Nithin Kamath Portfolio Diversification Advice : ‘गुंतवणूक करताना सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत’ हे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. याच नियमाचा पुनरुच्चार करत देशातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी ‘झिरोधा’चे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. एकाच विशिष्ट शेअरमध्ये किंवा सेक्टरमध्ये मोठी रक्कम गुंतवून ‘कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ’ बनवण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी ‘ईटीएफ’ किंवा विविध शेअर्सचा बास्केट खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते, असे कामथ यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी आयटी क्षेत्राचे उदाहरण दिलं आहे.
५ वर्षांत ‘निफ्टी आयटी’ ८% घसरला, पण ‘TCS’ ४०% पडला!
नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिग्गज आयटी कंपनी टीसीएस आणि निफ्टी आयटी इंडेक्सच्या कामगिरीची तुलना करत डायव्हर्सिफिकेशनचे महत्त्व पटवून दिले. कामथ यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांत ‘निफ्टी आयटी इंडेक्स’मध्ये सुमारे ८ टक्के घसरण झाली आहे. मात्र, याच कालावधीत आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टीसीएस’चा शेअर तब्बल ४० टक्क्यांनी घसरला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त टीसीएसमध्येच सर्व पैसे लावले असते, तर त्याला ४०% मोठे नुकसान सहन करावे लागले असते. पण जर त्याने संपूर्ण आयटी इंडेक्स किंवा ईटीएफमध्ये पैसे लावले असते, तर नुकसान खूप कमी (८%) झाले असते. म्हणूनच, विशिष्ट शेअर्स निवडण्यापेक्षा इंडेक्स किंवा ईटीएफचा पर्याय सामान्य लोकांसाठी केव्हाही चांगला, असे कामथ म्हणाले.
झिरोधा आणणार ‘काइट नज’ हे नवीन फिचर
गुंतवणूकदारांना एकाच क्षेत्रात जास्त पैसे गुंतवण्यापासून रोखण्यासाठी झिरोधा एका नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. कामथ यांनी सांगितले की, कंपनी ‘काइट नज’ नावाचे एक नवीन अलर्ट फिचर लाँच करणार आहे. यामध्ये जेव्हा एखादा ट्रेडर किंवा गुंतवणूकदार नवीन ऑर्डर प्लेस करेल, आणि जर त्याची गुंतवणूक एखाद्या विशिष्ट सेक्टरमध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त (उदा. X%) होत असेल, तर सिस्टीम त्याला त्वरित अलर्ट (नज) करेल. यामुळे गुंतवणूकदारांना जोखीम व्यवस्थापन करणे सोपे जाईल.
चार दिवसांच्या घसरणीनंतर आयटी शेअर्समध्ये जोरदार कमबॅक
गेल्या ४ सत्रांपासून सातत्याने घसरणाऱ्या आयटी शेअर्समध्ये गुरुवारी (२ जुलै २०२६) अचानक जोरदार खरेदी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत येत असतानाही भारतीय बाजारात आयटी इंडेक्स ४ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. यामध्ये इन्फोसिस ५.१%, टाटा टेक्नॉलॉजीज ५.०%, कोफोर्र्ज ४.६%, एचसीएल टेक ४.०%, टीसीएस ३.२%, टेक महिंद्रा २.६%, विप्रो २.३% या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
