Lifestyle Inflation : महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पगार असेलेल्या कर्मचाऱ्यांना वाटत असेल, की लाखभर रुपये पगार असता तर आपण किती आरामात जगलो असतो. मोठ्या बचतीच्या जोरावर श्रीमंतही होता आले असते. पण, हा अनेकांचा समज बंगळुरू येथील चार्टर्ड अकाउंटंट मीना गोयल यांनी एका पोस्टद्वारे खोडून काढला आहे. केवळ मोठी सॅलरी म्हणजे संपत्ती निर्मिती नव्हे, असा इशारा देताना त्यांनी मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय नोकरदारांच्या बदलत्या जीवनशैलीवर बोट ठेवले आहे.
कमाई वाढली पण खर्चही पळतोय दुप्पट वेगाने
मीना गोयल यांच्या निरीक्षणानुसार, महिन्याला १.२ लाख रुपये कमावणारे अनेक तरुणांचे खिसे महिनाअखेरीस रिकामे असतात. याचे मुख्य कारण त्यांनी ‘लाईफस्टाईल इन्फ्लेशन’ हे सांगितले आहे. पगार वाढला की लोकांच्या गरजा आणि खर्च त्याहून वेगाने वाढतात, ज्यामुळे बचतीला वावच राहत नाही.
सरासरी महिन्याच्या खर्चाचे गणित
- घरभाडे : ३५,००० रुपये
- कर्जाचे हप्ते : ३०,००० रुपये
- मौजमजा व फिरणे : २०,००० रुपये
- घरगुती खर्च (किराणा/बीले) : १५,००० ते २०,००० रुपये
- या हिशोबानंतर महिन्याच्या सुरुवातीलाच पगाराचा मोठा हिस्सा खर्च झालेला असतो. यातून शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे बचत समजली जाते. पण गोयल यांच्या मते हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे.

बचत ‘उरलेल्या’ पैशांची नसते!
संपत्ती फक्त जास्त उत्पन्न मिळवल्याने तयार होत नाही. तर त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन असायला हवे, असे गोयल सांगतात. बहुतांश लोक आधी खर्च आणि उरलेल्या पैशातून बचत करतात. मात्र, श्रीमंत होण्यासाठी आधी ठराविक रक्कम बाजूला काढून मग उरलेल्या पैशात खर्च भागवण्याची शिस्त असणे गरजेचे आहे. जेव्हा तुमचे ठराविक खर्च तुमच्या उत्पन्नाच्या ७०-८० टक्के भाग व्यापतात, तेव्हा तुमची आर्थिक लवचिकता संपते.
उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले तरी परिस्थिती बदलणार नाही!
या पोस्टच्या खाली नेटकऱ्यांनी अनेक मुद्दे मांडले. काही युजर्सनी मत मांडले की, फक्त खर्च कमी करून श्रीमंत होता येत नाही, तर स्वत:चे कौशल्य अद्ययावत करून उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. पण, प्रत्यक्षात उत्पन्न वाढूनही तुमचे खर्चही वाढत असतील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
आर्थिक स्वातंत्र्यासाठी तज्ज्ञांचे ३ मंत्र
- उत्पन्न ज्या वेगाने वाढते, त्यापेक्षा खर्चाचा वेग कमी ठेवा.
- पगाराच्या ३० टक्क्यांहून अधिक हिस्सा हप्त्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या.
- पगार हातात आला की पहिली बचत बाजूला करा आणि उर्वरित पैशात खर्च भागवा.
