एसबीआय लार्ज कॅप फंडाने सरलेल्या फेब्रुवारीत अस्तित्वात आल्याला २० वर्षे पूर्ण करून एकविसाव्या वर्षात पदार्पण केले. एसबीआय लार्ज कॅपची कामगिरी गेली अनेक तिमाही मानदंड सापेक्ष खराब राहिली आहे. ३१ मार्च अखेर सरलेल्या तिमाहीत मानदंड सापेक्ष ओळीने खराब कामगिरी करण्याची परंपरा सरलेल्या (जानेवारी – मार्च २०२६) कायम राखली.

सप्टेंबर २०१० ते एप्रिल २०२४ दरम्यान फंडाच्या निधी व्यवस्थावनाची धुरा सोहिनी अंदानी यांच्याकडे होती. सध्याचे फंड व्यवस्थापक म्हणून सौरभ पंत एप्रिल २०२४ पासून जबाबदारी पार पाडत आहेत. हा बदल एसबीआय फंडाच्या अनेक योजनांच्या फंड व्यवस्थापकांच्या फेरबदलाचाच एक भाग होता. वीस वर्षे पूर्ण केलेल्या एसबीआय लार्जकॅप फंडाचे गुंतवणूकदार या फंडाच्या कामगिरी सुधारणा होण्याची वाट अनेक वर्षांपासून पहात आहेत. फंडाची कामगिरी गेली चार वर्षे निराशाजनक राहिलेली असून फंड गटातील अनेक कमी मालमत्ता असलेले फंड आणि फंडाची मानदंड सापेक्ष कामगिरी खालावलेली दिसत आहे. बहुतेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत (मल्टीकॅप आणि फ्लेक्झीकॅप जमेस धरून) निराशाजनक कामगिरी करणारे लार्जकॅप केंद्रित फंड आर्थिक उद्दिष्टांमध्ये बाधा आणू शकतात आणि त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेताना फंडाची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. केवळ परिचित नाममुद्रा किंवा बँकेत मुदतठेव करण्यास गेलेल्या ग्राहकास बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितले म्हणून त्या फंडात गुंतवणूक करणे चुकीचे आहे.
एसबीआय लार्ज कॅप फंडाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे; हा फंड मानदंड सापेक्ष आणि फंड कामगिरीत फंड गटातील अन्य फंडांच्या विविध कालावधीच्या कामगीरीत सातत्याने मागे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. लार्ज कॅप फंडांसाठी सध्याचा अस्थिरतेचा काळ आव्हानात्मक आहे. मुद्दलाला मोठीं हानी पोहचण्यापासून वाचवणे कठीण झाले आहे. एक वर्ष पूर्ण केलेले (एप्रिल २५ ते मार्च २६) ३४ फंड असून केवळ १३ फंडांनी ‘निफ्टी १०० टीआरआय’ सापेक्ष अधिक परतावा मिळविणे शक्य झाले आहे. या १३ फंडात एसबीआय लार्ज कॅप आठव्या क्रमांकावर आहे, परंतु ३ वर्षे, ५ वर्षे, कालावधीत मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविणाऱ्या फंडात एसबीआय लार्ज कॅपचा समावेश नाही. एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मागील वर्षभरात ४.७८ टक्के तोटा झाला आहे. तीन वर्षे एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना ५.५६ टक्के आणि पाच वर्षाचा एसआयपी परतावा ९.२७ टक्के आहे. या पैकी पाच वर्षे एसआयपी परतावा मानदंड सापेक्ष अधिक आहे.
एक, तीन, पाच आणि १० वर्षांच्या कालावधीत, या फंडाने ‘निफ्टी १०० टीआरआय’च्या तुलनेत १ ते ३.५ टक्क्यांनी कमी परतावा मिळविलेला आहे. एसबीआय लार्ज कॅप फंडाची तीन वर्षांतील ‘पॉइंट-टू-पॉइंट’ परतावा मध्यम स्वरूपाचा असून, फंडाने १२.३९ टक्के परतावा मिळविलेला आहे. याच कालावधीत ‘निफ्टी १०० टीआरआय’ने याच कालावधीत १३.१९ टक्के वार्षिक परतावा मिळविलेला आहे. अगदी १० वर्षांच्या कालावधीचा विचार केला तरीही, या फंडाने (१२.२३ टक्के) तर ‘निफ्टी १०० टीआरआय’च्या (१३.२१ टक्के) तुलनेत कमीच परतावा मिळविलेला आहे. जानेवारी २०१३ ते मार्च २०२६ या कालावधीतील पाच वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न्स’चा विचार करता, या फंडाने फंडांनी ‘निफ्टी १०० टीआरआय’ पेक्षा सरस कामगिरी केवळ २७.२ टक्के वेळाच केली आहे. सर्वसाधारण फंड ७५ टक्के मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळवितात आणि २५ टक्के वेळा मानदंड सापेक्ष खराब कामगिरी करतात. या कालावधीत फंडाचा सरासरी परतावा १३.५५ टक्के राहिला आहे, तर फंडांनी ‘निफ्टी १०० टीआरआय’ चा सरासरी परतावा १३.९२ टक्के आहे.
गेल्या १० वर्षांतील मासिक एसआयपी परताव्याचा विचार करता एसबीआय लार्ज कॅप फंडाने १२.५७ टक्के परतावा दिला आहे. या कालावधी दरम्यान ‘निफ्टी १०० टीआरआय’चा एसआयपी परतावा १२.७५ टक्के आहे. लार्ज कॅप फंडांना किमान ८० टक्के गुंतवणूक लार्जकॅपमध्ये करणे सक्तीचे आहे. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅप कंपन्यांचे प्रमाण ८३.३९ टक्के, मिडकॅप कंपन्यांचे प्रमाण ११.६५ टक्के स्मॉलकॅप कंपन्यांचे प्रमाण १.४५ टक्के आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या लार्जकॅप आणि लार्ज अॅण्ड मिडकॅप या दोन्ही फंडाचे निधी व्यवस्थापक सौरभ पंत आहेत. घसरणीच्या काळात लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाच्या गुंतवणुकीत ३१ मार्च रोजी सर्वाधिक ६.२५ टक्के गुंतवणूक रोकडसम होती. ही रणनीती लार्जकॅप फंडासाठी वापरली नाही. सबब लार्जकॅप फंडात रोखतेचे प्रमाण २.२६ टक्के होते. तसेच फंड गटातील अन्य फंडाच्या तुलनेत मिडकॅपचे प्रमाण जास्त असणे, या दोन कारणांनी फंडाच्या ‘एनएव्ही’च्या मोठया घसरणीस कारण ठरले. फंडगटातील अन्य फंडांप्रमाणे, एसबीआय लार्ज-कॅप फंडाच्या गुंतवणुकीत ४२ ते ४५ कंपन्यांचा समावेश असतो. अन्य लार्जकॅप फंडांप्रमाणे यामध्ये, एसबीआय लार्ज-कॅप फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक २३.७३ टक्के गुंतवणूक बँकांत केलेली आहे. गेल्या काही वर्षांत सामाभ्गांच्या किंमतीत फारशी वाढ न झालेल्या एचडीएफसी बँक तसेच कोटक महिंद्र बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या कंपन्यांमधील गुंतवणूक कायम ठेवल्याचा फंडाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मधील बदलांमुळे एकूण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत असतांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ५.२७ टक्के गुंतवणूक राखणे आणि इन्फोसिसमध्ये ३.४३ टक्के गुंतवणूक असलेल्या कंपनीत मोठी घसरण होऊनसुद्धा फंडाच्या पोर्टफोलिओत मोठी गुंतवणुक राखून ठेवली आहे. फार्मा/हेल्थकेअर, ऑटोमोबाईल्स इत्यादींसारख्या चांगल्या कामगिरी केलेल्या क्षेत्रांना अधिक महत्त्व न देणे, हे फंडाच्या खालावलेल्या कामगिरीचे आणखी एक कारण आहे. फंडाने रिटेलिंग आणि ग्राहक टिकाऊ वस्तू (कन्झ्युमर ड्युरेबल्स) यांच्यात गुंतवणुकीचेप्रमाण कमी आहे. तसेच एचडीएफसी लाइफसारख्या विमा कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश केल्याने परताव्यातील घसरणीत भर पडली आहे.
जरी फंडाच्या निवडींमध्ये एक विशिष्ट ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ रणनीतीचा अवलंब केला असला तरी निधी व्यवस्थापक सापळ्यात अडकल्याचे दिसत आहे. फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या ४४ कंपन्यांपैकी २२ कंपन्यांनी मागील तीन वर्षात ५ टक्के किंवा त्यापेक्ष कमी वार्षिक परतावा दिला आहे. अशी गचाळ कामगिरी करणाऱ्या फंडातील गुंततवणूक काढून घ्यावी तसेच एसआयपी थांबवून अधिक चांगली कामगिरी करणाऱ्या फंडात गुंतवणूक संक्रमित करावी. जाता जाता एसबीआय स्मॉलकॅपची परिस्थिती लार्ज कॅपपेक्षा दयनीय आहे. स्मॉलकॅपचे सखोल विश्लेषणातून लवकरच वाचकांना अवगत करण्यात येईल.
