एक दिवस माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला विचारलं – अगं एक सांग ‘मार्केट’ काय म्हणतंय? तू म्हणालीस चांगलं आहे तर मी पैसे गुंतवू शकते. त्यावर मी तिला विचारलं – आता कुठून आले तुझ्याकडे पैसे? मागच्या आठवड्यापर्यंत तर मी सगळेच गुंतवते आणि खर्च करायला काही ठेवत नाही म्हणून माझ्या नावाने ओरडत होतीस. मग आता कसे आले हे पैसे? तर त्यावर म्हणाली – त्याचं कसं आहे की, मला कमी दराने कर्ज मिळतंय, एक वर्षासाठी. माझ्या मनात विचार आला की हे पैसे घेऊन गुंतवले तर आपला फायदा होईल.

कर्जाचा दर ५ टक्के आहे, आपल्या गुंतवणुकीवर आपण नक्कीच यापेक्षा जास्त कमावतो. तर मग संधीचा फायदा घ्यावा म्हणून तुला फोन केला. आता सांग! असा विचार जर तिच्या मनात आला तर तो सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या मनातसुद्धा येत असणार याची मला खात्री आहे. झटपट फायदा, कमी पैशात कोणाला नको असतो. आपले २ पैसे घालून जर १० पैसे मिळत असतील तर हवंच असणार ना? उगीच का घरबसल्या अनेक लोक काहीही समजत नसताना डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग अर्थात फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये व्यवहार करतात. शेअर बाजारात रोज चढ-उतार दिसला की, त्याच्या शेवटच्या टप्प्यात असे लोक गुंतवणूक करायला येतात जे आजपर्यंत बघत होते आणि आता आपणही थोडी जोखीम घेऊन इकडून-तिकडून पैसे उधार घेऊन बाजारात लावू या आणि तेसुद्धा छोट्या किमतीच्या शेअरमध्ये! आणि हे फक्त शेअरपुरतं किंवा अजाण गुंतवणूकदारांपुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा गरजेपलीकडे घेतलेली स्थावर मालमत्ता, सोन्याचे दागिनेसुद्धा अशा प्रकारे घेण्यात येतात. आपल्यातील अनेक सुशिक्षित आणि चांगली कमाई असणाऱ्यांनीसुद्धा असे निर्णय घेतले आहेत. म्हणून आजचा लेख अशा निर्णयांसाठी.

गुंतवणूक करायची का हा पहिला प्रश्न आहे. इथे जोखीम, कालमर्यादा, आर्थिक नियोजन, गुंतवायची रक्कम आणि अपेक्षित परतावे हे पहिलं ठरवणं आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये खात्रीशीर परतावे आहेत, की मागील परतावे बघून गुंतवणूक केली जातेय हे जास्त महत्त्वाचं ठरतं. अनेकदा लोक मागील परतावे पुढे तसेच चालू राहतील या आशेने गुंतवणूक करतात आणि फसतात. शेअर बाजाराच्या बाबतीत तर हे प्रत्येक वेळी लक्षात येतं. जमीन आणि घरांच्या बाबतीतसुद्धा हेच लक्षात येतं. पुढे किमती वाढतील या भीतीपोटी किंवा कुठेतरी गुंतवायला पाहिजे म्हणून घर घेतलं असं करणारे अनेक जण माझ्या परिचयाचे आहेत. पण मुळात आपल्या आर्थिक ध्येयामध्ये एखादी गुंतवणूक नक्की बसते का हे फार कमी लोक बघतात.

अनेकदा असाही अनुभव आलाय की, कोणतीतरी गुंतवणूक योजना संपत आली, अशी बातमी पसरते आणि लोकांना भुरळ पाडली जाते की लगेच पैसे घातले नाही तर फायदा कमवायची एक चांगली संधी निघून जाईल. मग अशा योजनांची नीट चौकशी न करता पैसे गुंतवले जातात. मागील काही वर्षांमध्ये भविष्यात चांगला फायदा मिळेल या अपेक्षेने अनेक प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ येणार या अपेक्षेने अनेकांनी सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे शेअर घेतले. शेअर बाजारात त्या कंपनीचा आयपीओ आला की हवे तितके शेअर मिळणार नाहीत म्हणून आधीच घेतलेले बरे असा विचार करून लोक पैसे गुंतवतात. या कंपन्यांची मागील कामगिरी किती चांगली आहे, पुढे काय करणार, आयपीओमध्ये पैसे गोळा करून नक्की कुठे वापरले जाणार हे अनेकांना माहीतच नसतं. पण तरीसुद्धा सूचिबद्धतेच्या दिवशी होणाऱ्या फायद्याच्या आशेने पैसे गुंतवले जातात. ही एक प्रकारे लॉटरीची मानसिकता झाली. मात्र प्रत्येक वेळी आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा शेअर चांगल्या किमतीवर सूचिबद्ध होईल असे नाही.

सामान्य गुंतवणूकदारांसाठी, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा मार्जिन खात्याद्वारे उधार घेतलेल्या पैशांचा वापर हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी करणे हे एक उच्च-जोखमीचे धोरण आहे. आपण कमी पैसे गुंतवतो, त्याच्यासमोर अपेक्षित फायदा भरपूर झाला तर प्रथमतः हे नक्कीच आकर्षक वाटतं. परंतु एक क्षणभर हासुद्धा विचार केला पाहिजे की तोटा झाला तर किती होईल. मार्जिन भरपाई करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा थोडेथोडे करून कसे पैसे आपल्या खिशातून जातात, हे कळतंच नाही. वायदे बाजारामध्ये नियमित आणि व्यवस्थितरीत्या कामे करण्यासाठी खूप कौशल्य लागतं. छोट्या हालचालींमुळे फ्युचर्स आणि ऑप्शनच्या किमती जलदपणे बदलत असतात. म्हणून इथे नुकसान झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण जाणवतो आणि गुंतवणूकदार एका विनाशकारी कर्जाच्या सापळ्यात सापडू शकतो.

उधार घेतलेल्या पैशाने गुंतवणूक करण्याचा मूलभूत धोका म्हणजे नफा आणि तोटा दोन्हीवर होणारा प्रवर्धन प्रभाव. अनुकूल बाजारात, गुंतवणूकदाराच्या नफ्यावर जास्त परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या किरकोळ गुंतवणूकदाराने शेअर खरेदी करण्यासाठी स्वतःच्या पैशांपैकी १०,००० आणि उधार घेतलेल्या निधीतून १०,००० वापरले, तर १० टक्के बाजारातील नफा २०,००० च्या एकूण गुंतवणुकीवर २,००० चा नफा देईल, त्याच्या मूळ भांडवलावर २० टक्के परतावा.

उलट परिस्थिती खूपच धोकादायक आहे. जर बाजार १० टक्क्यांनी घसरला, तर एकूण गुंतवणूक मूल्य १८,००० पर्यंत घसरते. मूळ १०,००० कर्जाची आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड केल्यानंतर, गुंतवणूकदाराकडे फक्त ८,००० पेक्षा कमी उरतात. तसं पाहायला गेलं तर फायदासुद्धा २००० आणि नुकसानसुद्धा २०००, पण आपली मूळ मुद्दल २० टक्क्यांनी कमी झाली याचा ताण गुंतवणूकदाराच्या मनावर जास्त होतो. याही पलीकडे थोडं जाऊ या, हे नुकसान भरून काढण्यासाठी काही गुंतवणूकदार अजून जास्त जोखीम घेऊन चुकीचे गुंतवणूक निर्णय घेतात. आता त्यांच्या मनात असतो तो अजून मोठा परतावा आणि म्हणून ८,००० गुंतवून ४,००० मिळतील असे गुंतवणूक पर्याय ते शोधतात (५० टक्के परताव्याची अपेक्षा). हे दुष्टचक्र सुरूच राहतं आणि मग तो गुंतवणूकदार कर्जबाजारी होतो किंवा स्वतःचा सगळा पैसा गमावून बसतो.

असा अनुभव कर्ज काढून घेतलेल्या घरांच्या किंवा जमिनीच्या बाबतीतसुद्धा येऊ शकतो. भाडं मिळणार आणि किंमत वाढून फायदा होणार या अपेक्षेने अनेक जण मोठी गुंतवणूक करतात. पण अनेक ठिकाणी घर भाडं खूप कमी मिळतं आणि पुढे घराची किंवा जमिनीची किंमतसुद्धा हवी तशी वाढत नाही आणि घेतलेल्या कर्जाचे व्याज मात्र वाढतं. शिवाय अशा प्रकारची गुंतवणूक मोठी असते. त्यातून हवं तेव्हा बाहेरसुद्धा पडता येत नाही.

कर्जाची परतफेड ही अटळ असल्याने गुंतवणूकदाराला नियमित उत्पन्न किंवा बचत वापरून ते करावं लागतं. पुढे जर कर्जाचे दर वाढले तर हा खर्च झेपेनासासुद्धा होऊ शकतो. जोवर गुंतवणुकीतून परतावे येत आहेत तोवर ठीक, परंतु परतावे कमी झाल्यास आर्थिक ताण येऊ शकतो. शिवाय पुढे होणारं प्रचंड नुकसान टाळण्यासाठी मग ती गुंतवणूक तोट्यात विकण्याची वेळसुद्धा येऊ शकते. याचा जागतिक पातळीवरचा अनुभव आपण २००८ च्या आर्थिक मंदीतून घेतलेला आहे.

गुंतवणूक हा एक मानसिक खेळ

गुंतवणूक हा आर्थिक खेळाइतकाच एक मानसिक खेळ आहे. चांगल्या गुंतवणुकीसाठी संयम, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो. दररोज किंवा मासिक कर्ज परतफेडीचा दबाव या दृष्टिकोनाच्या मुळातच विरोधाभासी आहे, जो ठोस, चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या धोरणाऐवजी भीती आणि लोभावर आधारित अल्पकालीन, सट्टा मनोवृत्तीला प्रोत्साहन देतो.

सामान्य गुंतवणूकदारांसाठी, कर्ज घेतलेल्या निधीतून गुंतवणूक करण्याचे धोके संभाव्य फायद्यांपेक्षा खूपच जास्त असतात. वाढलेले नुकसान, निश्चित व्याज खर्च, मार्जिन कॉल आणि सक्तीच्या विक्रीचा धोका आणि प्रचंड मानसिक भार यांचे संयोजन एक धोकादायक वातावरण निर्माण करते, ज्यामुळे गंभीर आर्थिक नुकसान होऊ शकते.

संपत्तीसाठी धोकादायक ‘शॉर्टकट’ शोधण्याऐवजी, गुंतवणूकदारांसाठी विवेकी मार्ग म्हणजे केवळ अतिरिक्त निधी वापरून शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्माण करणे. याबरोबरच आपत्कालीन निधी तयार करणे, विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये नियमित योगदान देणे आणि वैयक्तिक जोखीम सहनशीलता आणि वेळेच्या क्षितिजासह गुंतवणूक संरेखित करणे हे आहे. एखाद्याचे संपूर्ण आर्थिक भविष्य धोक्यात न घालता आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याचे बरेच सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह मार्ग आहेत. आपला मार्ग आणि प्रवास जरी सोप्पा नसला तरीसुद्धा तो मानसिक ताण वाढवणारा नसावा. तेव्हा सुटसुटीत गुंतणावणूक पर्याय, व्यवस्थित जोखीम व्यवस्थापन आणि योग्य आर्थिक नियोजन करून आपले पैसे चांगल्या पद्धतीने गुंतवावे आणि त्यातून तयार होणाऱ्या संपत्तीचा आनंद आयुष्यभर आणि त्याच्यापलीकडेसुद्धा घ्यावा.

तृप्ती राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com