Investment Mistakes to Avoid : सध्याच्या महागाईच्या काळात फक्त बचत करणे पुरेसे नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, अनेकदा आपल्या छोट्या चुका दीर्घकाळात आपलं मोठं आर्थिक नुकसान करतात. म्हणजे उशीरा गुंतवणूक सुरू करणे, नियोजनाशिवाय पैसे लावणे, अंदाधुंद पद्धतीने शेअर खरेदी करणे किंवा फक्त जुन्या परताव्यावर विश्वास ठेवणे यासारख्या सवयी तुमच्या संपत्ती वाढीचा वेग मंदावू शकतात. तुमची कष्टाची कमाई भविष्यात भक्कम फंडात रूपांतरित व्हावी असे वाटत असेल, तर गुंतवणुकीतील १० गंभीर चुका वेळीच टाळणे अत्यंत गरजेचे आहे. यात महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचाही सल्ला आहे.
१. सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये नको
दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा गुंतवणुकीचा जगप्रसिद्ध नियम आहे, सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका. याचा अर्थ एकाच शेत्रात सर्व पैसे गुंतवू नका. अनेक लोक आपले सर्व पैसे एकाच शेअर, सेक्टर किंवा ॲसेट क्लासमध्ये गुंतवतात. त्यामुळे जोखमीचे प्रमाण खूप वाढते. ही चूक टाळण्यासाठी तुमचे पैसे इक्विटी, डेट आणि इतर पर्यायांमध्ये विभागून गुंतवावेत.
२. गुंतवणुकीसाठी ‘योग्य वेळेची’ वाट पाहणे
जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असाल, तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. गुंतवणूक जेवढ्या लवकर सुरू कराल, तेवढा जास्त वेळ तुमच्या पैशांना चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. सुरुवातीला लहान रकमेची SIP सुरू करूनही दीर्घकाळात मोठा निधी उभारता येतो.
३. ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे
पैसे आहेत, गुंतवणूक सुरू करायची म्हणून पैसे लावणार असाल तर थांबा. कोणत्याही आर्थिक धेण्याशिवाय पैसे गुंतवणे म्हणजे दिशाहीन जहाजासारखे आहे. पैसे कोणत्या उद्दिष्टासाठी गुंतवले जात आहेत आणि किती कालावधीसाठी ते टिकवून ठेवायचे आहेत, हे आधीच स्पष्ट असणे आवश्यक आहे.
४. मार्केट टाइमिंगच्या मागे धावणे
अनेकजण बाजार खाली घसरण्याची किंवा वर जाण्याची वाट पाहात बसतात. लक्षात ठेवा बाजाराचा अंदाज लावणे भल्याभल्यांना जमलेले नाही. त्यामुळे ‘मार्केट टाइम’ करण्याऐवजी दीर्घकाळ बाजारात टिकून राहणे ही अधिक प्रभावी रणनीती मानली जाते.
५. गर्दीचा भाग बनणे
सोशल मीडिया, टीव्ही किंवा इतर माध्यमातून एखादा शेअर किंवा म्युच्युअल फंडाची चर्चा होत आहे म्हणून केवळ इतरांचे पाहून त्यात पैसे गुंतवणे धोकादायक ठरू शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या पर्यायाबद्दल स्वतः माहिती घेणे गरजेचे आहे.
६. अभ्यासाशिवाय पैसे लावणे
अर्धवट ज्ञान सर्वात धोकादायक आहे आणि आर्थिक क्षेत्रात तर तुम्ही कंगाल होऊ शकता. कोणत्याही कंपनीत किंवा फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तिची आर्थिक स्थिती, बिझनेस मॉडेल, व्यवस्थापन आणि भविष्यातील वाढीची शक्यता समजून घेणे गरजेचे आहे. योग्य संशोधन आणि अभ्यास गुंतवणुकीचे निर्णय अधिक सुरक्षित करतो.
७. गुंतवणुकीच्या खर्चाकडे दुर्लक्ष करणे
फंड मॅनेजमेंट शुल्क, व्यवहार शुल्क आणि इतर छुपा खर्च दीर्घकाळात तुमच्या एकूण परताव्यावर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्याही प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्या खर्चाची तुलना नक्की करा.
८. फक्त जुना परतावा पाहून निर्णय घेणे
अनेक नागरिक केवळ मागील वर्षांतील उत्कृष्ट परतावा पाहून पैसे गुंतवतात. परंतु, भूतकाळातील चांगला परतावा भविष्यातही तसाच मिळेल याची कोणतीही गॅरंटी नसते. त्यामुळे भविष्यातील वाढीची शक्यता आणि जोखीम दोन्ही समजून घेणे महत्त्वाचे आहे.
९. घाईघाईत विक्री किंवा गरजेपेक्षा जास्त काळ होल्ड करणे
शेअर बाजार चंचल आहे, तो आत्ता खाली तर पुढच्या क्षणी वर गेलेला असतो. काही गुंतवणूकदार थोडेसे उत्पन्न मिळताच विक्री करतात, तर काही जण परिस्थिती बदलल्यानंतरही तोच शेअर पकडून ठेवतात. गुंतवणूक करताना आधीच बाहेर पडण्याची योजना आखणे हे सुजाण गुंतवणूकदाराचे लक्षण आहे.
१०. पोर्टफोलिओचा वेळोवेळी आढावा न घेणे
शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि विसरुन जा हा सल्ला तुम्हाला कधीतरी मिळालाच असेल. तुम्हीही हे करत असाल तर ही सवय लगेच सोडून द्या. वेळोवेळी आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बाजारातील बदलांनुसार आवश्यक सुधारणा करता येतात आणि तुमची गुंतवणूक तुमच्या ध्येयाशी सुसंगत राहते.
