आवश्यक असतो’ ही सर्वसाधारण धारणा. प्रत्यक्षात मात्र, जीवन विमा प्रत्येक वयात आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतो.
उत्साही विशी – तरुण वयात घेतलेला विमा अधिक फायदेशीर
करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील अनेक तरुण व्यावसायिक जीवन विम्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना वाटते की, त्यांच्यावर फारशा जबाबदाऱ्या नाहीत किंवा आश्रितही नाहीत. पण प्रत्यक्षात, कमी वयात जीवन विमा घेतल्यास दीर्घकालीन संरक्षण अत्यंत कमी प्रीमियममध्ये मिळवण्याची संधी मिळते. साधारणपणे तरुण वयात आरोग्य अधिक चांगले असते, त्यामुळे जोखीम कमी आणि प्रीमियमही स्वस्त असतो. लवकर विमा घेतल्यास आयुष्यभरासाठी कमी प्रीमियम निश्चित करून ठेवता येतो. नंतर जबाबदाऱ्या आणि जीवनातील बांधिलकी वाढत गेल्यावर कवच अर्थात ‘कव्हर’ही वाढवता येते. विशेषतः शहरी जीवनात राहणीमान, निवास, जीवनशैली आणि इतर खर्च वयानुसार वाढत जातात. त्यामुळे कमी दरात जीवन विमा लवकर निश्चित करणे अधिक शहाणपणाचे ठरते.
यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत होते आणि सातत्यपूर्ण आर्थिक संरक्षणही मिळते. स्थैर्य देणारी तिशी – कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण उभे करण्याची वेळ तिशीत प्रवेश करताना जीवनात अनेक जबाबदाऱ्या वाढू लागतात. जसे की, विवाह, घर खरेदी आणि पालकत्व यामुळे खर्चाचे स्वरूप बदलते. या टप्प्यावर जीवन विमा हा केवळ संरक्षण नव्हे, तर दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचे प्रभावी साधन ठरू शकतो. तो कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसह भविष्यातील संपत्ती निर्मितीलाही मदत करतो. पण वास्तव असे आहे की, या वयात अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण असतो. आरोग्यसेवेचा वाढता खर्च आणि जीवनशैलीशी संबंधित वाढते धोके लक्षात घेता, विमा संरक्षण वाढवणे, गंभीर आजारांचे (क्रिटिकल इलनेस) ‘कव्हर’ घेणे आणि बदलत्या जीवन उद्दिष्टांनुसार विमा पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेणे अत्यावश्यक ठरते.
जबाबदाऱ्यांनी भरलेली चाळिशी – अधिक व्यापक संरक्षणाची गरज
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या २०२५ च्या सर्वेक्षणाने, देशातील २५.६ टक्के लोकांनी हृदयविकारासारख्या आजार झाल्याची नोंद केली, तर जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत हे प्रमाण १६.७ टक्के होते. या सर्वेक्षणातून असेही स्पष्ट झाले की, ४५ वर्षांवरील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य आजार अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे चाळिशीत करिअर सर्वोच्च टप्प्यावर असले तरी आरोग्याशी संबंधित धोकेही वाढतात. याच काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च, विशिष्ट जीवनशैली टिकवणे आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी अशा अनेक आर्थिक जबाबदाऱ्या शिगेला पोहोचतात. त्याचबरोबर निवृत्ती नियोजनाकडेही लक्ष द्यावे लागते. म्हणूनच चाळिशी हा संपूर्ण आर्थिक नियोजन आणि संरक्षण व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचा टप्पा आहे. या वयात जीवन विमा गुंतवणुकीत विविधता आणणे आवश्यक असते. टर्म प्लॅनसोबत ‘ॲन्युइटी’ आधारित निवृत्तिवेतन अर्थात पेन्शन योजना आणि बचतप्रधान ‘मनी-बॅक’ योजना यांचाही विचार करणे गरजेचे ठरते, जेणेकरून भविष्यातील सर्व अनिश्चित परिस्थितींना तोंड देता येईल.
धोरणात्मक पन्नाशी – निवृत्ती आणि वारशाची तयारी
या टप्प्यावर आपण सक्रिय उत्पन्नाच्या आयुष्याच्या शेवटाकडे पोहोचत असतो. त्यामुळे केवळ संपत्ती साठवण्यापुरते गुंतवणूक धोरण मर्यादित ठेवणे परवडणारे नसते. निवृत्तीनंतर नियमित आणि अंदाजे उत्पन्न मिळणे अत्यावश्यक असते. तसेच, छंद जोपासणे किंवा परदेश प्रवासासारखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक असते. निवृत्ती-निधीचे सक्रिय व्यवस्थापन करण्याची तयारी आणि क्षमता किती आहे यानुसार त्वरित ‘ॲन्युइटी’ योजना निवडता येतात आणि उर्वरित निधी इतर आर्थिक साधनांत वाढीसाठी गुंतवता येतो. सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम पॉलिसी, उदाहरणार्थ हमी उत्पन्न योजना, तसेच टर्म प्लॅन यांचे संयोजन आर्थिक सुरक्षिततेसाठी आदर्श ठरू शकते.
कटू सत्य परंपरागत शहाणपण आपल्याला कुटुंबाची सुरक्षितता, भविष्यातील उद्दिष्टे, निवृत्तीचे आयुष्य आणि वारसा यांचे संरक्षण करण्याचे मार्ग शोधायला सांगते. पण प्रत्यक्षात आपण ‘आज आणि आता’ यापलीकडे फारसा विचार करत नाही आणि आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सोपी पावले उचलत नाही. पण इंग्रजीत म्हणतात तसे, ‘इट इज नेव्हर टू लेट.’ पर्याय अनेक असू शकतात, पण त्यातील योग्य पर्याय निवडून त्यावर कृती करणे हेच महत्त्वाचे आहे. जीवन विमा हा उत्पन्न, जबाबदाऱ्या आणि जीवनाच्या विविध टप्प्यांनुसार बदलत जाणारे एक गतिमान आर्थिक साधन आहे. योग्य वेळी आणि योग्य टप्प्यावर जीवन विम्यात गुंतवणूक केल्यास संपूर्ण आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता अधिक प्रभावीपणे साधता येते. शेवटी, हे असे दीर्घकालीन आर्थिक साधन आहे ज्यात सेवा पुरवणाऱ्याकडे माघार घेण्याचा पर्याय नसतो.
(लेखक इंडिया फर्स्ट लाइफ इन्श्युरन्समध्ये मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत)
