Akshaya Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी एक रंजक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या एका वर्षात जागतिक अस्थिरता आणि भूराजकीय तणावामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली असताना, ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याने मात्र गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात ‘निफ्टी ५०’ मधील तब्बल ४८ दिग्गज कंपन्यांना सोन्याने कामगिरीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
सोन्याची निफ्टीच्या तुलनेत मोठी भरारी
३० एप्रिल २०२५ (गेल्या वर्षीची अक्षय्य तृतीया) पासून आजपर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास, सोन्याच्या किमतीत तब्बल ६२% वाढ झाली आहे. याउलट, शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक असलेल्या ‘निफ्टी ५०’ ने केवळ ०.७% इतकाच परतावा दिला आहे. यातून गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित मालमत्तेकडे झुकल्याचे दाखवत आहे.
२ शेअर्सचा सोन्याला ‘धोबीपछाड’
निफ्टी ५० मधील केवळ दोनच शेअर्स असे आहेत ज्यांनी सोन्याच्या ६२% परताव्याला मागे टाकले आहे. श्रीराम फायनान्स या शेअरने ६९% परतावा देऊन अव्वल स्थान पटकावले आहे. तर हिंदाल्को इंडस्ट्रीज या शेअरने ६७.७% इतका जोरदार परतावा दिला आहे. तसेच टाटा स्टील (५३.८%) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (४६%) यांनीही चांगली कामगिरी केली. मात्र, त्यांना सोन्याला मागे टाकता आले नाही.
का वधारले ‘हे’ दोन शेअर्स?
बाजार तज्ज्ञांच्या मते, श्रीराम फायनान्सने एमएसएमई आणि गोल्ड लोन क्षेत्रात घेतलेली भरारी त्यांच्या पथ्यावर पडली आहे. कंपनीचा भांडवली पर्याप्तता गुणोत्तर २०.५% इतका मजबूत आहे. दुसरीकडे, हिंदाल्को इंडस्ट्रीजने केवळ कमॉडिटी प्लेयर न राहता उच्च नफा देणारी उत्पादने बनवण्यावर भर दिला आहे.
सोने पुढील वर्षी १.८५ लाखांपर्यंत मजल मारेल?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याची तेजी येत्या काळातही कायम राहील. पुढील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,३०० ते ५,५०० डॉलर्सपर्यंत आणि भारतीय बाजारात १,७०,००० ते १,८५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
