Is Rs 50000 Salary Enough For Investment In India: भारतात महिन्याला सुमारे ५०,००० रुपये निव्वळ पगार मिळवणे हा एक महत्त्वाचा आर्थिक टप्पा मानला जातो. यातून मूलभूत खर्च भागवल्यानंतर महिन्याच्या शेवटी काही पैसे शिल्लक राहतात. पण अशा अवस्थेत अनेक पगारदार व्यावसायिकांना एक प्रश्न सातत्याने सतावतो. तो प्रश्न म्हणजे अनावश्यक जोखीम न पत्करता शिल्लक पैशांची गुंतवणूक कुठे आणि कशी करावी? आर्थिक मार्गदर्शकांच्या मते, हे ५० हजारांचे उत्पन्न जर शिस्त, सुरक्षितता आणि स्पष्ट आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून वापरले, तर दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करण्यास पुरेसे आहेत.

सेबी आरआयए आणि सहज मनीचे संस्थापक अभिषेक कुमार यांनी सांगितले की, सर्वप्रथम एक सुरक्षा कवच तयार करणे, स्पष्ट बजेटचे पालन करणे आणि दीर्घकालीन उद्दिष्टांना बाधा पोहोचवू शकणाऱ्या धोकादायक शॉर्टकट्सपासून दूर राहणे हे महत्त्वाचे आहे.

गुंतवणुकीची पहिली पायरी

कुमार म्हणाले की, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी पहिली पायरी म्हणजे आपत्कालीन निधी तयार करणे. “पहिली पायरी म्हणजे ६ ते १२ महिन्यांच्या अत्यावश्यक खर्चासाठी आपत्कालीन निधी तयार करणे. ज्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न ५०,००० रुपये आहे आणि ज्याचा सामान्य मासिक खर्च ३५,००० रुपये आहे, त्याने १,०५,००० ते २,१०,००० रुपयांच्या आपत्कालीन निधीचे लक्ष्य ठेवावे.” असे असले तरी, ते हा पैसा सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देतात.

“हा पैसा सहज उपलब्ध होण्यासाठी वेगळ्या बचत खात्यात किंवा लिक्विड फंडात ठेवा आणि त्यानंतरच गुंतवणुकीकडे वळा. हे नोकरी जाणे, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अनपेक्षित खर्चांपासून आर्थिक संरक्षण देते.”

बजेटिंग नियम

५०,००० रुपयांच्या पगारातून किती गुंतवणूक करावी याबद्दल कुमार एका सोप्या बजेटिंग पद्धतीची शिफारस करतात. ते म्हणतात, “सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या ५०/३०/२० बजेटिंग नियमाचा वापर करून उत्पन्नापैकी ५०% रक्कम अत्यावश्यक गरजांसाठी, ३०% ऐच्छिक खर्चासाठी आणि २०% बचत व गुंतवणुकीसाठी राखून ठेवा.”

ते पुढे म्हणतात की, दरमहा बाजूला ठेवलेल्या १०,००० रुपयांमधून,”जो पर्यंत तुमचा आपत्कालीन निधी पूर्णपणे तयार होत नाही, तोपर्यंत तुम्ही ६,००० ते ८,००० रुपये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवू शकता, तर २,००० ते ४,००० रुपये आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी किंवा तो टिकवून ठेवण्यासाठी बाजूला काढून ठेवू शकता.”

दीर्घकालीन संपत्तीसाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचे पर्याय

दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी कुमार सोप्या गोष्टींची शिफारस करतात. ते म्हणतात, “इंडेक्स किंवा फ्लेक्सिकॅप फंडांमधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) हे सर्वोत्तम पर्याय आहेत. हे फंड स्थिर, प्रस्थापित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.”

ते नवशिक्यांना अनावश्यक जोखीम न घेण्याचा इशारा देतात. “बाजाराचे ज्ञान नसल्यास नवख्या गुंतवणूकदारांनी थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळावे, कारण त्यात नवशिक्यांसाठी जास्त धोका असतो”, असे ते म्हणतात.

या उत्पन्न पातळीवर एसआयपी सर्वोत्तम का?

कुमार यांच्या मते मासिक गुंतवणूक पगारदार लोकांसाठी योग्य आहे. “मासिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एसआयपी आदर्श आहेत, कारण त्यातून शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते आणि रुपया कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा मिळतो”, असे कुमार यांनी म्हटल्याचा उल्लेख इंडिया टुडेच्या वृत्तात करण्यात आला आहे.