Sukanya Samriddhi Yojana : मुलगी म्हटलं की तिच्या शिक्षणापासून विवाहापर्यंत अनेक आर्थिक गोष्टींची चिंता पालकांना असते. या सर्व चिंता मिटवण्यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ हा एक सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो. केंद्र सरकारची ही योजना केवळ सुरक्षितच नाही, तर चक्रवाढ व्याजाच्या ताकदीमुळे यात मोठी रक्कम जमा करता येते. जर तुमच्या घरात १० वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी असेल, तर तिच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय ठरू शकतो. सरकारी हमी आणि सध्याचा आकर्षक ८.२ टक्के व्याजदर यामुळे ही योजना गुंतवणुकीसाठी ‘सुपरहिट’ ठरत आहे.

दररोज १०० रुपयांच्या गुंतवणुकीतून १६ लाखांचा निधी

जर तुम्ही दररोज १०० रुपये वाचवले तरी तुम्ही १६ लाख रुपयांचा फंड मुलीच्या नावे जमा करू शकता. नियमित १०० रुपये म्हणजे दरमहा ३,००० रुपये वाचतील, अशा प्रकारे तुमची वार्षिक बचत ३६,००० रुपये होईल. जर तुम्ही हे ३६,००० रुपये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवले आणि १५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक ५.४० लाख रुपये होईल. २१ वर्षांनंतर, म्हणजेच मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला एकूण १६.६२ लाख रुपये मिळतील.

२१ व्या वर्षी ७० लाखांची मालकीण

जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक १.५० लाख रुपये गुंतवून १५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक २२.५० लाख रुपये होईल. २१ वर्षांनंतर, म्हणजेच मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला एकूण ६९.२७ लाख रुपये मिळतील. याचा अर्थ तुम्हाला एकूण ४६.७७ लाखांचा नफा होईल. या योजनेत १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करमुक्त आहे. यापेक्षा जास्तीची गुंतवणूक तुम्ही करू शकता. मात्र, ती करपात्र असेल.

का गुंतवणूक करावी?

या योजनेत ८०सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत कर सवलत मिळते. तसेच मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी पूर्ण रक्कमही करमुक्त असते. सरकारी योजना असल्याने मुद्दल आणि व्याजाची पूर्ण हमी मिळते. या योजनेत सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. इथे व्याजावर व्याज मिळत असल्याने दीर्घकाळात मोठी रक्कम उभी राहते. उदा. तुम्ही १ लाख रुपये गुंतवले आणि त्याचे पुढील वर्षी १,१०,००० रुपये झाले. तर यापुढे मिळणारे व्याज हे १,१०,००० रुपयांवर गणले जाते. सर्वात कमी पैशात सुरू होणारी गुंतवणूक. (वर्षाला किमान २५० रुपये)