मुंबई : गुंतवणुकीचे नियोजन करताना आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. गुंतवणुकीवरील आर्थिक मोबदला आकर्षक हवा, त्यासाठी पत्करायची जोखीम जास्त नको तसेच लागतील तेव्हा पैसे उपलब्ध करून द्यायची क्षमता हवी वगैरे.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यापैकी वेगवेगळ्या निकषांना प्राधान्य दिले जाते. या निकषांएवढे सहज मोजमाप न करता येणारे एक भावनिक आव्हान साधारण ३० ते ४० या वयोगटाला पेलावे लागते. नोकरी धंद्यात जम बसायला सुरवात होऊन थोडे आर्थिक स्थैर्य यायला सुरुवात होत असतानाच या वयोगटावर वार्धक्याकडे झुकलेल्या आपल्या आधीच्या पिढीची काळजी घेण्याची जबाबदारी येते तसेच नुकत्याच या जगात पदार्पण केलेल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित आणि सुखकर करण्याचे उत्तरदायित्व देखील येते. या दोन्ही आघाड्या सांभाळतानाच स्वतःच्या आकांक्षांना मूर्तस्वरूप देण्याचे स्वप्न साकार करायची महत्वाकांक्षा देखील असते. अशा रीतीने आपल्या मागील आणि पुढील पिढ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या या कर्तव्यदक्ष वयोगटाला म्हणूनच सँडविच जनरेशन असे संबोधले जाते.
या कालावधीत आर्थिक ओढाताण तर होतेच पण त्याबरोबरच भावनिक ताणतणाव आणि वेळेची कमतरता यामध्ये उमेदीची ही वर्षे कशी निघून जातात ते काळात देखील नाही. त्यामुळेच या वयोगटासाठी गुंतवणूक व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असते.
