मागील काही महिन्यांत वर्तविल्या गेलेल्या शक्यतांनुसार, ही बातमीही येणे तसे अपेक्षितच होते. पण तरीही अवधूत साठे यांना ५४६ कोटींचा फटका बसणे म्हणजे जरा आश्चर्याचा धक्काच होता. हे प्रकरण नक्की काय आहे ते समजावून घेऊया.

याची सुरुवात फेब्रुवारी/ मार्च २०२४ च्या आसपास झाल्याचे दिसून येते. कुणीतरी तक्रार केली म्हणून बाजार नियमन यंत्रणा हलली. ‘सेबी’ने अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकादमीला एक प्रशासकीय सूचना देऊन त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यास सांगितल्या. या जाहिरातींमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमात नोंदणी करणाऱ्या लोकांना त्यांनी शिकवल्यामुळे फायदा झाला असे सांगण्यात येत होते. हा फायदा काही निवडक खरेदी विक्रीतून मिळत होता, पण खरंतर सगळे व्यवहार लक्षात घेतले तर ते तोट्यातच होते. या सुचनेनंतर सुद्धा साठ्यांनी आपल्या जाहिराती सुरूच ठेवल्या. त्यामुळे सेबीने विशेष कोर्टाची परवानगी घेऊन, २० आणि २१ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या अकादमीमध्ये शोध मोहीम राबवली. तेव्हा ही बातमी बाहेर पडल्यानंतर पुढे काय होणार आहे याची कुणकुण लागली होती.

अकादमीमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम असल्याचे दिसते. ५०० रुपयांपासून ६,७५,००० रुपयांपर्यंत पर्याय लोकांकडे होते. अकादमीची झडती आणि शोधमोहिमेत काही व्हिडिओ तपास यंत्रणेला सापडले. ज्यात प्रशिक्षणाच्या नावाखाली अकादमीतून प्रत्यक्ष कसे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जायचे आणि विद्यार्थी साठ्यांनी सुचविल्याप्रमाणे बाजी लावायचे, हे प्रकाशात आले. तपासाअंती आलेला सेबीचा आदेश खूप कठोर नक्कीच आहे. या १२५ पानांच्या एकतर्फी अंतरिम आदेशात, कारणे दाखवा नोटीशीच्या तक्ता क्रमांक ४ पासून १६ पर्यंत काही व्हिडिओंचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात सेबीने असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, अकादमीत स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्याऐवजी कुठला व्यवहार करावा असे सुचविले जात होते.

सेबीच्या कारवाईची बातमी आली तेव्हा अवधूत साठे यांनी निवेदन प्रसृत करून ते फक्त प्रशिक्षणच देत होते असा दावा केला आहे आणि या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याचे सुद्धा सूचित केले आहे.

अंतरिम आदेशाच्या १७ ते २२व्या परिच्छेदापर्यंत साठे यांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून समभागांचे स्टॉप लॉस, लक्ष्य भाव इत्यादी सांगितले, असा आरोप आहे. आदेशांत पुरावा रूपाने व्हॉट्सॲपवरील शिफारसींचे स्क्रीन शॉटही दिले आहेत. हे सगळे करताना कायद्याने साठे हे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन विश्लेषक नाहीत याची नोंद सेबीने पहिल्या काही परिच्छेदातच घेतली आहे.

आदेशांत पुढे सेबीच्या तपासकर्त्यांनी, व्हॉट्सॲप ग्रुपवर साठे हे स्वतः केलेले व्यवहार सांगायचे किंवा काही सल्ला द्यायचे, त्यानुरूप ३४ पैकी ३३ लोकांनी तो व्यवहार केला असे म्हटले आहे. यात सेबीच्या तपासकर्त्यांनी अत्यंत हुशारीने शोधलेली बाब अशी की, स्वतःचे व्यवहार नसताना सुद्धा काही व्यवहार करा असा सल्ला साठे यांनी दिला आणि तो लोकांनी मानलासुद्धा. याचा अर्थ शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली समभागांच्या खरेदी विक्रीचा सल्ला ते देत, जे सल्लागारांना लागू नियमांना धरून नाही. शिवाय साठे हे नोंदणीकृत सल्लागारही नव्हते.

साठे यांच्या ट्रेडिंग अकादमीने जुलै २०१५ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली सुमारे ६०१ कोटी रुपये गोळा केले असा गोळा केलेल्या माहितीतून सेबीने निष्कर्ष काढला आहे. साठे आणि त्यांची अकादमी प्रशिक्षणार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन भांडवली बाजारातून नफा कसा कमवायचा याचे प्रशिक्षण देत जरी असली तरी साठे यांनी स्वतः एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत बाजारात केलेल्या ट्रेडिंगमधून ६.१९ कोटी रुपयांचा तोटा सहन केला, असेही आदेशांत आले आहे.

पुढील भागात काही प्रशिक्षणार्थ्यांची नावे आहेत जे अकादमीच्या विविध जाहिरातींमध्ये झळकले होते आणि त्या जाहिरातींत त्यांनी नफा कमावल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात जेव्हा त्यांची खाती सेबीने तपासली तेव्हा त्यांनी दावा केल्यापेक्षा अतिशय कमी नफा त्यांनी कमावला होता किंवा काही ठिकाणी तर त्यांना तोटाही झाला होता. सेबीचे म्हणणे असे की, प्रशासकीय ताकीद देऊनही या जाहिराती थांबल्या नाहीत. पुढे जाऊन सेबीच्या शोधकर्त्यांनी पावणे सात लाख रुपये देऊन ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांची खाती तपासली. शेवटच्या दोन सत्रातील ३११ विद्यार्थ्यांपैकी १८६ जणांचे ‘पॅन’ त्यांना शोधता आले ज्यात या १८६ जणांनी मिळून १.९३ कोटींचा तोटा केला होता. त्यात १२१ जणांचा तोटा तर जाहिरातींमधील दाव्याच्या अगदी विरुद्ध टोक गाठणारा होता.

अकादमी चालवत असलेल्या १० पैकी आठ अभ्यासक्रमांची तक्रार सेबीकडे आली होती. जी वरीलप्रमाणे सिद्ध देखील झाली, असे नियामकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आतापर्यंत जे ६०१ कोटी रुपये गोळा केले होते त्यातील या ८ अभ्यासक्रमांचे ५४६.१६ कोटी रुपये मुदत ठेव (एफडी) म्हणून स्वतःच्या नावाने ठेवावेत ज्यावर सेबीचे धारणाधिकार असतील आणि जे सेबीच्या परवानगीशिवाय काढता येणार नाहीत, असे तिने फर्मान काढले. आदेशात अकादमीला आपले प्रशिक्षण सुरु ठेवण्यात सांगण्यात आले आहे. पण सेबीच्या नियमानुसार प्रशिक्षणात समभागांच्या चालू भावांवरून, तर तीन महिन्यांच्या आधीच्या किमतींचाच आधार घेता येईल. या व्यतिरिक्त देखील काही बंधने लादली आहेत जी अंतिम निकाल येईपर्यंत लागू असतील.

या आदेशानंतर एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की, सेबीची शोध यंत्रणा चांगलीच मुरलेली आहे. तिला योग्य ते पुरावे शोधून, हाती घेतलेल्या प्रकरणाचा छडा लावता येतो. आधी म्हटल्याप्रमाणे निकालाला आव्हान देण्यात येईल. पण यातून समाजमाध्यमावरील प्रभावक फिइन्फ्ल्युएंसर्स किंवा तशा प्रकारचे काम करणाऱ्यांना धोक्याचा इशारा नक्कीच जाईल असे वाटते. यापूर्वी सुद्धा पी आर सुंदर यांचा खटला सेबीने ६ कोटींमध्ये सहमतीतून निकालात काढला होता. त्यामुळे येथेदेखील असेच काहीतरी होईल असा माझा अंदाज आहे. छानपैकी नाचत नाचत शिकवणारे प्रशिक्षक म्हणून यांची ख्याती. यापुढे त्यांचा नाच चालू राहणार की नाही हे पाहूच. दादरच्या चाळीतून सुरु झालेला साठेंचा प्रवास कुठपर्यंत जातो हे पाहणे रंजक किंबहुना वित्तरंजक असेल.

ई-मेल: cmaashishpthatte@gmail.com