TCS Share Price Marathi : कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयचा शिरकाव झाल्यापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे जगातील दिग्गज कंपन्या एआयच्या लाटेवर स्वार होत मालामाल झाल्या आहेत. दुसरीकडे भारतीय आयटी क्षेत्राला ओहोटी लागली असून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो सारख्या देशातील आघाजीच्या टेक कंपन्या आपल्या सर्वात वाईट काळातून जात आहेत. टाटा समूहातील सर्वाधिक कमाई करणारी टीसीएसचा शेअर ६ वर्षातील नीच्चांकी स्तरावर घसरला आहे. अशा वेळी टीसीएसमध्ये गुंतवणूक करावी की अजून घसरण्याची वाट पाहावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे.
टीसीएसची कामगिरी सर्वात वाईट
सध्या टीसीएसचा शेअर २,००० रुपयांच्या पातळीच्या अगदी जवळ व्यवहार करत आहे. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा शेअर २,००० रुपयांच्या खाली घसरला होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा शेअर २०२४ च्या उच्चांकापासून ५६ टक्केपर्यंत कोसळला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये टीसीएसचा शेअर सुमारे ४,५९२ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. चालू वर्ष २०२६ मध्ये ‘निफ्टी’मध्ये ७% आणि ‘सेन्सेक्स’मध्ये ९% घसरण झाली आहे. पण, एकट्या टीसीएसच्या शेअरमध्ये ३५% पेक्षा जास्त मोठी घसरण झाली आहे. विप्रो आणि एचसीएल टेकच्या तुलनेत टीसीएसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
Q1FY27 च्या निकालांपूर्वी बाजारात चिंतेचे वातावरण
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (जून तिमाही) निकाल लवकरच जाहीर होणार आहेत, मात्र या निकालांकडून बाजाराला फारशा आशा नाहीत. नोमुरा या जपानी ब्रोकरेज हाऊसनुसार,
- जून तिमाही हा आयटी कंपन्यांसाठी बिझनेसचा चांगला काळ मानला जातो. मात्र, यावेळी टीसीएसची महसूल वाढ संथ राहण्याची शक्यता आहे.
- कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ आणि नवीन तंत्रज्ञानावरील खर्च यांमुळे कंपनीच्या ‘ऑपरेटिंग मार्जिन’वर मोठा दबाव दिसून येईल.
- अमेरिकेतील आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि कंपन्यांकडून तंत्रज्ञानावरील खर्चात केली जाणारी कपात यामुळे नवीन करारांचा वेग मंदावला आहे.
टाटा समूहाचा नवा ‘मास्टरप्लॅन’
- भारतीय आयटी कंपन्या संकटात असताना टाटा समूह भविष्यातील मोठ्या बदलांसाठी तयारी करत आहे. कंपनीने यंदा एआय, क्लाउड आणि सास क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या दोन कंपन्यांची खरेदी पूर्ण केली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टीसीएससाठी ४ उद्दिष्ट ठेवली आहेत.
- उद्योगांसाठी ‘AI ऑपरेटिंग सिस्टम’ तयार करणे आणि ‘एजंटिक एआय’ सोल्यूशन्सचा वेग वाढवणे.
- भारताचे पहिले ‘AI फोकस्ड डेटा सेंटर’ उभारणे, ज्याची रॅक डेन्सिटी १६० किलोवॅटपेक्षा जास्त असेल.
- हायपरस्केलर्स आणि जागतिक एआय कंपन्यांसोबत ३,६०० भागीदाऱ्या मजबूत करणे.
- सुरक्षित आणि सार्वभौम ‘Sovereign AI’ इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे.
- टीसीएसचे सीईओ के. कृतीवासन यांनी सांगितले, की, “जगातील सर्वात मोठी एआय-आधारित तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते इंटेलिजन्सपर्यंत आम्ही ‘फुल-स्टॅक एआय प्लेयर’ म्हणून काम करू.”
खरेदी करावी की विक्री?
- आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लीने टीसीएसचे रेटिंग कमी केले आहे. त्यांच्या मते, इन्फोसिसच्या तुलनेत टीसीएसचा जोखीम-परतावा आता कमी आकर्षक आहे. एआय क्षमता वाढवण्यासाठी कंपनीला मोठा खर्च करावा लागणार असल्याने आर्थिक वर्ष २०२७ मधील नफ्याचे प्रमाण धोक्यात येऊ शकते.
- कोटक सिक्युरिटीजचे मूलभूत संशोधन प्रमुख सुमित पोखर्णा यांनी सांगितले की, रुपयाच्या घसरणीमुळे आयटी उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. वेतनवाढ आणि महसुली तुटीमुळे ‘इबीआयटी’ मार्जिनमध्ये १६० बेसिस पॉईंट्सची घसरण होऊ शकते, तरीही सध्याच्या स्वस्त व्हॅल्युएशनमुळे टीसीएस हा आमच्या पसंतीचा शेअर आहे. त्यांनी टीसीएससाठी २,४५० रुपयांचे उद्दिष्ट ठेवून खरेदीचे रेटिंग दिले आहे.
- सध्या पहिल्या श्रेणीतील आयटी कंपन्यांचे व्हॅल्युएशन त्यांच्या ५ ते १० वर्षांच्या सरासरीपेक्षा ३०% ते ४०% स्वस्त झाले आहे. मंदीचे ढग ओसरताच हे शेअर्स पुन्हा वेगाने धावतील, असा अंदाज मोतीलाल ओसवालने वर्तवला आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
मार्केट एक्सपर्ट अंबरिश बालिका यांच्या मते, “भारतीय आयटी कंपन्या कदाचित ‘एआय निर्मात्या’ नसतील, पण त्या ‘एआय निर्माते आणि एआय वापरकर्ते’ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील. पुढील ४-५ वर्षांत टीसीएसचे रूप पूर्णपणे बदललेले असेल. ज्यांच्याकडे दीर्घकालीन थांबण्याची क्षमता आहे, त्यांच्यासाठी या घसरणीत थोड्या-थोड्या प्रमाणात शेअर्स खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.” पण, अल्पकाळात हा शेअर तुम्हाला निराश करू शकतो.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
