Best Investment Options : सध्याच्या अनिश्चित काळात आर्थिक नियोजनाबाबत सजग असणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा प्रभाव आणि इझी मनी (Easy Money) मिळवण्याच्या नादात अनेकजण चुकीचे निर्णय घेतात. गुंतवणुकीचा निर्णय घाईगडबडीत न घेता, स्वतःचे आर्थिक ध्येय आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता विचारात घेऊनच घेतला पाहिजे. योग्य प्रकारे ‘पोर्टफोलिओ विविधीकरण’ केलं तर केवळ आपले पैसे सुरक्षित राहत नाही तर महागाईतही चांगला नफा मिळवता येतो. इथे आपण ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन समजून घेऊ. समजा तुमच्याकडे आता ५ लाख रुपये आले आहेत आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा हवा आहे.
१. सुरक्षित आणि हमखास परतावा
- जर तुम्हाला शेअर बाजारातील जोखीम टाळून निश्चित परतावा हवा असेल तर बँक आणि पोस्टातील मुदत ठेव हा पर्याय चांगला आहे. ५ लाखांपैकीत २.५ ते ३ लाख रुपये तुम्ही बँक मुदत ठेव किंवा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये ठेवू शकता. येथे तुम्हाला ६.५% ते ७.५% पर्यंत हमखास व्याज मिळते.
- आता महागाईवर मात करण्यासाठी १.५ लाख ते २ लाख रुपये लिक्विड किंवा शॉर्ट-ड्यूरेशन डेट फंडमध्ये गुंतवा. यात एफडीपेक्षा काहीसा चांगला परतावा आणि गरजेच्या वेळी लगेच पैसे काढण्याची सोय मिळते. यामध्ये मूळ भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते आणि आणीबाणीच्या वेळी सहज पैसे उपलब्ध होतात.
२. मध्यम जोखीम घेणाऱ्यांसाठी कोणता पर्याय?
- जर तुम्ही ५ ते ७ वर्षांच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असाल आणि थोडी जोखीम घेण्याची क्षमता असेल तर २.५ लाख हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवा. हे फंड तुमचे पैसे शेअर बाजार आणि फिक्स्ड इन्कम (डेट) दोन्हीमध्ये विभागून लावतात, ज्यामुळे जोखीम संतुलित राहते.
- यातील १.५ लाख लिक्विड फंडात ठेवून ‘सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन’द्वारे दरमहा निफ्टी-५० इंडेक्स फंडात हळूहळू ट्रान्सफर करा.
- १ लाख (एकूण निधीच्या २०%) सोन्यात गुंतवा. जेणेकरुन बाजारातील मंदीच्या काळात सोन्यातील गुंतवणूक पोर्टफोलिओला संरक्षण देईल.
३. जास्त जोखीम आणि उच्च परतावा
- तुमचे वय २५ ते ३० वर्षांदरम्यान असेल आणि बाजारातील जोखीम पेलण्याची क्षमता असेल तर तुम्ही ३.५ लाख ते ४ लाख रुपये ही रक्कम लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप आणि स्मॉल/मिड कॅप फंडमध्ये विभागून लावा. संपूर्ण रक्कम एकाच वेळी बाजारात न लावता लिक्विड फंडात ठेवा आणि एसटीपीद्वारे पुढील ६ ते १२ महिन्यांत टप्प्याटप्प्याने इक्विटीमध्ये वर्ग करा.
- जर तुम्हाला शेअर बाजाराची समज असेल, तर १ लाख अमेरिकन बाजारातील S&P 500 ETF किंवा भारतातील टॉप-१० ब्लूचिप शेअर्समध्ये गुंतवू शकता.
स्मार्ट गुंतवणुकीसाठी ‘या’ ३ गोष्टींची काळजी घ्या
५ लाखांपैकी किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाचा निधी आणीबाणीचा फंड वेगळा ठेवा आणि उर्वरित रक्कमच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरा.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी ‘एसटीपी’ किंवा ‘एसआयपी’चा मार्ग निवडा, जेणेकरून बाजारातील घसरणीचा फायदा घेता येईल.
एफडीच्या व्याजावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. तर इक्विटीमध्ये १ वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर १.२५ लाखांपेक्षा जास्त नफा झाल्यास १२.५% लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागू होतो.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
