Best Pension Plans : निवृत्तीनंतर सुखी आणि सन्मानाचं आयुष्य जगायचं असेल तर आर्थिक स्वातंत्र्य असणे फार आवश्यक आहे. जेणेकरुन कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. यासाठी नोकरी किंवा व्यवसाय सुरू केल्यानंतर लवकरात लवकर निवृत्ती नियोजन करणे आवश्यक आहे. खासगी क्षेत्रात काम करणारेही सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्तीनंतर मोठी पेन्शन मिळवू शकतात. सध्या बाजारात एनपीएस (NPS), पीपीएफ’ (PPF), ईपीएफ’ (EPF), अटल पेन्शन (APY) आणि श्रम योगी मानधन यासारख्या अनेक योजना आहेत. पण, यात तुमच्यासाठी योग्य योजना कोणती? याचे उत्तर तुमचे वय, मासिक उत्पन्न, नोकरीचे स्वरूप आणि निवृत्तीनंतरचे उद्दिष्ट यावर अवलंबून आहे.
१. NPS : दीर्घकाळासाठी मोठा फंड उभारण्याची संधी
जर तुमचे वय २० ते ४५ दरम्यान असेल आणि तुम्हाला शेअर बाजारासारखा परतावा हवा असेल, तर एनपीएस हा सर्वोत्तम पर्याय आहे. वयाच्या ३० व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक ६० व्या वर्षापर्यंत (३० वर्षे) केल्यास, एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये होईल. सरासरी १०% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास सुमारे १.१३ कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. निवृत्तीच्या वेळी ६०% रक्कम (सुमारे ६८ लाख रुपये) करमुक्त काढता येते, तर उर्वरित ४०% रकमेतून अॅन्युइटी खरेदी करून दरमहा पेन्शन मिळते.
२. EPF आणि PPF : सुरक्षित गुंतवणुकीचे आधारस्तंभ
EPF (नोकरदारांसाठी) : मूळ पगार ४०,००० रुपये असल्यास, कर्मचारी आणि मालकाचे योगदान मिळून दरमहा सुमारे ९,६०० रुपये जमा होतात. ३० वर्षांच्या सेवाकाळात त्यावर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजामुळे एक प्रचंड मोठा निधी तयार होतो.
PPF (जोखमी नको असणाऱ्यांसाठी): दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवल्यास (सध्याचा ७.१% व्याजदरानुसार) १५ वर्षांत सुमारे ४० लाख रुपयांचा करमुक्त फंड तयार होतो. हा कालावधी पुढे ५-५ वर्षांनी वाढवता येतो.
३. असंघटित कर्मचाऱ्यांसाठी
- अटल पेन्शन योजना (APY) : वयाच्या २५ व्या वर्षी दरमहा केवळ ३७६ रुपये जमा केल्यास, ६० व्या वर्षानंतर आयुष्यभर ५,००० रुपये दरमहा निश्चित पेन्शन मिळते.
- पीएम श्रम योगी मानधन (PM-SYM) : फेरीवाले, मजूर आणि लहान दुकानदारांसाठी ही योजना आहे. ३० व्या वर्षी कामगाराने दरमहा १०० रुपये भरल्यास, सरकारही स्वतःकडून १०० रुपये जमा करते. ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन निश्चित मिळते.
तुमच्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम ठरले?
- तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल तर ईपीएफ आणि एनपीएस दोन्ही योजना उत्तम. ईपीएफ सुरक्षितता देईल, तर एनपीएस महागाईवर मात करणारा फंड बनवेल.
- जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर एनपीएस आणि पीपीएफ चांगले पर्याय आहेत. यातून वाढीव परतावा आणि टॅक्स-फ्री बचत असे दोन्ही साध्य होते.
- तुम्ही जर गीग वर्कर्स (डिलिव्हरी बॉय) किंवा असंघटीत क्षेत्रात काम करत असाल तर अटल पेन्शन योजना आणि पीएम श्रम योगी मानधन तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
निवृत्तीसाठी किती फंड हवा?
निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा जितका खर्च अपेक्षित आहे, त्याच्या किमान २०० ते २५० पट फंड असावा, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, निवृत्तीनंतर दरमहा २०,००० रुपये पेन्शन हवी असेल, तर तुमच्याकडे किमान ५० लाख ते ६० लाख रुपयांचा निवृत्ती फंड असायला हवा.
