Investment Tips : गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात पहिला प्रश्न येतो, ‘माझ्या पैशांवर सर्वाधिक परतावा कुठे मिळेल?’ पारंपरिक पर्याय असलेले मुदत ठेव, सोने की शेअर बाजारपेठेशी जोडलेले म्युच्युअल फंड? जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ लाख रुपये या तिन्ही पर्यायांमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवले असते, तर कोणत्या पर्यायाने बाजी मारली असती? ही आकडेवारी तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच देईल. त्यासोबत गुंतवणुकीचा निर्णय घेणे अधिक सोपे होईल.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय मुदत ठेव

मुदत ठेव हा पारंपरिक आणि सुरक्षित मानला जाणारा पर्याय आहे. अजूनही बहुतांश लोक बँकेतील मुदत ठेवींना पसंती देत आहेत. जर एखाद्या बँकेत तुम्ही ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले तर ६.५% वार्षिक व्याजदराने ५ वर्षांनंतर मिळणारी रक्कम सुमारे ६.९० लाख रुपये असेल. म्हणजे या गुंतवणुकीवर तुम्हाला अंदाजे १.९० लाख रुपये परतावा मिळाला आहे.

गुंतवणुकीचा नवीन पर्याय म्युच्युअल फंड

दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड हा सध्याचा लोकप्रिय पर्याय आहे. जरी यातील परतावा बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असला, तरी दीर्घकाळात त्याने ऐतिहासिकदृष्ट्या चांगली कामगिरी केली आहे. समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडात ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले. यातून मिळणारा अपेक्षित परतावा १५ टक्के इतका गृहीत धरला. तर ५ वर्षांनंतर तुम्हाला सुमारे १०.०३ लाख रुपये मिळतील. म्हणजे ५ वर्षात तुमची कमाई जवळपास दुप्पट होईल. म्युच्युअल फंड बाजाराशी संलग्न असल्यामुळे यात जोखीम असते. प्रत्येकवेळी १५ टक्केच परतावा मिळेल असं नाही. कमी जास्त होऊ शकतो.

महागाईला हरवणारे सोने

आर्थिक अनिश्चितता आणि महागाईच्या काळात सोने हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय मानला जातो. पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी सोन्याला महत्त्व दिले जाते. समजा तुम्ही सोन्यात ५ लाख रुपये गुंतवले आणि अपेक्षित परतावा वार्षिक १० टक्के धरला तर ५ वर्षांनंतर मिळणारी रक्कम सुमारे ८.०५ लाख रुपये होईल. यावर तुम्हाला अंदाजे ३.०५ लाख रुपये परतावा मिळू शकतो. सोन्यातील गुंतवणुकीत जोखीम कमी असून बाजारात अस्थिरता असताना सोने पोर्टफोलिओला स्थैर्य देण्याचे काम करते. १० टक्के हा परतावा आपण सरासरी धरला आहे. वास्तविक, गेल्या ५ वर्षात सोन्याने १२० ते १७० टक्के परतावा दिला आहे.

५ वर्षांतील ५ लाख रुपयांची वाढ

गुंतवणूक पर्यायवार्षिक परतावा (अंदाजे)५ वर्षांनंतरची अंदाजित रक्कम
म्युच्युअल फंड१५%१०.०३ लाख रुपये
सोने१०%८.०५ लाख रुपये
मुदत ठेव६.५%६.९० लाख रुपये

तुमच्यासाठी कोणता पर्याय उत्तम?

जर तुम्हाला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा हवा असेल, तर मुदत ठेव हा योग्य पर्याय आहे. जर तुम्ही थोडी जोखीम पत्करून महागाईपेक्षा जास्त परतावा मिळवू इच्छित असाल, तर म्युच्युअल फंड सरस ठरतात. तर, पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सोने हा एक चांगला पर्याय आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे सांगतात, की ‘सर्वच अंडी एका बास्केटमध्ये ठेवू नका’. त्याचप्रमाणे तुमची संपूर्ण रक्कम एकाच पर्यायात न गुंतवता ती वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागून गुंतवावी. यामुळे तुमची जोखीम कमी होऊन परतावा संतुलित राहण्यास मदत होईल.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.