PFRDA launches NPS Sanchay : निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आरामात पेन्शनवर जगण्याचे अनेकांचे स्वप्न आता सत्यात उरतणार आहे. देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी केंद्र सरकारने ‘एनपीएस संचय’ ही नवीन पेन्शन योजना आणली आहे. अत्यंत साधी रचना आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे राबवली जाणारी ही योजना सर्वसामान्य कामगार वर्गासाठी वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः रोजंदारी मजूर, छोटे दुकानदार आणि शेतकरी यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

योजनेचा मुख्य उद्देश आणि गरज

देशात असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्यामध्ये रोजंदारी मजूर, छोटे दुकानदार, घरगुती कामगार, चालक, शेतकरी आणि गिग वर्कर्सचा समावेश होतो, त्यांना सहसा सरकारी किंवा मोठ्या खासगी कंपन्यांप्रमाणे निवृत्तीचे लाभ मिळत नाहीत. उतारवयात या वर्गाला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. हा पेच सोडवण्यासाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) ही योजना ‘ऑल सिटीझन मॉडेल’ अंतर्गत सुरू केली आहे.

सर्वसामान्यांसाठी सोपी रचना

नियमित एनपीएसमध्ये गुंतवणूकदारांना फंड मॅनेजर आणि गुंतवणुकीचा प्रकार निवडताना अनेकदा गोंधळ होतो. ‘एनपीएस संचय’मध्ये अशी कोणतीही भानगड ठेवली नाही. ज्यामुळे गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. अर्थसाक्षरता कमी असलेल्या ग्रामीण भागात ही योजना गेमचेंजर ठरणार आहे.

पात्रता आणि नोंदणी कशी करावी?

वय वर्ष १८ ते ८५ वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. नागरिक ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या ‘पॉईंट ऑफ प्रेझन्स’ सेवा केंद्रावर जाऊन आपले पेन्शन खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी केवायसी नियमांचे पालन करणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

गुंतवणुकीचे नियम आणि परतावा

‘एनपीएस संचय’ योजनेचे गुंतवणुकीचे धोरण सध्याच्या सरकारी आणि अटल पेन्शन योजनेच्या धर्तीवरच असेल. यामध्ये गुंतवणूकदारांना हवे असल्यास फंड मॅनेजर बदलण्याची मुभा देखील असेल, मात्र त्यासाठी नियमित एनपीएसचे नियम लागू राहतील.

पैसे काढण्याचे नियम आणि शुल्क

या योजनेतून पैसे काढण्याचे आणि बाहेर पडण्याचे नियम नियमित नॅशनल पेन्शन सिस्टमप्रमाणेच राहतील. तसेच, या योजनेचे शुल्क देखील ‘एनपीएस वात्सल्य’ किंवा ‘एनपीएस लाईट’ प्रमाणेच किमान असतील, जेणेकरून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांवर भार पडणार नाही. भविष्यात नियमांत बदल झाल्यास ते या योजनेला आपोआप लागू होतील. ‘एनपीएस संचय’ ही केवळ एक गुंतवणूक योजना नसून असंघटित कामगारांच्या सुरक्षेची चावी आहे. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीलाही आपल्या भविष्यासाठी बचत करता यावी, हा या योजनेचा सर्वात मोठा विजय आहे.