SIP Investors : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची सध्या ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सेन्सेक्स १००० अंशानी घसरून ७६,३०० च्या पातळीवर आला, तर निफ्टी ३०० हून अधिक अंशांनी घसरून २३,८६० वर स्थिरावला. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. गेल्या ३ महिन्यात जवळपास दीड लाख कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. परिणामी बहुतांश गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले आहेत. म्युच्युअल फंडांचीही वेगळी स्थिती नाही. अशात गुंतवणूकदारांना एसआयपी सुरू ठेवावी की बंद करावी असा प्रश्न सतावत आहे.
सर्वच क्षेत्रांत विक्रीचा दबाव
बाजारातील ही घसरण केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नव्हती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली असून, राष्ट्रीय शेअर बाजारातील २००० हून अधिक शेअर्स लाल निशाणीत व्यवहार करत होते. देशातील सर्वाधिक कमाई करणारे आयटी क्षेत्राची तर सर्वात वाईट स्थिती आहे. टीसीएसपासून इन्फोसिसपर्यंत अनेक कंपन्यांचे शेअर्स २० टक्केपर्यंत घसरले आहेत.
घसरणीची प्रमुख कारणे
अमेरिका-इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा थेट परिणाम भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेवर झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. तेलाचे भाव भडकल्याने भारतासाठी व्यापाराचे संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवण्यासाठी सोन्यासारख्या गैर महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी टाळण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले. मात्र, याचा फटका विशेषतः ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सना बसला. सोमवारी आघाडीच्या ज्वेलरी शेअर्समध्ये १२ टक्केपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.
SIP गुंतवणूदारांनी काय करावे?
अशा मोठ्या घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदार घाबरण्याची शक्यता असते. परंतु, तज्ज्ञांच्या मते ही वेळ संयम राखण्याची आहे. जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा त्याच एसआयपीच्या रक्कमेत तुम्हाला म्युच्युअल फंडाचे जास्त युनिट्स मिळतात. यामुळे दीर्घकाळात तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी होण्यास मदत होते. घसरणीच्या काळात एसआयपी बंद करणे किंवा पैसे काढून घेणे तोट्याचे ठरू शकते.
गुंतवणुकीची धोरणे
- उद्दिष्टांशिवाय गुंतवणूक म्हणजे दिशाहीन जहाज आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता तपासून पहावी.
- आपल्याकडे ६ ते १२ महिन्यांच्या खर्चासाठी आपत्कालीन निधी असणे आवश्यक आहे. कारण, सध्याची परिस्थिती लवकर निवळण्याची चिन्हे नाहीत. अशात बाजारातील घसरणीमुळे तुम्हाला तुमची दीर्घकालीन गुंतवणूक विकण्याची गरज पडणार नाही.
- ज्यांच्याकडे अतिरिक्त भांडवल आहे आणि ज्यांचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे, त्यांच्यासाठी ही घसरण कमी किमतीत दर्जेदार शेअर्स किंवा फंड खरेदी करण्याची संधी असू शकते.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
