SIP Retirement Planning : निवृत्तीनंतर नातवंडांसोबत आरामदायी आयुष्य जगायचं असेल तर उमेदीच्या काळात तयारी सुरू करणे आवश्यक आहे. निवृत्तीसाठी मोठा निधी जमा करण्यासाठी गलेलठ्ठ पगार किंवा जास्त उत्पन्न असावे असा अनेकांचा समज आहे. परिणामी अनेक लोक आपले उत्पन्न कमी समजून याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात तुम्ही जर सातत्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर अवघ्या १००० रुपयांमध्ये तुम्ही १ कोटी रुपयांचा फंड जमा करू शकता. इतकेच नाही तर एसआयपी (SIP) आणि एसडब्ल्यूपी (SWP) या दोन आर्थिक साधनांचा वापर करुन तुम्ही महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकता.

१००० रुपयांच्या SIP तून १ कोटी रुपयांचा निधी

समजा तुमचं वय २५ ते २८ वर्षांच्या दरम्यान आहे. तुम्ही दरमहा केवळ १,००० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि दरवर्षी आपल्या पगारातील वाढीनुसार या एसआयपीमध्ये १०% ची वाढ केली, तर ६० व्या वर्षी निवृत्त होताना तुमच्याकडे १ कोटींहून अधिकचा फंड तयार होऊ शकतो.

  • सुरुवातीचे वय: २८ वर्षे
  • मासिक एसआयपी: १,००० रुपये
  • वार्षिक स्टेप-अप (वाढ): १०%
  • अपेक्षित वार्षिक परतावा: १२% (इक्विटी म्युच्युअल फंड)
  • गुंतवणूक कालावधी: ३२ वर्षे (वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत)

३२ वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक २४,१३,६५३ रुपये असेल. १२ टक्के परतावा पकडल्यास या गुंतवणुकीवर ८०,९८,२४९ रुपये निव्वळ परतावा मिळेल. म्हणजेच एकूण जमा झालेला निधी १,०५,११,९०२ रुपये इतका होईल. दरवर्षी १०% गुंतवणूक वाढवल्यामुळे अवघ्या २४ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाच्या ताकदीने तब्बल ८० लाख रुपयांहून अधिकचा निव्वळ परतावा मिळतो.

निवृत्तीनंतर एसडब्ल्यूपी (SWP) द्वारे दरमहा १ लाख रुपये ‘पेन्शन’

६० व्या वर्षी तुमच्या पोर्टफोलिओत तब्बल १ कोटी रुपये जमा असतील. आता है पैसे काढून घेण्याऐवजी, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) चा वापर करून दरमहा नियमित उत्पन्न मिळवता येते. समजा, निवृत्तीनंतर १.५ कोटी रुपयांचा फंड ६% अपेक्षित परतावा देणाऱ्या कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड किंवा डेट फंडात वर्ग केला आणि त्यातून दरमहा १ लाख रुपये काढण्यास सुरुवात केली.

  • एकूण गुंतवणूक रक्कम: १.५ कोटी रुपये
  • अपेक्षित वार्षिक परतावा : ६% (सुरक्षित डेट फंड)
  • मासिक विड्रॉल (SWP): १,०००,०० (दरमहा १ लाख रुपये)
  • कालावधी: १२ वर्षे
  • १२ वर्षांत पेन्शनच्या रुपात तुम्हाला १ कोटी ४४,००,००० लाख रुपये मिळेल. या काळात मिळालेला परतावा ४३ लाख १३,००० रुपये असेल. तर १२ वर्षांनंतरही शिल्लक राहणारा फंड ४,१३,०००

गुंतवणूक करण्यापूर्वी हे समजून घ्या

  • चढउतार हा शेअर बाजाराचा स्वभाव आहे. इक्विटी फंडात मिळणारा १२% आणि डेट फंडात मिळणारा ६% परतावा हा ऐतिहासिक कामगिरीवर आधारित एक अंदाज आहे, हा कमी जास्त होऊ शकतो.
  • निवृत्तीचे नियोजन करताना भविष्यातील महागाईचा दर गृहीत धरणे अत्यंत आवश्यक आहे.
  • निवृत्तीचे वय जवळ येईल तशी आपली गुंतवणूक इक्विटीकडून सुरक्षित डेट पर्यायांकडे वळवणे आवश्यक आहे.