Financial Planning : आम्ही १०० रुपयांत महिन्याभराचा किराणा भरत होतो, आता २ भाज्याही येत नाही, हे वाक्य मोठ्यांकडून तुमच्याही कानावर कधी ना कधी पडले असेल. ह्याचं मुख्य कारण आहे, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई. मुलं, शिक्षण, लग्न किंवा स्वतःची आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस राबून पैसे जमवतो. अनेकांना वाटते की आपल्याकडे १ कोटी रुपये जमा झाले की आपले भविष्य सुरक्षित झाले. पण हा केवळ एक ‘आकडा’ आहे, त्याचे ‘मूल्य’ नव्हे. भारतात सध्या ज्या वेगाने महागाई वाढत आहे, त्या तुलनेत रुपयाची खरेदी करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परिणामी गुंतवणूक करण्यापूर्वी महागाईचं गणित समजून घेणे काळाजी गरज बनली आहे.
१० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचे मूल्य किती असेल?
भारतातील सरासरी महागाई दर ६% गृहीत धरला, तर ‘इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर’नुसार धक्कादायक आकडेवारी समोर येईल. आज तुम्ही १ कोटी रुपयांत जेवढ्या वस्तू खरेदी करू शकता, तेवढ्याच वस्तू १० वर्षांनंतर खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल १.७९ कोटी रुपये मोजावे लागतील. जर आपण रुपयाच्या आजच्या मूल्याशी तुलना केली, तर १० वर्षांनंतर तुमच्या १ कोटी रुपयांची खरी किंमत फक्त ५६ लाख रुपये उरेल.
तुमच्या बचतीचा ‘छुपा शत्रू’ कोण?
महागाई म्हणजे केवळ वस्तूंचे दर वाढणे नव्हे, तर तुमच्या रुपयाची क्षमता कमी होणे आहे. अनेक लोक सुरक्षिततेसाठी पैसे बचत खात्यात (३% परतावा) किंवा एफडीमध्ये (६.५% परतावा) ठेवतात. पण लक्षात घ्या, जर महागाई दर ६% असेल आणि तुमचा परतावा ६.५% असेल, तर तुमचा प्रत्यक्ष नफा केवळ ०.५% आहे. कर वजा जाता तुमची संपत्ती वाढण्याऐवजी प्रत्यक्षात कमीच होत जाते.
गुंतवणुकीतून महागाईला कसे हरवायचे?
तुमच्या पैशांचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी केवळ ‘बचत’ पुरेशी नाही, तर ‘गुंतवणूक’ महत्त्वाची आहे. १५ वर्षांच्या कालावधीसाठी १ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध पर्यायांनुसार होणारे मूल्य खालीलप्रमाणे असू शकते.
| गुंतवणुकीचा प्रकार | सरासरी परतावा | १५ वर्षांनंतरचे मूल्य | जोखीम |
| म्युच्युअल फंड | १२% | ५.४७ कोटी | जास्त |
| मुदत ठेव | ६.५% | २.६३ कोटी | कमी |
| बचत खाते | ३% | १.५६ कोटी | अत्यंत कमी |
स्मार्ट गुंतवणूकदारासाठी कानमंत्र
- तुमची गुंतवणूक अशा ठिकाणी असावी जिथे परतावा महागाई दरापेक्षा (किमान ७-८% पेक्षा) जास्त असेल.
- दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण त्यात महागाईला हरवण्याची क्षमता असते.
- दरवर्षी आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घ्या आणि महागाईनुसार तुमच्या गुंतवणुकीचा आकडा वाढवा.
